दत्ता जाधव
खवय्यांच्या विशेष पसंतीचा आंबेमोहर यंदा चांगलाच  कडाडू लागला आहे. यंदा आंबेमोहरच्या प्रति क्विंटल किमतीत १००० ते १५०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यापैकी फक्त जून महिन्यात ५०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यांत ६००० ते ६५०० रुपये प्रति क्विंटल असणारा आंबेमोहर जुलै महिन्यात ७००० ते ८००० रुपयांवर गेला आहे. का होत आहे ही वाढ?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंबेमोहर मावळचा आहे?

आंबेमोहरला सुगंधी तांदळाचा राजा म्हटले जाते. हा आंबेमोहर आहे दस्तुरखुद्द मावळातला. मावळातील आंबेमोहरला भौगोलिक मानांकन आहे. अखूड, जाड आणि सुंगधी ही आंबोमोहरची खास वैशिष्टे आहेत. आंबेमोहर शिजवल्यानंतर आंब्याच्या मोहरासारखा सुंगध दरवळतो म्हणून त्याला आंबेमोहर, असे नाव पडले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील डोंगर-कपारी आंबेमोहराचे उत्पादन होणारे मूळ स्थान. त्याशिवाय भोर, कामशेत, वेल्हे, मुळशी येथे आंबेमोहर तांदळाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात होती. विशेषकरून पुणे जिल्ह्याच्या दुर्गम भागात होणारे हे वाण पुणे जिल्ह्यात विशेष प्रसिद्ध आहे. वर्षभर या तांदळाला मागणी असते. आंबेमोहरविषयी सध्या चित्र बदलले आहे.

महाराष्ट्रातून आंबेमोहर नामशेष झाला आहे?

आंबेमोहर हा मूळचा महाराष्ट्राचा, आपल्या मावळाचे देशी वाण. पण, पुणे जिल्ह्यातील मावळ, भोर, कामशेत, भीमाशंकर परिसरातील आंबेमोहरचे क्षेत्र आता अत्यंत कमी झाले आहे. जे आहे ते केवळ घरगुती वापरापुरतेच. त्यामुळे वाण मूळचे महाराष्ट्रीय असले तरी त्याच्या उत्पादनात मध्य प्रदेश, आंध प्रदेश आणि तेलंगणा ही राज्ये आघाडीवर आहेत. आजघडीला राज्यात वापरला जाणारा आंबेमोहर बहुतेक करून मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातूनच येतो. येथील आंबेमोहराचा वाण किरकोळ स्वरूपातच राहिला आहे. स्थानिक पातळीवरील अल्प प्रमाणातील उपलब्धता सोडली तर मावळातून हा वाण नामशेषच होऊ लागला आहे.

परराज्यातील उत्पादनात घट झाली?

बाजारात जानेवारी महिन्यात नवीन आंबेमोहोर तांदळाची आवक होण्यास सुरुवात होते. राज्यातील उत्पादन घटल्यामुळे आता महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहोर तांदळापैकी ८० टक्के तांदूळ मध्य प्रदेशमधून तर उर्वरित २० टक्के तांदूळ आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून येतो. पश्चिम बंगालमधून आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंबेमोहोर भाताचे उत्पादन घेतले जाते. परंतु तेथेही मागील वर्षी आंबेमोहर भाताच्या लागवड क्षेत्रात मोठी कपात झाली होती. त्यामुळे मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातील शेतकरी आंबेमोहोरचा जो भात ३००० ते ३२०० रुपये प्रति क्विंटल भावाने विकत होते त्याचा दर शेतकऱ्यांनी ३५०० ते ३७०० रुपये प्रति क्विंटलवर नेला आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणातील शेतकऱ्यांनी बासमती, कोलमसह स्थानिक जातींच्या तांदळाची लागवड वाढवल्यामुळे या राज्यांतील आंबेमोहर तांदळाच्या उत्पादनात मोठी कपात झाली आहे. मध्य प्रदेशात आंबेमोहर विष्णुभोग नावाने ओळखला जातो. विष्णुभोगच्या संकरित जाती विकसित झाल्यामुळे उत्पादनात काही प्रमाणात वाढ होऊन हा वाण जिवंत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पण, पुणे परिसरातील स्थानिक शेतकरी इतर राज्यातील तांदळाला आंबेमोहर मानत नाहीत. आखूड, जाड आणि सुगंधी म्हणजे आंबेमोहर नव्हे, येथील आंबेमोहरची सर अन्य तांदळाला येत नाही, असा त्यांचा दावा असतो.

युरोप, अमेरिका, ब्रिटनमधून मागणी वाढली?

आजवर देशातून फक्त बासमती तांदळाचीच निर्यात होत होती. पण, आता बिगर बासमती तांदळच्या निर्यातीतही वाढ होऊ लागली आहे. भारत क्रमांक एकचा तांदूळ निर्यातदार देश असून, सुमारे १५० देशांना तो निर्यात करतो. त्यात बासमतीसोबत आता आंबेमोहर, कोलम, इंद्रायणीचा समावेश झाला आहे. अमेरिका, ब्रिटन, संपूर्ण युरोपसह आखाती देशांतून आता आंबेमोहर तांदळाची मागणी वाढली आहे, मात्र देशातील उत्पादनात घट झाली आहे. परिणामी आंबेमोहरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बिगर बासमती तांदूळ एकत्र मोजला जात असल्यामुळे आंबेमोहरची नेमकी निर्यात किती झाली याची नेमकी आकडेवारी मिळत नाही, अशी माहिती तांदळाचे निर्यातदार राजेश शहा यांनी दिली.

उत्पादनातील घटीविषयी कृषी शास्त्रज्ञ काय म्हणतात?

आंबेमोहर तांदळाचे पीक हाती येण्यास सुमारे १५० दिवसांचा काळ लागतो. आंबेमोहर तांदळाच्या वाणाला रोगांचा, किडींचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता जास्त असते. आंबेमोहरचे उत्पादन इतर वाणाच्या तुलनेत कमी असते. हेक्टरी दहा क्विंटलच्या आतच उत्पादन मिळते. आंबेमोहर तांदळाचे वाण उंच वाढते. त्यामुळे माघारी मोसमी पावसात हा भात पडतो, त्यामुळे नुकसान अधिक होते. या कारणांमुळे पुणे परिसरातील आंबेमोहरचे उत्पादन घटले आहे. शेतकरी अधिक उत्पादन येते म्हणून आंबेमोहरऐवजी इंद्रायणीला पसंती देताना दिसतात, अशी माहिती कृषी संशोधन वडगाव-मावळचे प्रभारी अधिकारी डॉ. नरेंद्र काशिद यांनी दिली.

तांदूळ उत्पादनात भारताची स्थिती काय?

भारत तांदूळ उत्पादनात चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मात्र, निर्यातीत अव्वल आहे. २०२१-२२मध्ये एकूण २१० लाख टनांची निर्यात झाली आहे. पुढील वर्षी ही निर्यात २३० लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. देशातून अमेरिका, ब्रिटन, युरोपीय देश आणि आखाती देशांना बासमती आणि बिगर बासमती तांदळाची निर्यात होत असते. ही निर्यात दरवर्षी वाढतच आहे. आता आफ्रिकी देशांतही तुकडा तांदूळ निर्यात होत आहे.

dattatray.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why aambemohor rice rate increase print exp abn