काही वर्षांपूर्वीच ऑस्ट्रेलियाची गॅबाची ‘घमेंड’ तोडणाऱ्या भारतीय संघाने आता अशीच काहीशी कामगिरी इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन येथे करुन दाखवली आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर भारतीय संघ आठपैकी सात कसोटीत पराभूत झाला होता, तर एक लढत अनिर्णित राहिली होती. त्यातच यंदाच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताला लीड्स येथे पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पाच सामन्यांच्या या मालिकेत मोठ्या पिछाडीवर न पडण्याचे दडपण भारतीय संघावर होते. या पार्श्वभूमीवर, दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे झाला आणि त्यात भारताला प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराविना खेळावे लागले. या सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीतही भारतीय संघाने इंग्लंडला तब्बल ३३६ धावांनी धूळ चारत मालिकेत बरोबरी साधली. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बुमराविनाही भारतीय संघ कसोटी सामना जिंकण्यासाठी आवश्यक २० बळी मिळवू शकतो हा संदेश प्रतिस्पर्ध्यांना मिळाला.

भारतीय क्रिकेटसाठी आशादायी चित्र

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर आता ही मालिका संपलीच असे मत इंग्लंडचे काही माजी खेळाडू आणि अन्य काही जाणकारांकडून व्यक्त केले गेले. विशेषत: बुमरा या मालिकेतील केवळ तीन सामने खेळणार हे आधीच ठरलेले असल्याने त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कसोटी सामना जिंकणे अशक्यच असल्याचे म्हटले गेले. मात्र, यात तथ्य नसल्याचे भारताने आपल्या खेळातून दाखवून दिले. एजबॅस्टन कसोटीची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती. एकीकडे इंग्लंडचे गोलंदाज झगडत असताना, दुसरीकडे आकाश दीपने दोन डावांत मिळून १० बळी, तर मोहम्मद सिराजने पहिल्या डावात सहा बळी मिळवत आपल्यातील गुणवत्ता दाखवून दिली. विशेषत: या दोन गोलंदाजांनी नव्या चेंडूचा केलेला वापर वाखाणण्याजोगा ठरला. पहिल्या डावात हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी चांगली फलंदाजी केली. परंतु केवळ एक सत्र वगळता आकाश-सिराजची लय कधीही बिघडली नाही. भारतासाठी हे नक्कीच आशादायी चित्र आहे.

अतिरिक्त जबाबदारीचा सकारात्मक परिणाम

एजबॅस्टन कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयाचे तीन प्रमुख ‘नायक’ ठरले. यापैकी दोघांनी अतिरिक्त जबाबदारीचा आपल्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दाखवून दिले. हे दोघे म्हणजे कर्णधार शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज. विजयाचा तिसरा ‘नायक’ आकाश दीपची कामगिरी निश्चितपणे वाखाणण्याजोगी होती. परंतु, त्याच्यावर अपेक्षांचे दडपण नव्हते. गिल आणि सिराजची स्थिती मात्र पूर्णपणे वेगळी होती. एक नवनियुक्त कर्णधार, तर दुसरा बुमराच्या अनुपस्थितीत भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज. ‘अतिरिक्त जबाबदारी मला अधिक चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देते,’ असे पहिल्या डावात सहा बळी मिळवल्यावर सिराज म्हणाला. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ बनलेल्या गिलने दोन डावांत मिळून विक्रमी ४३० धावा करत चमक दाखवली.

कसोटी एक, विक्रम अनेक

भारताचा कर्णधार गिलसाठी हा कसोटी सामना अविस्मरणीय होता. एजबॅस्टनवर भारताला कसोटी सामना जिंकवून देणारा तो पहिला कर्णधार ठरला हे त्याचे सर्वांत मोठे यश. तसेच तो परदेशात कसोटी सामना जिंकणाराही सर्वांत युवा भारतीय कर्णधार ठरला. या व्यतिरिक्त त्याने पहिल्या डावात २६९ धावा आणि दुसऱ्या डावात १६१ धावा करत आणखी अनेक विक्रम आपल्या नावे केले. इंग्लंडमध्ये कसोटी द्विशतक साकारणारा पहिला आशियाई कर्णधार, कसोटीत भारताचा कर्णधार म्हणून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या, इंग्लंडमध्ये भारताकडून सर्वोच्च खेळी, कसोटी सामन्यात दोन डावांत मिळून ४०० हून अधिक धावा करणारा पहिला भारतीय असे विक्रम रचताना गिलने सुनील गावस्कर आणि विराट कोहली यांसारख्या महारथींना मागे टाकले.

‘कर्णधार गिल’चे यश अधिक खास का?

फलंदाज म्हणून गिलने उत्कृष्ट कामगिरी करताना क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. मात्र, फलंदाजीपेक्षा गिलने कर्णधार म्हणून मिळवलेले यश अधिक खास ठरते. गिलला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा फारसा अनुभव नसतानाही निवड समितीने त्याच्याकडे कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली. त्यामुळे अनेकांना त्याच्यातील नेतृत्वगुण आणि क्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळाली. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार म्हणून गिलच्या कामगिरीवर काहीअंशी टीकाही झाली. तसेच त्याचा कोहलीसारखा ‘ऑरा’ अर्थात प्रभाव नाही असेही म्हटले गेले. मात्र, दुसऱ्या कसोटीत त्याच्यात मोठा बदल दिसून आला. इंग्लंडचे फलंदाज प्रसिध कृष्णाविरुद्ध सहजतेने फटकेबाजी करत होते. मात्र, गिलने प्रसिधवर विश्वास राखला. तसेच एखाद्या फटक्यानंतर लगेच क्षेत्ररक्षकांची रचना बदलण्याची पहिल्या कसोटीतील चूक त्याने यावेळी केली नाही. भारताकडे ५०० हून अधिक धावांची आघाडी असूनही त्याने दुसरा डाव लांबवला. यामुळे इंग्लंडला चौथ्या दिवशी अखेरचा तासभर फलंदाजी करावी लागली आणि त्यांनी गडी गमावले. तसेच उशिरा डाव घोषित केल्याने भारताला पाचव्या दिवशीही सुरुवातीला काही षटके टणक असलेल्या चेंडूने टाकता आली. यात ऑली पोप आणि हॅरी ब्रूक बाद झाले. मग उपाहारापूर्वी एक अतिरिक्त षटक टाकता यावे यासाठी गिलने चेंडू रवींद्र जडेजाकडे सोपवला. जडेजाने दोन मिनिटांपेक्षाही कमी वेळेत आपले षटक संपवले. त्यामुळे भारताला एक आणखी षटक टाकता आले. यात वॉशिंग्टन सुंदरने बेन स्टोक्सला बाद केले. यावरुनच कर्णधार म्हणून गिलमधील सुधारणा अधोरेखित होते. आता १० जुलैपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत गिलसह संपूर्ण भारतीय संघ अधिक आत्मविश्वासानिशी मैदानावर उतरेल हे निश्चित.