Breast Cancer Risk Foods जगभरात दरवर्षी ब्रेस्ट कॅन्सरच्या (स्तनाचा कर्करोग) रुग्णांची संख्या वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, हा असा आजार आहे, ज्यात स्तनातील पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि गाठी तयार करतात. वेळेत उपचार न केल्यास हा आजार शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकतो आणि जीवघेणा धोकाही निर्माण करू शकतो. २०२२ मध्ये जगभरात सुमारे ६.७ लाख महिलांचा मृत्यू स्तनाच्या कर्करोगामुळे झाला. भारतातही या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. NCDIR-India (2024) नुसार, भारतात प्रत्येक २८ महिलांपैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख महानगरांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जगातील अनेक भागांपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे.
तरुण महिलांनाही मोठ्या प्रमाणात या रोगाचे निदान होत आहे. रुग्णालयांच्या नोंदी आणि कर्करोगतज्ज्ञ यांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार, निदान, स्क्रीनिंग शिबिरे, मॅमोग्राफी व्हॅन आणि वार्षिक तपासण्या ही वाढीची प्रमुख कारणे आहे. परंतु, वैद्यकीय तज्ज्ञ आपल्या दैनंदिन आयुष्यातील एका मोठ्या चुकीविषयी सांगतात. ती चूक म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. जुलै २०२५ मध्ये, ‘Physicians Committee for Responsible Medicine (PCRM)’ ने केलेल्या एका सर्वेक्षणात एक धक्कादायक गोष्ट उघड झाली की, अनेक महिलांना याची जाणीव नाही की त्यांच्यासाठी योग्य आहार कोणता. आहार कर्करोगाच्या जीवशास्त्रावर कसा परिणाम करतो, याविषयी ‘न्यूज १८’ने वृत्त दिले आहे. त्याविषयी समजून घेऊयात…
आहाराचे महत्त्व काय?
आहाराकडे दुर्लक्ष केले जाण्याचे एक कारण म्हणजे अनेकांना कर्करोग हा अनुवंशिकता, संप्रेरके किंवा दुर्दैवाने होणार आजार वाटतो. परंतु, स्तनाच्या कर्करोगाची केवळ ५ ते १० टक्के प्रकरणे BRCA1 आणि BRCA2 सारख्या आनुवंशिक जनुकीय बदलांमुळे होतात. याचा अर्थ असा की, जीवनशैली घटक म्हणजेच शारीरिक हालचाल, वजन आणि आहार आदी घटक मोठी भूमिका बजावतात.
खाण्याच्या सवयी जळजळ/सूज, संप्रेरकांचे प्रमाण, रोगप्रतिकारशक्ती आणि चयापचय यांवर परिणाम करतात. युरोप, अमेरिका आणि आशियातील मोठ्या लोकसंख्या अभ्यासातून वारंवार हे दिसून आले आहे की, फळे, भाज्या, धान्ये, कडधान्ये, डाळी, सुकामेवा आणि बिया यांचा समावेश असलेले आहार संरक्षणात्मक ठरतात. याउलट, लाल आणि प्रक्रिया केलेले मांस, साखरयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले धान्य आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड पॅकेज केलेले अन्न धोकादायक ठरतात.
स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करणारे पदार्थ
स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करणारे पदार्थ काही वेगळे किंवा महागडे नाहीत. पिढ्यानपिढ्या भारतातील प्रत्येक घरात हेच पदार्थ दिसतात. फळे अँटीऑक्सिडंट्स देतात, जे पेशींचे नुकसान टाळतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये अशी संयुगे असतात, जी हानिकारक रेणूंना बाहेर काढण्यास मदत करतात. गहू, तांदूळ आणि भरड धान्ये (मिलेट) यांसारखे संपूर्ण धान्य फायबर पुरवतात, जे संप्रेरके नियंत्रित करण्यास मदत करतात. कडधान्ये आणि डाळी वनस्पती प्रथिने (प्लांट प्रोटीन) आणि फायटोन्यूट्रिएंट्सनी समृद्ध असतात, जे सूज कमी करतात.
आहारातील फायबरची भूमिका सर्वांत महत्त्वाची असते. दशकांपासून संशोधकांनी नोंदवले आहे की, ज्या महिला जास्त फायबर, विशेषत: संपूर्ण धान्य आणि शेंगांमधून मिळणारे फायबर खातात, त्यांच्यामध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो. याचे एक कारण म्हणजे फायबर शरीरातील इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. इस्ट्रोजेन हे एक सामान्य संप्रेरक आहे, परंतु ते जास्त प्रमाणात उपस्थित राहिल्यास स्तनातील पेशींच्या वाढीस उत्तेजन देऊ शकते. फायबर पचनमार्गात इस्ट्रोजेनला बांधून ठेवते आणि ते काढून टाकण्यास मदत करते.
