फारशी पूर्वतयारी नसताना आणि उबदार कपडे, शस्त्रास्त्र व निवारा व्यवस्थेचा अभाव असतानाही भारतीय सैन्याने सियाचिन या जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर ताबा मिळवून पाकिस्तानला बेसावध गाठले. लडाखच्या उत्तर आणि ईशान्य भागात, अत्यंत दुर्गम आणि निर्मनुष्य अशा या टापूवर सामरिकदृष्ट्या ताबा मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन मेघदूत’ असे नामकरण केलेल्या या मोहिमेस १३ एप्रिल रोजी ४० वर्षे पूर्ण होतात. जगात सर्वात उंच युद्धभूमीवर झालेली ही पहिलीच लष्करी मोहीम ठरली.

लष्करी मोहिमेची गरज का भासली?

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सूचनेनुसार १९४९ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान आखलेली युद्धबंदी रेषा आणि १९७१ च्या युद्धानंतर सिमला कराराने अमलात आलेली नियंत्रण रेषा नकाशावर ‘एन. जे. ९८४२’च्या संदर्भ बिंदूपर्यंत सीमित होती. ती या बिंदूच्या पुढे आखली न गेल्याने संदिग्धता निर्माण झाली. एन. जे. ९८४२ च्या पलीकडे दोन्ही बाजूंचा भाग कोणत्याही लष्करी कारवाईच्या कक्षेबाहेरचा मानला जात असे. पुढे पाकिस्तान सियाचिनवर आपला हक्क सांगू लागला. गिर्यारोहणासाठी परदेशी गिर्यारोहकांना पाठवू लागला. भारतीय सैन्याने गिर्यारोहण मोहिमा आखल्या. मात्र, त्यास विरोध करीत पाकिस्तानने पॉइंट एन. जे. ९८४२ पासून काराकोरम खिंडीला जोडणाऱ्या रेषेच्या आसपासच्या प्रदेशावर दावा सांगण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर प्रदीर्घ काळ या उत्तुंग क्षेत्रात सैन्य तैनातीचा विचार झाला नव्हता. बदलत्या स्थितीत तो क्रमप्राप्त ठरला. पाकिस्तानी सैन्याने या भागात लष्करी ठाणे उभारण्याची तयारी केल्याचे गुप्तचर अहवाल आले. पाकिस्तानी सैन्याने उत्तुंग क्षेत्रासाठी काही खास सामग्री युरोपातून खरेदी केल्याची माहिती उघड झाली. सियाचिनवर ताबा घेण्यापासून पाकिस्तानला रोखण्यासाठी भारतीय सैन्याने तत्पूर्वीच या क्षेत्रात आपली लष्करी ठाणी प्रस्थापित करण्याचे निश्चित केले. गिर्यारोहणाचा हंगाम सुरू होण्याआधी मोहीम तडीस नेण्यासाठी १९८४ मध्ये ’मेघदूत‘ची आखणी झाली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 years of operation meghdoot how did india capture siachen the world highest battleground beating pakistan print exp ssb
First published on: 12-04-2024 at 14:13 IST