अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची प्री वेडिंग पार्टी गुजरातच्या जामनगर येथे भव्य पद्धतीने सुरू आहे. त्यांचा विवाहपूर्व सोहळा १ ते ३ मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. बॉलीवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, स्पोर्ट्स स्टार, राष्ट्रप्रमुख आणि भारतातील अन् जगभरातील बिझनेस टायकून यासह अनेक हायप्रोफाइल सेलिब्रिटी गुजरातमध्ये अवतरले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा RIL आणि Jio Platforms Ltd च्या संचालक म्हणून काम पाहतो. राधिका ही Encore Healthcare CEO वीरेन मर्चंट यांची सर्वात लहान मुलगी आहे. जानेवारी २०२३ मध्ये साखरपुडा केलेले अनंत आणि राधिका जुलैमध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत. पण सौराष्ट्रातील जामनगर हे प्री वेडिंगचे ठिकाण म्हणून का निवडले गेले? हे जाणून घेणार आहोत.

अंबानी कुटुंबाचे जामनगरशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. टाइम्स नाऊच्या दिलेल्या वृत्तानुसार, अनंत अंबानी यांची आजी कोकिलाबेन अंबानी यांचा जन्म जामनगरमध्येच झाला होता, विशेष म्हणजे धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापनासुद्धा जामनगरमधूनच केली होती. “जामनगरमध्येच माझ्या प्री वेडिंगचे नियोजन करू शकलो हे माझे भाग्य असल्याचंही अनंत अंबानी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. “माझे वडील अनेकदा म्हणतात की, हे (जामनगर) माझे आजोबा म्हणजेच दिवंगत धीरूभाई अंबानी यांचे सासरचे ठिकाण आहे. म्हणूनच आम्ही आमच्या लग्नाआधीचे सेलिब्रेशन येथे आयोजित करणे निवडले. मी जामनगरचाच असल्याचं मला वाटते. परंतु हे एकमेव कारण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘वेड इन इंडिया’च्या आवाहनाने प्रेरित होऊन इथे प्री वेडिंग शूट आयोजित केल्याचं अनंत अंबानी सांगतात. “आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, लोकांनी भारतात लग्नं केली पाहिजेत; ही आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असली पाहिजे,” असंही अनंत अंबानी म्हणाले. मोदींनी नोव्हेंबरमध्ये मन की बात संबोधित करताना भारतीयांना डेस्टिनेशन वेडिंगच्या बाबतीत घराजवळचे ठिकाण निवडण्याचे आवाहन केले होते. “लग्नाचा विषय निघाला तेव्हापासून एक गोष्ट मला खूप दिवसांपासून सतावत होती. आजकाल काही कुटुंबांकडून परदेशात जाऊन विवाहसोहळा पार पाडण्यासाठी वातावरण निर्मिती तयार केली जात आहे. मला वाटतं याची खरेच गरज आहे का?.”

हेही वाचाः भारतीय नृत्य कलाकाराची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या; कोण होते अमरनाथ घोष?

इंडिया टुडेने मोदींचा हवाला देत म्हटले आहे की, “काही कुटुंबे परदेशात जाऊन विवाहसोहळे पार पाडतात, त्यामुळे सगळ्याच नातेवाईकांना तिथे पोहोचता येत नाही, म्हणून पाहुणे अन् नातेवाईकांचे मन दुखावले जाते.” “जर आपण भारतीय भूमीवर भारतातील लोकांमध्ये विवाहाचे सोहळे साजरे केले, तर देशाचा पैसा देशातच राहील, ” असं मोदी म्हणाले होते. नीता अंबानी यांनीही एका व्हिडीओमध्ये जामनगर निवडण्याचा निर्णय स्पष्ट केला आहे. “जेव्हा माझ्या धाकट्या मुलाच्या अनंतच्या राधिकाबरोबरच्या लग्नाचा प्रसंग आला, तेव्हा मला दोन महत्त्वाच्या गोष्टी करायच्या होत्या. पहिल्यांदा मला आपलं मूळ ज्या ठिकाणी आहे, तिकडे हा सोहळा साजरा करायचा होता. जामनगरला आपल्या हृदयात एक विशेष स्थान आहे आणि त्याचे खूप महत्त्व आहे. आपण जिथून आलो ते गुजरात आहे. तिथेच मुकेश आणि त्याच्या वडिलांनी रिफायनरी बांधली. मी या रखरखीत अन् वाळवंटी भागाला हिरवेगार टाऊनशिप आणि चैतन्यमय समुदायात रूपांतरित करून माझ्या करिअरची सुरुवात केली, असंही नीता अंबानी सांगतात.