वनस्पती-समृद्ध आहाराचा आणखी एक फायदा म्हणजे इन्सुलिनची नियंत्रित पातळी. अनेकदा साखरयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या कार्बोहायड्रेट्समुळे इन्सुलिनची पातळी वाढते, जी पेशींच्या वाढीस आणि सूज वाढवण्यास कारणीभूत ठरते. वनस्पती-आधारित पदार्थ रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास आणि इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. फळे आणि भाज्या कॅरोटीनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफिनॉल्ससारखी अनेक प्रकारची फायटो केमिकल्स देतात. ही संयुगे डीएनए दुरुस्तीस मदत करतात, ताण कमी करतात आणि शरीराला कर्करोगजन्य पदार्थांना निष्क्रिय करण्यास मदत करतात. सुका मेवा आणि बिया निरोगी चरबी पुरवतात, विशेषत: ओमेगा-३ फॅटी ॲसिडस्.
कोणते पदार्थ खाणे टाळावे?
जसे काही पदार्थ धोका कमी करतात, तसेच काही पदार्थांचा धोका वाढण्याशी सातत्याने संबंध असतो. लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांस, जसे की सॉसेज आणि बेकन हे प्रमुख चिंतेचे विषय आहेत. या मांसांमध्ये अनेकदा नायट्रेट्स आणि नायट्राइट्ससारखी प्रिझर्वेटिव्ह्ज असतात, ज्यामुळे शरीरात कर्करोगजन्य संयुगे तयार होऊ शकतात. त्याला भाजणे, तळणे किंवा बारबेक्यू करणे धोक्याचे ठरू शकते, कारण यामुळे मांसावर हानिकारक रसायने तयार होतात. अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स ही आणखी मोठी चिंता आहे.
यात पॅकेज केलेले स्नॅक्स, इन्स्टंट नूडल्स, फ्रोझन तळलेले पदार्थ, साखरयुक्त ब्रेकफास्ट, कँडी, सोडा, फ्लेवर्ड दही आणि रेडी टू इट असे लेबल असलेल्या अनेक पदार्थांचा समावेश होतो. या पदार्थांमधील केवळ कॅलरीच नाही, त्यात असलेले प्रिझर्वेटिव्ह्ज, स्टॅबिलायझर्स, इमल्सीफायर्स, कृत्रिम रंग, अतिरिक्त साखर आणि प्रक्रिया केलेले धोकादायक ठरू शकतात. एकत्रपणे, हे घटक सूज वाढवतात, पोटातील सूक्ष्मजीवजंतूंना विस्कळीत करतात आणि इन्सुलिन प्रतिरोधकतेचा धोका वाढवतात. साखरयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले धान्य रक्तातील साखर आणि इन्सुलिनमध्ये वारंवार वाढ करतात. कालांतराने, यामुळे वजन वाढणे, सूज आणि संप्रेरकांचे असंतुलन होऊ शकते. आज या पदार्थांचे सेवन रोज केले जात आहे आणि हेच आव्हानात्मक ठरत आहे.
आहार आणि कर्करोग
अनियंत्रित पेशींच्या वाढीमुळे कर्करोग उद्भवतो. आपला रोजचा आहार अनेक जैविक प्रक्रियांवर परिणाम करतो, ज्यामुळे ही अनियंत्रित वाढ होण्याची शक्यता किती आहे हे ठरते. स्तनाचा कर्करोग इस्ट्रोजेनच्या पातळीस संवेदनशील असतो. संपूर्ण धान्य आणि पालेभाज्या यावर संरक्षणात्मक परिणाम दर्शवतात. सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन डीएनएला नुकसान पोहोचवते आणि कर्करोगाच्या पेशींना अनुकूल वातावरण तयार करते. अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ, लाल मांस आणि साखरयुक्त आहार सूज वाढवणारे घटक वाढवतात, तर वनस्पती-आधारित पदार्थ ते कमी करतात.
फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कडधान्ये, इन्सुलिनची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. शरीराचे वजनदेखील यात मोठी भूमिका बजावते कारण चरबीयुक्त ऊतक इस्ट्रोजेन तयार करतात. हे एक कारण आहे की, रजोनिवृत्तीनंतर स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. त्यावेळी अंडाशय इस्ट्रोजेन तयार करणे थांबवतात आणि चरबी हा संप्रेरकाचा मुख्य स्रोत ठरते. चुकीच्या आहारामुळे होणारी वजन वाढ या परिणामाला वाढवते. तसेच पोटातील सूक्ष्मजीवजंतू, पचनमार्गात राहणारे कोट्यवधी जीवाणू हे संप्रेरके, रोगप्रतिकारशक्ती आणि सूज नियंत्रित करण्यास मदत करतात. फायबरने समृद्ध आहार या जीवाणूंना पोषण देतो. अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ त्यांना विस्कळीत करतात, त्यामुळे कर्करोग आणि आहाराचा संबंध फार जवळचा आहे आणि त्यामुळेच आहार योग्य नसला की कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
