आजकाल धावपळीच्या कामापेक्षा एका जागेवर बसून काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश लोकांचे काम तासन् तास कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसून असते. नऊ तास एकाच ठिकाणी बसून राहिल्याने अनेक मानसिक आणि शारीरिक समस्या उद्भवतात. बैठ्या जीवनशैलीकडे लोकांचा कल जसजसा वाढत चालला आहे, तसतशा आरोग्याच्या नवनवीन समस्याही उद्भवताना दिसत आहेत. तुम्ही जर एकाच ठिकाणी खूप वेळ बसून असाल आणि उठल्यावर तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात वेदना होऊ लागल्या, तर कदाचित ही ‘डेड बट सिंड्रोम’ची लक्षणे असू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“या आजाराचे नाव जरी विचित्र असले तरी याचे परिणाम गंभीर आहेत,” असे मेयो क्लिनिकमधील शारीरिक औषध व पुनर्वसन तज्ज्ञ जेन कोनिडीस यांनी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले. या आजाराला ग्लुटियल ॲम्नेशिया म्हणूनही ओळखले जाते. जेव्हा तुमचे ग्लूट्स म्हणजेच नितंबाचे स्नायू निष्क्रिय होतात, तेव्हा हा आजार होतो; ज्याने दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. काय आहे हा आजार? ‘डेड बट सिंड्रोम’ कशामुळे होतो? याची लक्षणे आणि उपाय काय? त्याविषयी जाणून घेऊ.

हेही वाचा : दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र; ही दुर्मीळ खगोलीय घटना काय आहे?

‘डेड बट सिंड्रोम’ होण्यामागील कारण काय?

कालांतराने दीर्घकाळ बसून राहिल्याने हिप फ्लेक्सर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुढच्या भागातील स्नायू आणि मागील बाजूस ग्लूट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्नायूंमध्ये गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. जेव्हा तुम्ही चालण्यासाठी एक पाऊल पुढे टाकता, तेव्हा ग्लूट्स सक्रिय होते. परंतु, जेव्हा तुम्ही एकाच अवस्थेत बसून राहता तेव्हा नितंब आणि मांडीच्या पुढच्या बाजूला असलेले स्नायू विश्रांतीच्या स्थितीत असतात.

या आजाराला ग्लुटियल ॲम्नेशिया म्हणूनही ओळखले जाते. जेव्हा तुमचे ग्लूट्स किंवा नितंबाचे स्नायू निष्क्रिय होतात, तेव्हा हा आजार होतो. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

‘ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी वेक्सनर मेडिकल सेंटर’चे फिजिकल थेरपिस्ट ख्रिस कोल्बा यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले की, आठ तास सलग याच स्थितीत बसून राहिल्याने न्यूरॉन्सना ग्लूट्सपर्यंत पोहोचण्यास वेळ लागतो. न्यूरॉन्स ग्लूट्सना सक्रिय होण्यासाठी सिग्नल देतात. ग्लूट्स, विशेषत: ग्लूट्स मेडियस स्टेबिलायझर म्हणून काम करतात, जे चालणे आणि धावण्यासाठी पार्श्विक आधार देतात. जर हे स्नायू कमकुवत झाले आणि त्यांची कार्यक्षमता कमी झाली, तर पाठीच्या खालच्या भागावर, नितंब आणि मांडीच्या इतर भागांवर अधिक ताण येतो.

तुम्हाला ‘डेड बट सिंड्रोम’ आहे हे कसे कळेल?

तुम्हाला ‘डेड बट सिंड्रोम’ आहे की नाही हे तपासण्यासाठी, एका पायावर ३० सेकंदांपर्यंत उभे राहा, आपला तोल जाऊ नये यासाठी तुम्ही भिंत किंवा इतर कुठल्याही वस्तूचा आधार घेऊ शकता. अभ्यासानुसार, चाचणीदरम्यान तुमच्या ओटीपोटावर ताण आल्यास आणि वेदना होऊ लागल्यास हे ग्लुटियस मीडियस आणि स्नायूंमधील कमकुवतपणाचे लक्षण असू शकते. परिणामी, जेव्हा स्नायू निष्क्रिय होतात, तेव्हा पाठीच्या खालच्या भागासह गुडघे, मांडी यांमध्ये तीव्र वेदना होऊ लागतात, असे परवानाधारक फिजिकल थेरपिस्ट व न्यूयॉर्क शहरातील थ्राइव्ह इंटिग्रेटेड फिजिकल थेरपीचे मालक तामार अमितय म्हणाले. “तुम्ही ग्लूट्सचा व्यायाम करीत असाल आणि तुम्हाला तुमचे ग्लूट्स सक्रिय असल्याचे जाणवत नसतील, तर तुम्हाला तातडीने फिजिकल थेरपिस्टशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे,” असे फिजिकल थेरपिस्ट व अमेरिकन फिजिकल थेरपी असोसिएशनचे प्रवक्ते डॉ. कॅरी पॅग्लियानो यांनी ‘फॉक्स न्यूज डिजिटल’ला सांगितले.

‘डेड बट सिंड्रोम’ टाळण्यासाठी दीर्घकाळ बैठकीच्या जीवनशैलीत लक्षणीय बदल करणे आवश्यक आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

‘डेड बट सिंड्रोम’वर उपाय काय?

‘डेड बट सिंड्रोम’ टाळण्यासाठी दीर्घकाळ बैठकीच्या जीवनशैलीत लक्षणीय बदल करणे आवश्यक आहेत. नियमित व्यायाम, ग्लूट्स मजबूत करण्यासाठी व्यायाम आणि वारंवार आपल्या जागेवरून हालचाल करणे या बाबींवर लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे. डॉ. जेन कोनिडिस म्हणतात की, हलताना ग्लूट्समध्ये काही संवेदना जाणवायला हव्यात, हेच निरोगी असल्याचे लक्षण आहे.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांची समर्थकच त्यांच्यासाठी ठरतेय डोकेदुखी; कारण काय? कोण आहेत लॉरा लूमर?

बैठे काम करणाऱ्या प्रत्येकाने अलार्म लावून दर ३० ते ५० मिनिटांच्या अधूनमधून उठून काही शारीरिक हालचाल केली पाहिजे. उठल्यानंतर गालावर आणि अवघडलेल्या जागांवर स्वतःच मारायला हवे. “हे थोडे उत्तेजन मेंदूला आठवण करून देते की, ते स्नायू तेथे सक्रिय स्थितीत आहेत,” असे एका जाणकार व्यक्तीने सांगितले. स्क्वॅट्स, हिप सर्कल, लंग्ज व ग्लूट ब्रिज यांसारखे व्यायाम स्वतःला मजबूत करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. त्याशिवाय कामाच्या अधूनमधून उभे राहणे, दैनंदिन स्ट्रेचिंगचा व्यायाम करणे, नियमित चालणे यांसारख्या लहान उपायांमुळे स्नायूंचे कार्य आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dead butt syndrome caused by sitting for too long rac