उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये मंगळवारी (२७ फेब्रुवारी) राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाले. एप्रिलमध्ये रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या ५६ जागांपैकी या तीन राज्यांमधील १५ जागांसाठी मतदान झाले. उर्वरित ४१ उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले होते, कारण त्या जागांवर इतर कोणीही स्पर्धक नव्हते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या मतदानात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) बाजूने लक्षणीय निकाल लागला आहे. निवडणुकीनंतर वरिष्ठ सभागृहाची रचना कशी बदलली आहे ते जवळून पाहू यात.

मतदानापूर्वी राज्यसभा कशी होती?

मतदानाच्या दिवसापूर्वी २३८ सदस्यांच्या राज्यसभेत एनडीएचे १०९ खासदार उपस्थित होते. इंडिया आघाडीच्या विरोधी गटाचे ८९ खासदार उपस्थित होते. उत्तर प्रदेशमधून दहा, महाराष्ट्र आणि बिहारमधून प्रत्येकी सहा, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून प्रत्येकी पाच, कर्नाटक आणि गुजरातमधून प्रत्येकी चार, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमधून प्रत्येकी तीन आणि उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागेवर निवडणूक झाली. हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका घ्यायच्या होत्या. मात्र, उत्तर प्रदेश, हिमाचल आणि कर्नाटकवगळता इतर राज्यांतील उमेदवार वरच्या सभागृहात बिनविरोध निवडून गेलेत.

बिनविरोध निवडून कोण आले?

आंध्र प्रदेशमध्ये सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाचे तीनही उमेदवार जी बाबू राव, वायवी सुब्बा रेड्डी आणि एम रघुनाथ रेड्डी बिनविरोध निवडून आले आहेत. जनता दला (युनायटेड) चे एक उमेदवार संजय कुमार झा, भाजपाचे दोन उमेदवार धर्मशिला गुप्ता आणि भीम सिंग हे विजयी झाले आहेत. तसेच राष्ट्रीय जनता दला (आरजेडी)चे उमेदवार मनोज कुमार झा आणि संजय यादव विजयी झालेत. तर काँग्रेसचे अखिलेश प्रसाद सिंह बिहारमधून विजयी झाले.

महाराष्ट्रात एक जागा शिंदेंच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा यांना मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे विजयी झाले आहेत, तर भाजपाचे तीन उमेदवार अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे निवडून आलेत. छत्तीसगडमधून भाजपाचे देवेंद्र प्रताप सिंह हे वरिष्ठ सभागृहात पोहोचले आहेत. भाजपाचे चारही उमेदवार जेपी नड्डा, जसवंतसिंह परमार, मयंक नायक आणि गोविंदभाई ढोलकिया गुजरातमधून विजयी घोषित करण्यात आले.

हरियाणात भाजपाचे सुभाष बराला यांनी राज्यसभेची जागा जिंकली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना भाजपाने रिंगणात उतरवले होते, त्यांनी ओडिशात विजय मिळवला, तर राज्यातील दोन उच्च सभागृहाच्या जागा सत्ताधारी बिजू जनता दल (बीजेडी) उमेदवार देबाशीष सामंतरे आणि सुभाशिष खुंटिया यांच्याकडे गेल्या. राजस्थानमध्ये भाजपाचे दोन उमेदवार चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठोड बिनविरोध विजयी झाले. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही राजस्थानातून वरिष्ठ सभागृहात निवडून आल्या होत्या. मध्य प्रदेशातील चारही जागा मुरुगन, उमेशनाथ महाराज, बनशीलाल गुर्जर आणि माया नरोलिया या भाजपाच्या उमेदवारांना गेल्यात. काँग्रेसचे उमेदवार रेणुका चौधरी आणि अनिल कुमार यादव आणि भारत राष्ट्र समिती (BRS) नेते व्ही रविचंद्र तेलंगणातून राज्यसभेवर गेले आहेत. भाजपाचे महेंद्र भट्ट उत्तराखंडमधून बिनविरोध निवडून आलेत. तृणमूल काँग्रेसचे (TMC) चार उमेदवार सुष्मिता देव, सागरिका घोष, ममता ठाकूर आणि मोहम्मद नदीमुल हक आणि भाजपाचे समिक भट्टाचार्य पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर गेले आहेत.

