केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पर्रिकर उद्या गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी काल रात्री उशिरा गोव्याचे मनोहर पर्रिकर यांची गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. तसेच त्यांना येत्या १५ दिवसांत सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचेही आदेश दिले आहेत. पर्रीकर उद्या संध्याकाळी पाच वाजता राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत दहाजणांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यापैकी गोमंतक पक्षाचे नेते सुदीन ढवळीकरही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई हे सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार सोपवला जाण्याची शक्यता आहे. तसेच अपक्षांना दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये गोविंद गावडे आणि रोहन कोंटे यांचा समावेश आहे. या सूत्रानुसार, भाजपकडे चार मंत्रीपदे, मुख्यमंत्रीपद आणि विधानसभेचे अध्यक्षपद राहील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोव्यात काँग्रेस मोठा पक्ष ठरला असला तरी मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या अटीवर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि २ अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजप आणि इतर पक्षांचे मिळून एकूण २१ आमदारांनी राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेचा दावा केला होता.

गोव्यात भाजपला मिळालेले संख्याबळ बघता सरकार स्थापन करणे शक्य नव्हते. मात्र, अपक्षांची मोट बांधून सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने नितीन गडकरी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरल्यामुळे गोव्यात गडकरी खऱ्या अर्थाने किंगमेकर ठरले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी ४० सदस्यीय विधानसभेत काँग्रेस १७ जागा मिळवून मोठा पक्ष ठरला, तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपने १३ जागा जिंकल्या. सत्ता स्थापनेसाठी २१ जागांची आवश्यकता असताना ९ सदस्यांचा पाठिंबा मिळविणे, हे भाजपसमोर मोठे आव्हान होते. नितीन गडकरी शनिवारी दिवसभर दिल्लीत होते. सत्तेची समीकरण जुळविण्यासाठी गडकरी यांच्याकडे गोव्याचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली. गोवा निवडणुकीची जबाबदारी ही गडकरींकडेच होती. त्यासाठी त्यांनी निवडणुकीपूर्वी व्यूव्हरचनाही केली होती. गडकरी शनिवारी रात्रीच गोव्यात पोहोचले. रात्रभर त्यांनी सत्तेची समीकरण मांडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर भाजपच्या गोटात बैठकांचे अखंड सत्र सुरू होते. अखेर काल संध्याकाळी पाच वाजता भाजपचा विधिमंडळ नेता म्हणून पर्रिकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सात वाजता पर्रिकरांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला होता. याउलट काँग्रेसच्या गोटात अखेरच्या क्षणापर्यंत गोंधळ होता. अनेक बैठका होऊनही शेवटपर्यंत कोणताही न निर्णय झाल्याने काँग्रेसला सत्तेपासूनच दूरच राहावे लागले होते.

मराठीतील सर्व गोवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manohar parrikar to swear in as goa chief minister tomorrow at 5 pm