बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले ‘मंदौस’ चक्रीवादळ शुक्रवारी (८ डिसेंबर) रात्री उशिरा चेन्नईपासून ते सुमारे १५० किलोमीटर अंतरावर होते. या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही या चक्रीवादळाचा ठळक परिणाम जाणवणार आहे. १५ डिसेंबरपर्यंत राज्यात पावसाळी स्थिती राहणार आहे. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस, तर तुरळक ठिकाणी जोरधारांचीही शक्यता आहे. ११ ते १४ डिसेंबर या कालावधीत राज्यात पावसाची शक्यता अधिक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होऊन त्यांची तीव्रता सध्या वाढत आहे. हे चक्रीवादळ सध्या ताशी १५ किलोमीटर वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने भारताच्या दक्षिणेकडील किनारपट्टीकडे सरकत आहे. चेन्नई शहरापासून हे चक्रीवादळ दक्षिण-पूर्व दिशेला सुमारे १५० किलोमीटर अंतरावर आहे. चक्रीवादळाच्या संभाव्य मार्गानुसार ते शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दक्षिणेकडे किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोट्टापासून काही अंतरावर चक्रीवादळ जमिनीवर येण्याचा अंदाज आहे. या काळात वाऱ्यांचा ताशी वेग ८० किलोमीटरपर्यंत जाणार आहे. परिणामी आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तमिळनाडू आदी भागांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर कर्नाटक आणि केरळमध्येही पाऊस होणार आहे.

तामिळनाडूमध्येही सतर्कतेचा इशारा –

मंदौस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहासंचालक एस बालचंद्रन यांनी माहिती दिली की, मंदौस चक्रीवादळ आज आणि उद्या चेन्नईमध्ये मुसळधार पावसासह वायव्येकडे सरकरण्याची अपेक्षा आहे. याशिवाय त्यांनी सांगितले, मंदौस चक्रीवादळ आज रात्री किंवा सकाळपर्यंत पुद्दुचेरी आणि श्रीहरीकोटा ओलांडण्याची अपेक्षा आहे. कोडाईकनालच्या विविध भागात पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. या दरम्यान, चेन्नई विमानतळावरून उड्डाणे करणारी १० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

तामिळनाडू सरकारने एनडीआरएफ आणि राज्य दलाच्या ४०० कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली १२ पथके नागापट्टीनम आणि तंजावर, चेन्नई आणि त्याच्या शेजारील तीन जिल्हे व अन्य दहा जिल्ह्यांमध्ये तैनात क रण्यात आलेली आहेत. याशिवाय अनेक जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

दक्षिणेकडील राज्यांबरोबरच चक्रीवादळाची ही प्रणाली महाराष्ट्रात परिणाम करणार आहे. दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागांत काही ठिकाणी ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत तुरळक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही पाऊस होणार आहे. अनेक ठिकाणी आकाश अंशत: ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्र ओलांडून थेट मध्य प्रदेशपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मराठवाडा, विदर्भात थंडीचा कडाका –

राज्याच्या बहुतांश भागात पुन्हा रात्रीचे किमान तापमान सारसरीच्या तुलनेत कमी झाल्याने गारवा निर्माण झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यात बहुतांश भागात तापमानाचा पारा १० अंशांखाली गेल्याने या भागांत थंडीचा कडाका वाढला आहे. औरंगाबाद येथे शुक्रवारी राज्यातील नीचांकी ७.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भातील गोंदिया येथे ८.८, तर नागपूर येथे ९.९ अंश नीचांकी किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भात इतर भागांत १० ते ११ अंशांवर तापमान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली आदी भागांतही तापमान घटले आहे. तापमानातील ही घट आणखी एक-दोन दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर पावसाळी वातावरणामुळे तापमानात पुन्हा वाढ होणार आहे.

विदर्भात गारवा, इतरत्र तापमानवाढ –

राज्यात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात घट झाली असली, तरी विदर्भ वगळता सर्वत्र तापमान सरासरीच्या पुढे आहे. त्यामुळे विदर्भात सध्या हलका गारवा आहे. गोंदिया येथे गुरुवारी राज्यातील नीचांकी १०.२ अंश किमान तापमानाची नोंद झाली. चक्रीवादळाच्या परिणामाने सध्या काही भागांत अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होत असल्याने दिवसाच्या कमाल तापमानात मात्र घट होत आहे. कमाल तापमान सर्वत्र सरासरीखाली आले आहे. गेल्या तीनचार दिवसांत मुंबईसह कोकणात उन्हाचा चटका वाढून कमाल तापमान देशात उच्चांकी ठरले होते. या विभागातही आता तापमानात घट होत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained cyclone mandaus to hit know where and what will be the result msr
First published on: 09-12-2022 at 21:57 IST