केंद्र सरकारने नुकताच ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ ही संघटना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली आहे. ही संघटना लश्कर-ए-तैयबाचा भाग असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात या संघटनेनं जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले केल्याचंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, टीआरएफ ही संघटना नेमकी काय आहे? ती केंव्हा सुरू झाली? सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा – विश्लेषण : ७०० हून अधिक घरं, दुकानं आणि हॉटेलांना मोठमोठ्या भेगा, हिमालयातील ‘हे’ शहर का खचतंय? वाचा…
‘द रेजिस्टेंस फ्रंट’ ही संघटना काय आहे?
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये काश्मीरमध्ये ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) ही दहशतवादी संघटना सुरू झाली. शेख सज्जाद गुल हा संघटनेचा कमांडर आहे. ही संघटना सुरू करण्यामागे लश्कर-ए-तैयबा आणि आयएसआयचा हात असल्याचा दावाही केंद्रीय गृहमंत्रालयाकडून करण्यात आला आहे. काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर टार्गेट किलींगच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या हल्ल्यांमागे टीआरएफ असल्याचेही केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गेला काही वर्षांत दहशतवाद्यांच्या मुद्द्यावरून पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे लष्कर आणि आयएसआयने भारतात टीआरएफची स्थापना केली आहे. तसेच कोणी संशय घेऊ नये म्हणून या संघटनेला गैर-इस्लामिक नाव देण्यात आले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने घातलेल्या बंदीनंतर टीआरएफच्या दहशतवादी कारवायांना आळा बसेल, असा विश्वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
टीआरएफकडून काश्मीरी पंडितांना केलं जातंय लक्ष्य
मागील काही महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामागे रेझिस्टन्स फ्रंटचा हात असल्याचे दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. टीआरएफने मुख्यत: काश्मीरी पंडित, राजकीय नेते, पोलीस अधिकारी आणि गैर-मुस्लीमांना लक्ष्य केलं आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसाठी बांधण्यात येत असलेल्या वसाहतींनाही टीआरएफने विरोध केला आहे. याबरोबरच गैर-मुस्लीम सरकारी कर्मचारी आणि स्थानिक वृत्तपत्रांच्या संपादकांनीही टीआरएफने धमक्या दिल्या आहेत.
हेही वाचा – विश्लेषण : बँक लॉकरच्या नियमांत महत्त्वाचे बदल, जाणून घ्या नवे नियम
सोशल मीडियाद्वारे होते तरुणांची भरती
‘द रेझिस्टन्स फ्रंट’ दहशतवादी कारवाया करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तरुणांची भरती करते. तसेच सोशल मीडियाद्वारेदेखील काश्मीरी तरुणांचे ब्रेनवॉश करण्याचे काम या संघटनेकडून करण्यात येतं. याबरोबरच पाकव्याप्त काश्मीरमधूनही अनेक तरुणांना या संघटनेत सहभागी करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने या संघटनेवर आता बंदी घातल्यानंतर त्यांची मालमत्ता, बॅंक खाती गोठवण्यात आली आहे. त्यामुळे दहशतवादी कारवायांना चाप बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.