दक्षिणेतील केरळमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होईल. राज्यात दशकभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडी सत्तेत आहे. दर पाच वर्षांनी येथे सत्तांतर होते. गेल्या म्हणजे २०२१ ची निवडणूक अपवाद ठरली. कारण डावी आघाडी सलग दुसऱ्यांदा सत्तेत आली. डाव्यांचा सामना काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या संयुक्त लोकशाही आघाडीशी असतो. मात्र सध्या राज्यात माकप विरुद्ध भाजप परिवार यांच्यात द्वंद्व सुरू आहे. त्याला कारण ठरलाय ३० वर्षीय रॅप गायक, कवी वेदन. वादग्रस्त पार्श्वभूमी : डाव्या लोकशाही आघाडी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पलक्कड येथे आयोजित कार्यक्रमात वेदनची खास उपस्थिती होती. मुळात पलक्कड हे ठिकाण निवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे हे भाजपचे प्रभावक्षेत्र मानले जाते. येथील पालिका भाजपच्या ताब्यात होती. केरळमध्ये अनेक वर्षे भाजप पाय रोवण्यासाठी धडपडत आहे. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेते सुरेश गोपी यांच्या रूपाने भाजपने त्रिचूर मतदारसंघातून आपला पहिला खासदार राज्यातून निवडून आणला. लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय आघाडीचा विचार करता, दहा मतदारसंघात भाजप पहिल्या स्थानी होता. थोडक्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला दोन आकडी जागांची अपेक्षा बाळगता येईल. सध्या राज्यात भाजपचा एकही आमदार नाही. तरीही माकपने भाजपला लक्ष्य केले. मूळ मुद्दा आहे, वेदनला डाव्या आघाडीने त्यांच्या कार्यक्रमात खास निमंत्रित केल्याचा. वेदनची पार्श्वभूमी वादग्रस्त असून, यापूर्वी त्याच्या विरोधात तक्रारी आहेत. आताही गाण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याची तक्रार पोलिसांत पकक्कडच्या भाजप नगरसेविकेने केली. गाण्यांद्वारे जातींमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यात ठेवण्यात आला. यापूर्वी वेदनकडून ९ नऊ ग्राम गांजा जप्त करण्यात आला होता. २०२१ मध्ये लैंगिक गैरवर्तनाचा ठपकाही त्याच्यावर होता. मग समाज माध्यमांवर त्याने माफी मागितली होती. याखेरीज हिंदू ऐक्यवादी संघटनेच्या के. शशिकला यांनीही वेदनविरोधात तक्रार केली. वेदनने त्याला उत्तरेही दिली.
कार्यक्रमात आकर्षणाचे केंद्र
हे वाद असतानाही पलक्कड येथील कार्यक्रमात त्याची लोकप्रियता दिसून आली. उपस्थितांनी समारंभस्थळी मंचावर असलेल्या अनेक ज्येष्ठ मंत्र्यांकडे दुर्लक्ष करत वेदनबरोबर गाण्यावर ठेका धरण्यासाठी धाव घेतली. अखेर जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. वेदनने गाण्यातून हिंदुत्ववाद्यांवर टीका केली. त्रिचूर येथे जन्मलेल्या वेदनचे मूळ नाव हिरेन दास मुरली. उपेक्षितांची वेदना गाण्यातून मांडल्याने तो लोकप्रिय झाला. त्याची आई श्रीलंकन निर्वासित आहे. तर वडील दलित. आपल्या आईला जे जीवनात सहन करावे लागले ते संगीतातून शब्दबद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. उजव्या विचारसरणीच्या राजकारणावर तो टीकास्त्र सोडतो. त्यामुळे माकपच्या कार्यक्रमाचा तो केंद्रबिंदू होता. वेदन हा वाट चुकलेला युवक असून, तो जिहादींच्या हातातील बाहुले असल्याचा आरोप भाजप परिवारातून केला जातो. तर युवकांच्या वेदना तो गाण्यातून मांडतो असे राज्यातील माकपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने स्पष्ट केले. युवावर्ग यातून पक्षाकडे आकर्षित होईल असे त्यांचे गणित आहे. आरोपांची ही राळ पाहता पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत वेदन महत्त्वाची भूमिका बजावले असेच एकूण चित्र दिसते. केरळचे राजकारण माकप व काँग्रेस या दोन पक्षांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या आघाड्यांभोवतीच फिरत आहे. भाजप त्यात कोठेच नव्हता. किंबहुना चार ते पाच टक्के मतांच्या पुढे या पक्षाला मजल मारता आली नाही. मात्र एकूणच देशातील राजकारण, त्याला आंतरराष्ट्रीय स्थितीची जोड, यामुळे भाजप काही प्रमाणात राज्याच्या राजकारणातील तिसरा कोन म्हणून पुढे येऊ लागलाय.
राज्यात काँग्रेससाठी संधी?
लोकसभेला (२०२४) काँग्रेस आघाडीने राज्यातील २० पैकी १८ जागा जिंकल्याने काँग्रेसला सत्तेची संधी असल्याचे मानले जाते. लोकसभेला माकप व भाजपला प्रत्येकी १ जागा मिळाली. अर्थात लोकसभेच्या निकालावरून विधानसभेचे भाकीत करता येणार नाही. कारण २०१९ मध्येही असेच चित्र असताना माकपने पुन्हा बाजी मारली. यंदा हॅट्रिकचा विश्वास माकपला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या इतका लोकप्रिय नेता अन्य कोणाकडेही नाही. मात्र सलग दहा वर्षे सत्तेत राहिल्याने सत्ताविरोधी नाराजीची धास्ती या पक्षाला आहे. त्यात भाजप ख्रिश्चन समुदायातील किती मते घेणार यावर दोन्ही पक्षांचे भवितव्य ठरेल. राज्यात १८ टक्के ख्रिश्चन तर २६ टक्के मुस्लीम मते आहेत. हिंदूंमधील नायर तसेच इळवा समुदायातील मते लोकसभेला बऱ्यात प्रमाणात भाजपकडे वळाली. यामुळे जवळपास राज्यातून २० टक्के मते राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळाल्याने माकपला धक्का बसला. भाजप कोणाची मते घेणार यावर डावी किंवा काँग्रेसच्या आघाडीचे भवितव्य ठरेल. राज्यात काँग्रेसचे संघटन उत्तम आहे. त्यांना मुस्लीम लीगची साथ आहे. अशा वेळी यंदा काँग्रेसला केरळमध्ये संधी खुणावत आहे. मात्र ८० वर्षीय मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनाही चमत्काराची आशा आहे. यामुळे अनिश्चित राजकीय स्थितीत हा तिरंगी सामना होईल. त्यामुळेच डाव्या आघाडीने आपल्या कार्यक्रमात वेदनसारख्या युवा गायकला संधी देत पारंपरिक राजकारणाचा बाज बदलण्याचा प्रयत्न केला.
© The Indian Express (P) Ltd