Symbols on Food Products and Meaning : सध्या प्रत्येक जण ‘पॅकेज फूड’ अगदी सर्रास विकत घेत असतो. पाकिटबंद उत्पादनांमध्ये आपल्याला हवे तितके आणि हव्या त्या प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. मात्र, अशी उत्पादने खरेदी करत असताना त्या पाकिटांवर असणाऱ्या खास चिन्हांबद्दल ग्राहकांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही सामान खरेदी करायला गेल्यानंतर, सुपरमार्केटमध्ये ठेवलेली रंगीबेरंगी आणि आकर्षक पाकिटबंद पदार्थ लहानांपासून, मोठ्यांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, अशी उत्पादने खरेदी करण्यापूर्वी त्यांच्यावर असलेली चिन्ह / लेबल पाहायला अजिबात विसरू नका.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅकेज फूडवर असणारी ठराविक चिन्ह ही पाकिटात असणाऱ्या पदार्थांबद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती देण्याचे काम करत असतात. तुम्हाला चांगले आणि त्यातल्या त्यात आरोग्यदायी पदार्थ खायचे असल्यास पाकिटावर सर्व बाजूने छापलेली माहिती वाचणे आवश्यक असते. अनेकांना शाकाहारी आणि मांसाहारी या दोन प्रकारच्या चिन्हांची माहिती असेल, मात्र त्याव्यतिरिक्त अजून कोणती चिन्ह / लेबल उत्पादनांवर असतात जाणून घेऊ.

हेही वाचा : तुम्ही कधी ‘चायनीज काली माता’ मंदिराबद्दल ऐकलंय का? पाहा, इथे प्रसाद म्हणून देतात नूडल्स अन् चाऊमिन!

उत्पादनांवरील लेबलची माहिती :

शाकाहारी / व्हेज

हिरव्या रंगाच्या चौकोनामध्ये, हिरव्या रंगाचे वर्तुळ असणारा हा लोगो प्रत्येकाच्या ओळखीचा आहे. कोणत्याही उत्पादनावर असे चिन्ह असल्यास, ते उत्पादन / पदार्थ पूर्णतः शाकाहारी असल्याचे हे लेबल सूचित करते.

मांसाहारी / नॉन-व्हेज

पूर्वी मांसाहारी उत्पादनावरील चिन्ह हे चॉकलेटी चौकोनात चॉकलेटी वर्तुळ असे होते. मात्र, त्या लेबलमध्ये फस्सीने [FSSAI] बदल केलेला आहे. आता चॉकलेटी रंगाच्या चौकोत, चॉकलेटी त्रिकोण असे नवीन चिन्ह उत्पादनावर पाहायला मिळेल. जे ग्राहक रंगांध / रंग-आंधळे होते त्यांचा शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या लेबलमध्ये गोंधळ होऊ नये यासाठी जुन्या लेबलमध्ये हा खास बदल करण्यात आला आहे.

ग्लुटेनमुक्त / ग्लुटेन फ्री

ग्लुटेन-फ्री सर्टिफिकेशन ऑर्गनायझेशन (GFCO) यांनी ग्लुटेनमुक्त पदार्थांसाठी खास चिन्ह बनवले आहे. हिरव्या आणि निळ्या रंगाचा वापर करून तयार करण्यात आलेले हे चिन्ह ज्या उत्पादनावर असेल, त्या पदार्थांमध्ये ग्लुटेन समाविष्ट नसल्याचे ते लेबल सूचित करते.

हेही वाचा : कबाब या पदार्थाला सीख, शामी, अशी नावं कशी बरं पडली? काय आहे त्यांच्या नावांमागची गोष्ट? पाहा

जैविक भारत

जैविक भारत लोगो हा सेंद्रिय खाद्यपदार्थांसाठी तयार करण्यात आलेला लोगो असून यास सरकारी प्रमाणपत्रदेखील प्राप्त झालेले आहे. हिरव्या रंगाचे ‘बरोबर’ या खुणेचे चिन्ह आणि त्याखाली ‘जैविक भारत’ असे लिहिलेले लेबल उत्पादनावर असल्यास, ते पदार्थ सेंद्रिय आहेत असे सूचित होते. हे लेबल कोणत्याही प्रकारच्या पॅकिंग, विक्री, विपणन किंवा इतर कोणत्याही प्रकारचे वितरण करताना ते उत्पादन सेंद्रिय असल्याची खात्री करते.

एगमार्क / AGMARK

एगमार्क किंवा AGMARK हे कृषी उत्पादनांसाठी तयार करण्यात आलेले लेबल आहे. ज्या उत्पादनावर काळ्या-पिवळ्या रंगाचे हे लेबल असेल त्या उत्पादनांनी १९३७ सालच्या कृषी उत्पादन (ग्रेडिंग मार्किंग) कायद्याअंतर्गत, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने निर्धारित केलेल्या ग्रेड मानकांची पूर्तता करत असल्याची खात्री करून दिली आहे असे सूचित करते. हे चिन्ह असणारे उत्पादन, सर्टिफिकेशन आणि प्रयोगशाळेच्या चाचणीतून गेलेले असते. त्या उत्पादनांसह कोणत्याही प्रकारची छेडछाड केली जात नाही आणि हे उत्पादन भेसळमुक्त असते. थोडक्यात काळ्या-पिवळ्या रंगाचे AGMARK लिहिलेले हे उत्पादन अतिशय उच्च गुणवत्तेचे असते. त्यामुळे कोणतेही कृषी उत्पादन खरेदी करताना त्यावर AGMARK लेबल आहे की नाही ते अवश्य पाहा.

व्हेगन

वर्ष २०२२ रोजी FSSAI ने औपचारिकरित्या राष्ट्रीय ‘व्हेगन’ लोगो लाँच केला होता. हिरव्या चौकोनात आणि हिरव्या रंगात V आणि त्याखाली vegan असे लिहिलेले लेबल, उत्पादनामध्ये ऍडिशन्स, फ्लेव्हरिंग, वाहक [carriers], एन्झाइम वा प्राण्यांपासून मिळवण्यात येणाऱ्या कोणत्याही घटकांचा यामध्ये समावेश नसल्याचे सूचित करते. या लोगोमध्ये लिहिलेल्या V वर एक छोटेसे रोपदेखील आहे. व्हेगन जीवनशैली असणाऱ्या ग्राहकांसाठी हे लेबल फार फायदेशीर ठरू शकते.

अन्न विकिरण [Food Irradiation Logo]

‘Radura’ हे एक आंतरराष्ट्रीय चिन्ह असून, ते विकिरणित अन्न उत्पादन दर्शविण्याचे काम करते. हिरव्या रंगाच्या तुटक रेषांचे वर्तुळ आणि त्याच्या आत एक रोप असे या रेडुराचे लेबल असते. नैसर्गिक फळे आणि इतर खाण्यायोग्य वस्तू दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावर अणू विकिरण प्रक्रिया आणि इतर विविध प्रक्रिया कराव्या लागतात, त्यामुळे रेडुराचे चिन्ह असणारे उत्पादन साठवून ठेवण्यायोग्य आहेत आणि मानवाने खाण्यासाठी सुरक्षित असल्याचे सूचित करते. अशी माहिती फ्री प्रेस जर्नलच्या एका लेखातून समजते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Understand the meaning of food packaging symbols here are 7 different logos with name in marathi dha
First published on: 24-05-2024 at 15:37 IST