हेही वाचाः शेअर बाजाराने आज विशेष ट्रेडिंग सत्र का केले आयोजित? जाणून घ्या

अनंत यांनी अलीकडेच रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये वन्यजीव संरक्षण प्रकल्पाची घोषणा केली. वंतारा या नावाने ओळखला जाणारा ‘जंगलाचा तारा’ हा प्रकल्प जगातील सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय आणि पुनर्वसन केंद्र आहे. “मी लहानपणापासूनच प्राण्यांची काळजी घेत आलो आहे, कारण माझ्या आई-वडिलांनी मला सांगितले होते की, जे निस्वार्थीपणे प्राण्यांची सेवा करतात, त्यांना मोबदल्यात खूप आशीर्वाद मिळतात. आपल्या हिंदू धर्मातही श्रीरामाने जटायूला मदत करून त्याची काळजी घेतली, असे म्हटले जाते. श्रीरामाने एका लहान खारुताईचीदेखील काळजी घेतली आणि त्या बदल्यात त्याला तिचा आशीर्वादही मिळाला,” असं अनंत अंबानी यांनी टाइम्स ऑफ इंडियाकडे सांगितले. अनेक प्रसिद्ध व्यक्ती आणि व्यावसायिक नेते आधीच जामनगर येथे दाखल झाले आहेत, तर काही लवकरच येथे येण्याची अपेक्षा आहे, असे या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले. या हाय प्रोफाइल कार्यक्रमासाठी आधीच पोहोचलेल्यांमध्ये झुकेरबर्ग, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका, बॅडमिंटन चॅम्पियन सायना नेहवाल, क्रिकेटपटू रशीद खान आणि सूर्यकुमार यादव, माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान आणि रणबीर कपूर यांचा समावेश होता. पॉपस्टार रिहानानेही जामनगरमधील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

आधीच गुजरातमध्ये असलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स जामनगरला पोहोचले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात जगप्रसिद्ध डेव्हिड ब्लेन आणि अरिजित सिंग, अजय-अतुल आणि दिलजीत दोसांझ यांसारखे अव्वल भारतीय कलाकार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय, अशीही माहिती आहे. कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जस्सिम अल थानी, भूतानचे राजा आणि राणी, बोलिव्हियाचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज क्विरोगा, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केविन रुड, कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर आणि स्वीडनचे माजी पंतप्रधान कार्ल बिल्ड्ट हेसुद्धा उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. ‘अतिथी यादी’मध्ये असलेल्या काही प्रमुख व्यावसायिक नेत्यांमध्ये सौदी अरामकोचे अध्यक्ष यासिर अल रुमायान, ब्लॅकरॉकचे अध्यक्ष आणि सीईओ लॅरी फिंक, ॲडोबचे सीईओ शांतनु नारायण, मेटा सीओओ जेव्हियर ऑलिव्हन, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष क्लॉस श्वाब यांचा समावेश आहे. अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, द वॉल्ट डिस्नेचे सीईओ बॉब इगर आणि बँक ऑफ अमेरिकाचे अध्यक्ष ब्रायन थॉमस मोयनिहान हेही पाहुण्यांच्या लांबलचक यादीत आहेत. भारतातून ज्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे त्यात कॉर्पोरेट नेते गौतम अदाणी, नंदन निलेकणी, संजीव गोएंका, ऋषद प्रेमजी, उदय कोटक आणि आदर पूनावाला, अमिताभ बच्चन, रजनीकांत, आमिर खान, करण जोहर यांचा समावेश आहे. अनिल कपूर, माधुरी दीक्षित, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, रोहित शर्मा आणि आध्यात्मिक नेते सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यासह इतरांचीही यादीत नावे आहेत.