आजच्या जगात अनेक तरुणांना प्रेम आणि राग यांसारख्या भावनांना तोंड देणे कठीण होत चालले आहे. सोशल मीडियामुळे लोक अधिक मोकळेपणाने आणि बिनधास्त राहण्याची मुभा मिळत आहे. यामुळे कधीकधी काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. विद्यार्थ्यांनी अशाप्रकारच्या समस्या योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी मदत व्हावी या उद्द्शाने दिल्ली विद्यापीठाने निगोशिएटिंग इंटिमेट रिलेशनशिप्स नावाचा एक नवीन पर्यायी अभ्यासक्रम सुरू केला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाने तयार केलेला हा कोर्स आजच्या डिजिटल जगात तरुणांना भावनिक संघर्षांना तोंड देण्यास मदत करेल.
२०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स उपलब्ध आहे. कोणत्याही शाखेतून शिकत असले तरी हा कोर्स त्यांना करता येणार आहे. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना काय मिळेल? किंवा कसा आधार मिळेल? कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित करता येईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या विश्लेषणातून जाणून घेऊ…
अभ्यासक्रमाची रचना आणि महत्त्वाचे मुद्दे
हा चार टप्प्यातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आव्हाने ओळखण्यास, भावनिक आव्हानांना तोंड देण्यास आणि मजबूत, आदरयुक्त नातेसंबंध निर्माण करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. तरुण लोक जवळची मैत्री आणि प्रेमसंबंध कसे तयार करतात आणि त्यांचे व्यवस्थापन कसे करतात, यावर या अभ्यासक्रमातून लक्ष केंद्रित केले आहे. विद्यार्थी त्यांच्या मुख्य विषयांसोबत हा अभ्यासक्रम घेऊ शकतात. याचा उद्देश औपचारिक वर्गात सहसा न होणाऱ्या संभाषणांसाठी मार्ग मोकळा करण्याचा आहे.
अभ्यासक्रमाची रचना अशाप्रकारे आहे
युनिट १ : मैत्री आणि जवळच्या नातेसंबंधांचे मानसशास्त्र समजून घेणे
युनिट २ : प्रेम आणि लैंगिकतेच्या विविध सिद्धांतांचा शोध घेणे. यामध्ये रॉबर्ट स्टर्नबर्गचा प्रेमाचा त्रिकोणी सिद्धांत आणि द्विघटक सिद्धांत यांचा समावेश आहे
युनिट ३ : मत्सर, भावनिक दबाव आणि जवळच्या जोडीदाराकडून हिंसा यांसारखी धोक्याची चिन्हे ओळखणे
युनिट ४ : मजबूत, कायमस्वरूपी आणि सहाय्यक नातेसंबंध कसे निर्माण करायचे ते शिकणे
अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, त्याचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना जवळच्या नातेसंबंधांचे मूल्य समजून घेण्यास मदत करणे, भावनिक ताणतणावाचे मुद्दे लक्षात घेणे आणि अर्थपूर्ण, आदरयुक्त संबंध कसे निर्माण करायचे हे शिकणे आहे. अभ्यासक्रमाच्या अखेरीस, विद्यार्थ्यांना प्रेम आणि वेदनांची भावनिक आणि मानसिक मुळे समजून घेता आली पाहिजेत आणि त्या ज्ञानाचा वापर वास्तविक जीवनातील परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी करता आला पाहिजे. विद्यापीठाचे म्हणणे आहे की, या प्रकारचे शैक्षणिक समर्थन अधिक महत्त्वाचे होत आहे. अधिक तरुण भावनिक आणि नातेसंबंधांशी संबंधित समस्यांशी झुंजत असताना असं काहीतरी करण्याची ही योग्य दिशा आहे.
किती वर्ग आयोजित केले जातील? कशावर चर्चा केली जाईल?
दर आठवड्याला विद्यार्थी तीन व्याख्याने आणि एक ट्यूटोरियलसाठी उपस्थित राहतील. हा अभ्यासक्रम आकर्षक तर आहेच, पण विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया सवयींचा विचारही करतील. स्वतःला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सहभाग दर्शवतील आणि नातेसंबंधांमधील सामान्य आव्हानांबद्दल बोलतील. या अंतर्गत चर्चांमध्ये ऑनलाइन डेटिंग, लोक क्षमा कशी हाताळतात आणि लोकप्रिय चित्रपटांमध्ये प्रेम आणि संघर्ष कसा दाखवला जातो, यासह विविध विषयांचा समावेश असेल. उदाहरणार्थ, विद्यार्थी ‘कबीर सिंग’मध्ये दाखवल्याप्रमाणे हिंसाचार आणि टायटॅनिकमधील आदर्श प्रेमाचा अभ्यास करतील.
हे संभाषण विद्यार्थ्यांना चित्रपट आणि माध्यमे, प्रेम आणि नातेसंबंधांबद्दलच्या आपल्या कल्पनांना कसे आकार देतात याबद्दल गंभीरपणे विचार करण्यास मदत करतील. ते आधुनिक डेटिंग संस्कृतीवरदेखील चर्चा करतील आणि इन्स्टाग्राम किंवा डेटिंग अॅप्ससारखे प्लॅटफॉर्म वर्तन आणि अपेक्षांवर कसा प्रभाव पाडतात याचा शोध घेतील.
दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी सदस्य लतिका गुप्ता यांनी द टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले, “प्रेमात कटुता असताना ते बहुतेकदा आदर्श किंवा सामान्य असल्याचे कसे बोलले जाते हे चित्रपट प्रतिबिंबित करतात. त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, “तरुणांना नकाराचा सामना कसा करायचा किंवा सीमा कशा आखायच्या हे क्वचितच शिकवले जाते, जर आपण हे लवकर शिकलो तर काही वाईट घटना घडणारच नाहीत,” विद्यार्थी स्टर्नबर्गच्या त्रिकोणी प्रेम सिद्धांतांचा वापर करून नातेसंबंधांचे वेगवेगळे पैलू उलगडतील आणि ते कसे कार्य करतात हे समजून घेतील