२०१३ साली धनुष आणि सोनम कपूर यांचा अभिनय असलेला रांझणा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या लव्हस्टोरीचा अंत नेहमीच्या लव्हस्टोरीसारखा हॅपी नव्हता. मात्र, याचा शेवटच चित्रपटाचा आत्मा होता. त्या शेवटच्या सीनमध्ये धनुषचे संवादही तितकेच दांडगे होते. सध्या एआयचं युग आलं आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत एआयचा वापर आवर्जून केला जातोच. असाच प्रयोग रांझणा चित्रपटावरही झाला. एआय सहाय्यक शेवट घेऊन रांझणा हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. निर्माता कंपनी ईरॉस इंटरनॅशनलने ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपटात आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेला नवीन शेवट जोडण्यात आला आहे. हा बदल करण्यामागे प्रेक्षकांना एक हॅपी एंडिंग देण्याचा उद्देश आहे.
असं असताना चित्रपटाचे मूळ दिग्दर्शक आणि सह-निर्माते आनंद एल राय यांनी या पुन्हा प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या नव्या व्हर्जनपासून लांब राहणं पसंत केलं आहे. द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना त्यांनी म्हटले की, “सह्या करताना मला खूप काळजी घ्यावे लागते. एआय हे भविष्य आहे ते सर्वांनाच माहीत आहे. पण, त्याचा वापर भविष्य किंवा वर्तमानासाठी करा, भूतकाळाला बदलण्यासाठी वापरू नका.” ईरॉस इंटरनॅशनलने मात्र असे स्पष्ट केले की, त्यांच्याकडे चित्रपटाचे सर्व अधिकार आहेत. तसंच त्यात बदल करण्याचेही कायदेशीर अधिकार आहेत. एआयचा वापर म्हणजे फक्त बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचा एक मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. या वादामुळे कलात्मक आणि व्यावसायिक मालकी यामधील संघर्ष समोर आला आहे. तसंच कलेवर नियंत्रण, तांत्रिक हस्तक्षेप आणि कायदेशीर चौकटीतील सीमारेषांबद्दल चर्चाही सुरू झाली आहे.
चित्रपट पुन्हा प्रदर्शित का केला जात आहे?
आनंद एल राय दिग्दर्शित आणि हिमांशु शर्मा यांच्या लेखणीतून साकारलेला रांझणा हा २०१० च्या दशकातला सर्वाधिक प्रभावी हिंदी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात प्रेम, जात आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यांची सांगड पाहायला मिळाली. चित्रपटाचा नायक कुंदन याची भूमिका धनुषने आणि एक मुस्लीम मुलगी झोया हिची भूमिका सोनम कपूरने साकारली होती. कुंदन हा झोयावर एकतर्फी प्रेम करत असतो. या प्रेमकथेचा शेवट मात्र दु:खद दाखवण्यात आला आहे. समीक्षकांकडून या चित्रपटाला प्रचंड प्रशंसा मिळाली आणि अनेक पुरस्कारही मिळाले.
दहा वर्षांहून अधिक काळ झाल्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाला एआय आधारित नव्या शेवटासह पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा बदल दिग्दर्शकाच्या परवानगीशिवाय घेण्यात आला आहे. आनंद राय यांनी याबाबत आपलं स्पष्ट मत व्यक्त करत हा बदल नाकारला आहे. पण, कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यांना फारसा आधार मिळाल्याचे दिसत नाही, कारण भारतीय कॉपीराइट कायद्याच्या अंतर्गत चित्रपटाचे सर्व हक्क सहसा निर्मात्याकडे असतात, या प्रकरणात ते ईरॉस इंटरनॅशनलकडे आहेत.
हा वाद केवळ एका चित्रपटापुरता नाही, तर अंतिम निर्णयाचा हक्क कोणाकडे आहे, लेखनाची कला टिकून राहू शकते का असे एक ना अनेक प्रश्न उभे केले आहेत.
कायदा काय सांगतो?
दिग्दर्शकाची नाराजी भावनिकदृष्ट्या असली तरी कायद्याच्या दृष्टीने ती ग्राह्य धरली जात नाही. भारतीय कॉपीराईट कायद्याच्या कलम २ (डी) नुसार, चित्रपटाचा लेखक म्हणजे निर्माता असतो असे अंकित सहानी यांनी म्हटले आहे. “जोपर्यंत एखाद्या विशिष्ट करारामध्ये दिग्दर्शकाला मालकी हक्क किंवा आर्थिक अधिकार दिलेले नाहीत, तोपर्यंत त्यांना चित्रपटावर कायदेशीर नियंत्रण दाखवता येत नाही.”