निवडणूक निकालानंतर राज्यसभेवर एक नजर

उत्तर प्रदेश विधानसभेतील आपापल्या संख्याबळानुसार, भाजपाला सात सदस्यांना वरिष्ठ सभागृहात पाठवायचे होते, तर तीन उमेदवार विरोधी समाजवादी पक्षाचे (SP) असायला हवे होते. उत्तर प्रदेश विधानसभेतील समाजवादी पक्षाचे मनोज पांडे, राकेश पांडे, राकेश प्रताप सिंग, विनोद चतुर्वेदी, अभय सिंह, आशुतोष मौर्य आणि पूजा पाल यांच्यासह सात सपा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यानंतर भाजपाने मंगळवारी उत्तर प्रदेशात अतिरिक्त जागा जिंकल्या. समाजवादी पार्टीने रिंगणात उतरवलेल्या तीन उमेदवारांपैकी केवळ अभिनेता-राजकारणी जया बच्चन आणि माजी खासदार रामजी लाल सुमन निवडून आलेत, तर तिसरे उमेदवार माजी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आलोक रंजन पराभूत झालेत.

हेही वाचाः भारत जीपीटीचे ‘हनुमान’ एआय लवकरचं होणार लाँच; तुम्हाला ‘या’ Made In India मॉडेलबद्दल माहीत आहे का?

सुधांशू त्रिवेदी, माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंग, माजी राज्यमंत्री संगीता बळवंत, माजी आग्रा महापौर नवीन जैन, माजी आमदार साधना सिंह, अमरपाल मौर्य, चौधरी तेजवीर सिंग आणि संजय सेठ हे भाजपाचे आठ उमेदवार उत्तर प्रदेशमधून विजयी झालेत. कर्नाटकातही क्रॉस व्होटिंग झाले. काँग्रेसचे तीन उमेदवार अजय माकन, जीसी चंद्रशेखर आणि सय्यद नसीर हुसेन यांच्या वरच्या सभागृहात निवडून आलेत, तर भाजपाचे नारायणसा भंडागे यांनी राज्यातील उर्वरित एक जागा जिंकली.

हेही वाचाः मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

हिमाचल प्रदेशने सर्वात अनपेक्षित निकाल दिलेत. राज्यातील एकमेव राज्यसभेची जागा काँग्रेसने आरामात मिळवायला हवी होती. परंतु काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी हे भाजपाचे उमेदवार हर्ष महाजन यांच्याकडून पराभूत झालेत. एप्रिलमध्ये रिक्त झालेल्या ५६ राज्यसभेच्या जागांपैकी भाजपाने ३०-२० बिनविरोध आणि १० जागा क्रॉस व्होटिंगमधून जिंकल्या आहेत. यामुळे राज्यसभेतील भाजपाची संख्या ९७ वर पोहोचली आहे, ज्यामुळे ते वरच्या सभागृहातही भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे आता ११७ जागा असून, ते बहुमतापेक्षा फक्त चार मतांनी कमी आहेत. टाईम्स ऑफ इंडिया (TOI) नुसार, या ५६ खासदारांच्या शपथविधीनंतर २४० सदस्यांच्या उच्च सभागृहात १२१ ची संख्या आहे. मंगळवारच्या मतदानानंतर काँग्रेसचे वरिष्ठ सभागृहात २९ सदस्य वाढले आहेत. TMC कडे १३ खासदार आहेत, DMK आणि AAP कडे प्रत्येकी १०, BJD आणि YSRCP कडे प्रत्येकी ९, BRS कडे ७, RJD कडे ६, CPM कडे ५ आणि AIADMK आणि JD(U) कडे प्रत्येकी चार खासदार आहेत, असंही टाइम्स ऑफ इंडियाने सांगितले आहे.