सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ हा हाय वोल्टेज मतदारसंघ ठरला. या मतदारसंघात एकाच घरातील दोघेजण एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात जंगी फाईट झाली. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी चांगल्या मताधिक्याने सुनेत्रा पवारांचा पराभव केला. हा पराभव अजित पवारांनी निकालाच्याच दिवशी मान्य केला. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा पराभवाची जबाबदारी स्वीकारली. या संपूर्ण ११ मिनिटांच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी “बारामतीत मीच कमी पडलो” हे वाक्य सहावेळा उच्चारले. त्यामुळे हा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला असल्याचं स्पष्ट होतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामतीत पराभव होण्यामागची कारणं काय? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, “आम्ही कमी पडलो म्हणून आम्ही हरलो.” तसंच, या मतदारसंघात भाजपाची साथ योग्यरित्या मिळाली नसल्याचीही टीका केली जातेय. त्यावर ते म्हणाले की, “ज्याने त्याने आपआपल्या परीने योग्य काम केलं. पण मीच कमी पडलो.”

हेही वाचा >> नव्या सरकारच्या मंत्रिमंडाळाचा फॉर्म्युला ठरला? महाराष्ट्रातील किती खासदारांची कॅबिनेटमध्ये वर्णी?

अजित पवारांनी हा पराभव अगदीच मनापासून स्वीकारला असल्याचं दिसतंय. कारण या संपूर्ण पत्रकार परिषेदत दर पाच वाक्यानंतर मीच कमी पडलो हे वाक्य त्यांनी सतत उच्चारलं. ते म्हणाले की, “बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आहे. ते कोणत्या कारणाने पडलो, काय पडलो हे त्यांच्याशी चर्चा केल्यावर मला ते कळेल. कारण सुप्रिया निवडून आली तरी ग्रामीण भागात हवा तसा उत्साह पाहायला मिळाला नाही. चौकात गुलाल वगैरे उधलले गेले. पण आम्ही कमी पडलो”, असं अजित पवार म्हणाले.

जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला

“जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे. जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. उद्या सकाळी आम्ही दिल्लीला जाणार आहोत. एनडीएचे सर्व प्रमुख पक्ष, घटकपक्ष असणारे खासदारांना बोलावलं आहे. तिथं गेल्यानंतर काही वेळ मिळतो. त्यावेळी देवेंद्र, एकनाथ आणि मी सगळे सहकारी चर्चा करू. माझं स्वतःचं मत आहे. अपयश कशामुळे मिळालंय हे कळलंय. त्यामुळे ज्यात कमी पडलो आहे हे लक्षात घेऊन विधानसभेत त्या चुका दुरुस्त केल्या जातील”, असं अजित पवार म्हणाले.

तसंच, पत्रकारांनी सतत त्यांना या अपयशामागची कारणं विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते पुन्हा, “माझ्या स्वतःमुळे अपयश आल्याने मला कोणाला दोष द्यायचाच नाहीय. त्यामुळे काही दुरुस्ती करण्याची मानसिकता मी ठेवली आहे”, असं म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I fell short in baramati ajit pawar expressed his regret in the press conference sgk