कॉपीराईट कायद्याच्या कलम १४ नुसार, अधिकार असलेल्या व्यक्तीला चित्रपटाचे रूपांतर, पुन्हा प्रदर्शन आणि सादरीकरणात बदल करण्याचे विशेष अधिकार आहेत. कलम २ डी नुसार, चित्रपटाचा लेखक म्हणून निर्मात्याची व्याख्या स्पष्टपणे दिली आहे. दिग्दर्शक लेखक किंवा संपादक नाही. कलम ५७ अंतर्गत दिग्दर्शकांना नैतिक हक्क प्राप्त होत नाहीत. जोपर्यंत ते लेखक म्हणून इतर कोणत्याही स्वरूपात, जसे की पटकथालेखक किंवा कलाकार म्हणून श्रेय देत नाहीत. याचा अर्थ जर आनंद एल राय यांचा ईरॉससोबत असा कोणताही करार नसेल, ज्यामध्ये त्यांनी विशिष्ट अधिकार राखून ठेवले असतील, तर त्यांना एआय वापरून बदललेल्या चित्रपटाच्या पुन्हा प्रदर्शन करण्याला विरोध करता येणार नाही.
एआयनिर्मित कंटेंटसंदर्भात भारतात सध्या कोणताही स्वतंत्र कायदा नाही. “भारत सध्या अशा एआयआधारित कलाकृतींचे संरक्षण करतो, जिथे मानवाचा ठोस सहभाग असतो. फक्त एआयने पूर्णपणे स्वयंचलितरित्या निर्माण केलेली कलाकृती किंवा जिथे मानवाचा सहभाग नगण्य असतो, त्याला सध्या कॉपीराईट संरक्षण दिले जात नाही. या प्रकरणात एआयचा वापर झाला आहे असं ते सांगत असतील तर त्याचा अर्थ कथानकातील बदल, नवीन संवादलेखन किंवा जनरेटिव्ह एआय वापरून अॅनिमेशन तयार करणे असा सहभाग असू शकतो”, असे सहानी यांनी म्हटले आहे. जर यामध्ये मानवी सहभाग असेल तर हा नव्याने दाखवला गेलेला शेवट कायद्याच्या संरक्षणात येतो असेही ते म्हणाले.
त्यामुळे कायद्यानुसार भावना किंवा कलेपेक्षा मालकी आणि कराराला प्राधान्य दिले जाते. रांझणा प्रकरण भावनिकदृष्ट्या महत्त्वाचे असले तरी जोपर्यंत कायदाच बदलत नाही, तिथे कायदेशीरदृष्ट्या फारसा बदल घडू शकत नाही.
रांझणा चित्रपटासंदर्भातला वाद हा केवळ दिग्दर्शक आणि निर्मात्यांमधील संघर्ष नसून कला, लेखन आणि मालकी यांमध्ये एआयच्या भूमिकेबाबतचा वाढणारा वाद दर्शवतो. कृत्रिम बुद्धिमत्ता कलेच्या प्रक्रियेत सामील होत असेल तर मूळ कला म्हणजे नेमकं काय आणि त्यावर नियंत्रण कोणाचं यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जर एखादी कथा भविष्यात एआयने बदलली जाऊ शकते, तर ती अजूनही दिग्दर्शकाच्या दृष्टीने भविष्यात ओळखली जाऊ शकते का?
जगभरात अनेक चित्रपटांमध्ये एआयचा वापर वादग्रस्त ठरला आहे. द ब्रुटलिस्ट (२०२४) मध्ये एआयने कलाकारांचे उच्चार शुद्ध केले आणि आर्किटेक्चरल दृश्ये निर्माण केली. रोडरनर (२०२१)मध्ये दिग्दर्शकाने एआय वापरून अँथनी बोर्डेन यांचा आवाज निर्माण केला होता. तो संवाद त्यांनी प्रत्यक्षात कधीही बोलला नव्हता. भारतात रेखाचित्रम (२०२५) या मल्याळम चित्रपटात एआय वापरून अभिनेता ममूटी यांचा तरुण रूपातला चेहरा दाखवला गेला. हे अद्यापही कायद्याच्या नियंत्रणाखाली नाही. भारतातील सध्याचा कायदा मानवनिर्मित कलाकृतींचे संरक्षण करतो. मात्र, पूर्णपणे एआयने तयार केलेल्या कृतींसाठी ठोस कायदेशीर चौकट अस्तित्वात नाही. या कायदेशीर पोकळीतला मूलभूत प्रश्न असा आहे की, केवळ कायदा परवानगी देतो म्हणून व्यावसायिक हितसंबंध कलाकाराच्या मूळ अभिव्यक्तीवर तांत्रिक हस्तक्षेप करू शकतात का?
रांझणा प्रकरणावरून हे स्पष्ट होते की, एक चित्रपट जो एकेकाळी दिग्दर्शकाच्या भावनिक दृष्टिकोनातून ओळखला जात होता, तोच आता त्याच्या परवानगीशिवाय बदलला जात आहे. एआय साधने अधिक कार्यक्षम असताना कलाक्षेत्रातील उद्योगासाठी कायदेशीर आणि नैतिक चौकटींचा पुनर्विचार आवश्यक ठरतो.