लोकसत्ता विश्लेषण: योगी आदित्यनाथ अयोध्येऐवजी गोरखपूरमधून का लढणार?

हिंदुत्वाचा चेहरा म्हणून भाजपाने पुढे आणलेल्या योगींना गोरखपूरमधून विक्रमी मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी पक्षावर राहील

Yogi Adityanath, Gorakhpur, Ayodhya, UP Assembly Election 2022, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२,
(File Photo: PTI)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १०७ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर (शहर) विधानसभा मतदारसंघातून लढतील, असे जाहीर करण्यात आले. योगी हे अयोध्येतून लढणार अशी अनेक दिवस चर्चा सुरू होती. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पारंपरिक बालेकिल्ल्याला अर्थात गोरखपूर शहरालाच पसंती दिली आहे.

गोरखपूरची निवड कशासाठी?

योगी आदित्यनाथ यांचे मूळ नाव अजय बिष्ट. योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर हा बालेकिल्ला. गोरखपूर मठाचे ते मठाधीपती किंवा महंत आहेत. १९९८ पासून २०१७ पर्यंत पाच वेळा त्यांनी लोकसभेत गोरखपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गोरखपूरमध्ये त्यांनी स्थापन केलेल्या हिंदू युवा वाहिनीच्या कार्याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. हिंदू समाजाच्या कल्याणासाठी ही वाहिनी काम करते, असे सांगण्यात येत असे. हिंदू युवा वाहिनीत तरुण कायर्कर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर भरणा होता. अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात या वाहिनीने काम केल्याचा आरोप करण्यात येतो. या परिसरात झालेल्या जातीय दंगलीत युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना अटकही झाली होती.

सुरक्षित मतदारसंघ…?

पूर्व उत्तर प्रदेशात हिंदू युवा वाहिनीने हिंदुत्वाचा पुकार करीत वर्चस्व निर्माण केले. पण या वाहिनीच्या कायर्कर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप नेतृत्वानेच योगींना हिंदू युवा वाहिनीला आवरा हे सांगण्याची वेळ आली. शेवटी योगींनी या संघटनेला वेसण घालण्याचा प्रयत्न केला. यातूनच २०१७च्या विधानसभा निवडणुकीत हिंदू वाहिनीने वेगळी भूमिका घेतली होती. अशा या गोरखपूरमध्ये योगींचे चांगले प्रस्थ आहे. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार हा ६० हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाला होता.

पण मग अयोध्येतून योगी यांनी लढावे असा प्रस्ताव का होता ?

भाजपाकडून आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केला जात आहे. धार्मिक ध्रुवीकरणाशिवाय निवडणूक जिंकता येत नाही हे भाजप नेत्यांना चांगले कळले आहे. गेल्याच आठवड्यात योगींनी ८० टक्के विरुद्ध २० टक्के असा धार्मिक रंग देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. उत्तर प्रदेशात १९ टक्के मुस्लिम लोकसंख्या असल्याने ८०-२०चा उल्लेख मोदींनी केल्याचे मानले जाते. राम मंदिराच्या आंदोलनावर भाजपची पाळेमुळे देशभर वाढली. राम मंदिराच्या आंदोलनाने भाजपला ताकद मिळाली. याच अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला भाजप सरकारने सुरुवात केली. २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येतील राम मंदिराचे काम काही प्रमाणात तरी पूर्ण करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. अयोध्येतील राम मंदिर हा हिंदुत्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. अशा या अयोध्येतून योगी आदित्यनाथ यांनी लढावे अशी संतमहंत किंवा साधूंची मागणी होती. पाच वर्षांपूर्वी अयोध्या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार ५० हजारांनी निवडून आला होता. यामुळे योगींना तेवढे आव्हान नव्हते. परंतु अयोध्येत प्रचारात अडकून राहण्यापेक्षा योगींनी आपल्या प्रभाव क्षेत्रातच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असावा. योगी अयोध्येतून लढल्यास भाजपला हिंदुत्वाचा कार्यक्रम राबविण्यासाठी सोपे गेले असते. पण योगी किंवा भाजपने अयोध्या टाळले. अजून अयोध्येतील उमेदवाराच्या नावाची धोषणा झालेली नाही. योगी हे अयोध्येतून म्हणजे दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असे मानणारा एक वर्ग अजूनही भाजपमध्ये आहे.

अयोध्येऐवजी गोरखपूरची निवड वैयक्तिक की पक्षादेश?

पक्ष आदेश देईल अशा कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवीन, असे योगींनी जाहीर केले होते. गोरखपूर या पारंपरिक बालेकिल्ल्यातून त्यांची उमेदवारी जाहीर झाली. योगींनी अयोध्येऐवजी गोरखपूरमधून लढण्याचा निर्णय घेतला की पक्षाने तो घेतला हे गुलदस्त्यात आहे. कारण योगी हे अयोध्येतून लढल्यास हिंदुत्वाचा चेहरा म्हणून योगींचे नाव झाले असते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची योगी जास्त मोठे होऊ नये अशी इच्छा असावी. हे सारे जर-तरवर आधारित असले तरी हिंदुत्वाचा चेहरा म्हणून भाजपाने पुढे आणलेल्या योगींना गोरखपूरमधून विक्रमी मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी पक्षावर राहील.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained why yogi adityanath will fight from gorakhpur instead of ayodhya up assembly election 2022 sgy

Next Story
विश्लेषण : पाकिस्तानचे नवीन सुरक्षा धोरण : नवे काय? जुने काय?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी