VIP Security in India : केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘झेड प्लस’ आणि ‘आरएसएस’चे प्रमुख मोहन भागवत यांना एएसएल (ASL) सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शरद पवारांनी ‘झेड प्लस’ नाकारल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवरच व्हीआयपी म्हणजे अती महत्त्वाच्या लोकांना पुरवली जाणारी ही विशेष सुरक्षा काय आहे? व्हीआयपी व्यक्तींना पुरवली जाणारी सुरक्षा किती प्रकारची असते? या सुरक्षा व्यवस्थेच्या श्रेणीत किती प्रकार असतात? ही सुरक्षा कोण पुरवतं? या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरक्षेमध्ये किती प्रकार असतात?

भारतात पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षेमध्ये ‘झेड प्लस’(Z+), एएसएल (ASL), झेड (Z), वाय प्लस (Y+), वाय (Y) आणि एक्स (X) अशा दर्जाची सुरक्षा दिली जाते. ही सुरक्षा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दिली जाते.

कोणाला पुरवली जाते ही सुरक्षा?

देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ‘झेड प्लस’(Z+), एएसएल (ASL), झेड (Z), वाय प्लस (Y+), वाय (Y) आणि एक्स (X) अशा दर्जाची सुरक्षा दिली जाते. यामध्ये राजकीय नेते, सेलिब्रेटी, उद्योगपती यांच्यासह देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि ज्यांच्या जीवाला धोका असतो अशा व्यक्तींना ही व्हीव्हीआयपी सुरक्षा पुरवली जाते.

हेही वाचा : Paralympics 2024 : पॅरालिम्पिकमधील ‘पॅरा’ शब्दाचा अर्थ काय? माहिती आहे का? जाणून घ्या!

ASL झेड प्लस सुरक्षा कशी असते?

देशाच्या पंतप्रधान पदाच्या व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या एसपीजी या सुरक्षेच्या धर्तीवर ASL झेड प्लस ही सुरक्षा असते. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला सुरक्षेचे नियम ज्या प्रकारे असतात. तसेच नियम या एएसएल (ASL) सुरक्षेमध्ये असतात. ही सुरक्षा असणारी व्यक्ती ज्या ठिकाणी दौऱ्यावर जाणार असते. त्या ठिकाणी या सुरक्षेतील जवान आधी जाऊन सुरक्षेचा आढावा घेतात.

झे़ड प्लस (Z+) सुरक्षा कशी असते?

देशातील सर्वोच्च श्रेणीमधील सुरक्षा ही झे़ड प्लस (Z+) सुरक्षा मानली जाते. या झे़ड प्लस सुरक्षेमध्ये १० एनएसजी कमांडो आणि काही पोलीस कर्मचारी असतात. हे कमांडो त्या व्यक्तीबरोबर २४ तास तैनात असतात. या सुरक्षेत सर्व मिळून ३६ जवानांचा ताफा असतो. ही सुरक्षा देशातील अनेक महत्वाच्या नेत्यांना दिली जाते.

झे़ड (Z) सुरक्षा कशी असते?

झे़ड प्लस सुरक्षेनंतर झे़ड (Z) दर्जाची सुरक्षा येते. झे़ड प्लस या सुरक्षेनंतर झे़ड ही सुरक्षा सुरक्षित मानली जाते. या सुरक्षेत ६ ते ७ कमांडो तैनात असतात. तसेच २२ जवान तैनात असतात आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो. देशातील अनेक सेलिब्रेटिंना ही सुरक्षा असते.

वाय प्लस (Y+) सुरक्षा कशी असते?

झे़ड सुरक्षेनंतर वाय प्लस सुरक्षा येते. यात ११ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. त्यात १ किंवा २ कमांडो आणि २ पीएसओ असतात. तसेच काही पोलिसांचाही समावेश असतो.

वाय दर्जाची सुरक्षा कशी असते?

वाय दर्जाच्या सुरक्षेत १ किंवा २ कमांडो असतात. तसेच काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग असतो. या सुरक्षेत एकूण ८ जवान तैनात असतात.

एक्स (X) दर्जाची सुरक्षा कशी असते?

एक्स दर्जाच्या सुरक्षेमध्ये दोन सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात असतात. ही सुरक्षा सामान्य दर्जाचे सुरक्षाकवच कॅटेगरीमध्ये मोडते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vip security in india and security categories in asl security x security z security y security x security in marathi gkt