सध्या कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ मधील पहिल्या फेरीचा टप्पा जवळपास संपत आला आहे. एकीकडे ही स्पर्धा पुढील टप्प्याकडे प्रवेश करत असतानाच दुसरीकडे करोना आणि मंकीपॉक्सच्या (एमपॉक्स) संसर्गासंदर्भात आवश्यक ती सर्व खबरदारी आयोजकांकडून घेतली जात आहे. लाखो फुटबॉल चाहते फिफा वर्ल्ड कपचे सामने पाहण्यासाठी कतारमध्ये दाखल झालेले असतानाच आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच एडब्लूएचओने एक धोक्याचा इशारा दिला आहे. एडब्लूएचओने कतारमधील फुटबॉल चाहत्यांना ‘कॅमल फ्लू’चा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘न्यू मायक्रोब अॅण्ड न्यू इनफेक्शन’ या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तनुसार फुटबॉल वर्ल्ड कपच्या निमित्ताने कतारमध्ये दाखल झालेल्या चाहत्यांना ‘मिडल ईस्ट रेस्पिरेट्री सिंड्रोम’ म्हणजेच एमईआरएसचा संसर्ग होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. एमईआरएसला ‘कॅमल फ्लू’ नावानेही ओळखलं जातं. हा विषाणू करोनाच्या विषाणूपेक्षा अधिक घातक असून या संसर्गामध्ये मृत्यूचं प्रमाणही करोनापेक्षा अधिक आहे. मात्र थेट जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा दिलेला हा कॅमल फ्लू नेमका आहे तरी काय? तो कसा पसरतो? त्याची लक्षणं काय? त्यावरील उपचार कोणते यासारख्या गोष्टींबद्दल अनेकांना कल्पना नसते. याच साऱ्या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा…

‘कॅमल फ्लू’ म्हणजे काय?

करोनाप्रमाणेच ‘कॅमल फ्लू’ हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार आहे. ‘कॅमल फ्लू’ला शास्त्रीय भाषेमध्ये ‘मिडल ईस्ट रेस्पिरेट्री सिंड्रोम’ असं म्हटलं जातं. हा संसर्ग ज्या विषाणूमुळे होतो तो सुद्धा करोना विषाणूच्या उपप्रकारामधील भाग आहे. एमईआरएस-कोव्ही या विषाणूमुळे ‘कॅमल फ्लू’चा संसर्ग होतो. २०१२ साली सौदी अरेबियामध्ये ‘कॅमल फ्लू’चा पहिला रुग्ण आढळून आला होता. ‘कॅमल फ्लू’च्या संसर्गाचा त्रास वाढल्यास त्यामधून निमोनियाचा धोका संंभावतो. म्हणजेच ‘कॅमल फ्लू’चा संसर्ग झालेल्या गंभीर अवस्थेतील रुग्णाची श्वसन यंत्रणा काम करणं बंद करते. अशा रुग्णांना व्हेंटिलेटरच्या सहाय्याने कृत्रिम पद्धतीने ऑक्सिजनचा पुरठवा करावा लागतो. या रुग्णांवर अतिदक्षता विभागात म्हणजेच आयसीयूमध्ये उपचार करावे लागतात.

नक्की वाचा >> Zombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती

या विषाणूची उत्पत्ती कधी आणि कुठे झाली?

‘कॅमल फ्लू’ हा झोनोटिक प्रकारातील विषाणू आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या विषाणूचा इतर प्राण्यांकडून मानवाला संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू प्रामुख्याने पाठीवर एक उंचवटा असलेल्या उंटांच्या प्रजातीमधून मानवामध्ये पसरतो. उंटांच्या सर्व प्रजातींपैकी ही सर्वाधिक उंचीच्या उंटांची प्रजाती आहे. हे उंट खास करुन शर्यतीसाठी आणि प्रवासासाठी वापरले जातात. त्यामुळे या उंटांशी स्पर्शाच्या माध्यमातून मानवाचा थेट संबंध येतो. हे असे उंट प्रामुख्याने पश्चिम मध्य आशिया, आफ्रिका आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये आढळून येतात. ‘कॅमल फ्लू’चा संसर्ग उंटांच्या माध्यमातून होतो म्हणूनच त्याला बोलीभाषेमध्ये ‘कॅमल फ्लू’ असं नाव पडलं आहे.

‘कॅमल फ्लू’ची लक्षणं कोणती?

‘कॅमल फ्लू’ची सर्वसामान्य लक्षणं म्हणजे ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे. मात्र काही प्रकरणांमध्ये रुग्णांना आतड्यासंदर्भातील डायरियासारख्या समस्याही उद्भवतात.

‘कॅमल फ्लू’चा संसर्ग कसा होतो?

‘कॅमल फ्लू’चा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संपर्कात आल्यास या विषाणूचा मानवाकडून मानवाला संसर्ग होतो. नेमक्या कोणत्या पद्धतीने या विषाणूचा प्रसार होतो हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी करोना प्रमाणेच नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या अंशातून म्हणजेच ड्रॉपलेट्समधून या श्वसनासंदर्भातील आजाराचा प्रादुर्भाव होतो असं सांगितलं जातं. यापूर्वी अशाप्रकारे संसर्गाची प्रकरणं ही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्ती तसेच आरोग्य क्षेत्रामधील व्यक्तींमध्ये दिसून आली आहेत.

‘कॅमल फ्लू’ किती धोकायदाक आहे?

‘कॅमल फ्लू’ हा करोनापेक्षाही धोकादायक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार या विषाणूचा संसर्ग झालेल्या १०० लोकांपैकी ३५ जणांचा मृत्यू होतो.

‘कॅमल फ्लू’चा धोका कोणाला अधिक असतो?

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार या विषाणूचा सर्वाधिक प्रभाव वयस्कर व्यक्तींवर होतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींबरोबरच तसेच आधीपासून काही गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, हृदयरोग, कॅन्सर, फुफ्फुसांचे आजार, मधुमेह अशा समस्या असलेल्यांनाही ‘कॅमल फ्लू’ घातक ठरु शकतो.

‘कॅमल फ्लू’वर उपचार उपलब्ध आहेत का?

सध्या ‘कॅमल फ्लू’वर कोणतीही लस उपलब्ध नाही. तसेच कोणतेही ठराविक औषध या आजारासाठी उपलब्ध नाही. त्यामुळेच रुग्णांमध्ये दिसणारी लक्षणं आणि इतर औषधांच्या आधारे या संसर्गावर उपचार केले जातात. याच कारणाने या आजाराची साथ पसरणार नाही याची दक्षता घेणं अधिक सोयीचं असल्याचं आरोग्यविषयक जाणकार सांगतात.

‘कॅमल फ्लू’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करता येईल?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार दैनंदिन स्वच्छता ठेवणे हा यावरील सर्वोत्तम बचावात्मक मार्ग आहे. यात प्राण्यांना हात लावल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुणे, प्राण्यांच्या संपर्कात आल्यास स्वच्छतेसंदर्भातील नियमावली पाळूनच अन्न, पाणी सेवन करणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. आजारी प्राण्यांच्या संपर्कात आल्यास अधिक काळजी घेण्याचाही सल्ला दिला जातो.

त्याचप्रमाणे प्राण्यापासून मिळणारे अन्नपदार्थ, द्रव्य सेवन करताना काळजी घेणे ही महत्त्वाचं असतं. यामध्ये उंटाचं दूध, मांस आणि त्यापासून मिळणाऱ्या इतर पदार्थांचाही समावेश होतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup who warns of deadly camel flu know all about its causes symptoms transmission and faq scsg
First published on: 30-11-2022 at 17:15 IST