What Happens If You Don’t Use Airplane Mode: तुम्ही विमानामध्ये मोबाईलचा ‘एअरप्लेन मोड’ (Airplane Mode) कधी लावायचा विसरलात आहात का? तुम्हाला वाटतं, “काय फरक पडतो?” पण एका पायलटच्या अनुभवानं अनेक प्रवाशांचे डोळे उघडले आहेत. जर तुम्ही विमानामध्ये जाताना एअरप्लेन मोड लावण्याकडे दुर्लक्ष करीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अनेकांना वाटतं की, फोनवर एअरप्लेन मोड लावणं ही केवळ एक औपचारिकता आहे. पण, एका पायलटनं उघड केलेलं सत्य वाचून तुमचं हे मत नक्कीच बदलेल बरं का!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका TikTok व्हिडीओमध्ये (@PerchPoint), एका व्यावसायिक पायलटनं असा खुलासा केला, “एअरप्लेन मोड हा केवळ नियम म्हणूनच नाही, तर तो विमानाच्या सुरक्षिततेसाठीही आवश्यक आहे.”

पायलटच्या मते, “जर कोणी फोन एअरप्लेन मोडवर ठेवायला विसरलंच, तर काय होईल? काही भयानक होणार नाही, विमान कोसळणार नाही; पण… तरीही यामुळे काही गोष्टी बिघडू शकतात बरं.”

पुढे स्पष्टीकरण देताना त्या पायलटनं सांगितलं की, FAA (Federal Aviation Administration) आणि अनेक विमान कंपन्या एअरप्लेन मोडला गंभीरतेनं का घेतात. त्याचं कारण म्हणजे फोनमधून सतत रेडिओ सिग्नल्स बाहेर पडत असतात, जे विमानाच्या नेव्हिगेशन किंवा संप्रेषण प्रणालीमध्ये व्यत्यय निर्माण करू शकतात.

FAA (Federal Aviation Administration)च्या मते, फ्लाइटमध्ये मोबाईल एअरप्लेन मोडवर ठेवणं अनिवार्य आहे. कारण- एकट्या एका फोनचा त्रास होणार नाही; पण जेव्हा विमानात १००-१५० प्रवासी असतात आणि त्यातले काही लोक जेव्हा मोबाईल एअरप्लेन मोडवर ठेवत नाहीत, तेव्हा त्यांच्या फोनचे सिग्नल्स रेडिओ टॉवरशी जोडले जातात. हे सिग्नल्स पायलटच्या हेडसेटमध्ये विचित्र आवाज निर्माण करतात, “जणू मच्छर किंवा गांधीलमाशी कानात भुणभुण करतेय”, असं त्या पायलटनं सांगितलं.

पायलट म्हणतो, “हो, अशा आवाजामुळे विमान कोसळत नाही; पण अशा आवाजांमुळे निर्देश देणं आणि घेणं कठीण होतं. प्रत्येक फ्लाइटमध्ये टेक-ऑफ आणि लँडिंग हे सर्वांत संवेदनशील क्षण असतात. त्यावेळी पायलट पूर्णपणे जमिनीवरील कंट्रोल टॉवरच्या सूचनांवर अवलंबून असतो. अशा वेळी जर कानात विचित्र आवाज आला, तर त्यामुळे पायलट केवळ डिस्टर्बच होत नाही, तर त्यामुळे पायलटची एकाग्रताही भंग होत असते.

Booking.com च्या अहवालानुसार, टेक-ऑफ किंवा लँडिंगच्या वेळी अनेक फोनही एकाच वेळी सिग्नल्स शोधत असतात, ज्यामुळे जमिनीवरील मोबाईल नेटवर्कही ओव्हरलोड होते. त्याशिवाय फोन एअरप्लेन मोडवर नसल्यास बॅटरीही लवकर संपते. कारण- फोन सतत सिग्नलचा शोध घेत राहतो. आतापर्यंत थेट फोनमुळे कोणतेही अपघात झाले नसले तरी हा एक सावधगिरी आणि शिस्तीचा भाग मानला जातो.

…तर पुढच्या वेळी विमानात बसाल, तेव्हा फोन एअरप्लेन मोडवर टाकायला विसरू नका. कारण- ती कृती तुम्हाला कदाचित आवश्यक वाटत नसली तरी त्यामुळे मिळणारी शांतता पायलटला एकाग्रता साधण्यासाठी निश्चितच अत्यावश्यक असते. म्हणजेच पर्यायाने प्रवासी मित्रांनो, तुमच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असते हे आता तुमच्या लक्षात आले असेलच. आम्हाला आता खात्री आहे की, तुम्ही यापुढे कधीच फोन एअरप्लेन मोडवर टाकायला विसरणार नाही. काय बरोबर ना?