Protected Monuments Missing in India : सरकार देशभरातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या महत्त्वाच्या वास्तू, इमारती, स्मारके आणि जागांना संरक्षित करतं. यासाठी या स्थळांना संरक्षित स्थळांच्या यादीत समाविष्ट केलं जातं. सध्या केंद्र सरकारने संरक्षित केलेली देशभरात ३ हजार ६९३ स्मारकं आहेत. मात्र, यातील ५० स्मारकं चक्क बेपत्ता झाली आहेत. विशेष म्हणजे ही माहिती इतर कोणी नाही, तर खुद्द केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने संसदेत दिली आहे. या पार्श्वभूमीवर ही स्मारकं नेमकी कशी गायब झाली? संरक्षित स्मारकं बेपत्ता आहेत याचा नेमका अर्थ काय? आता बेपत्ता स्मारकांचं पुढे काय होणार? याचा हा आढावा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय महत्त्व असणाऱ्या पुरातन स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने प्राचीन स्मारकं, पुरातत्व स्थळं आणि अवशेष कायदा (AMASR Act) तयार केला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआई) याच कायद्यानुसार काम करतो. या कायद्यानुसार १०० वर्ष जुन्या मंदिर, स्मारक, किल्ला, महाल, गुफा अशा स्थळांना संरक्षित केलं जातं. नियमानुसार, पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना नियमितपणे या स्थळांना भेटी देऊन पाहणी करावी लागते. तसेच देखभाल करावी लागते.

स्मारकं नेमकी गायब कशी होतात?

१८६१ मध्ये पुरातत्व खात्याच्या स्थापनेनंतर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विविध ऐतिहासिक स्थळे आणि वास्तूंना संरक्षित स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. मात्र, देशाला स्वातंत्र्या मिळाल्यानंतर सरकारने आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या निर्माणावर भर दिला. पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनुसार, वाढतं शहरीकरण आणि धरणांच्या निर्मितीमुळे देशातील अनेक ऐतिहासिक वारसा असलेली स्थळं नष्ट होत आहेत. पुरातत्व खात्याने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, १४ संरक्षित स्थळं शहरीकरणामुळे गायब झाली आहेत. १२ स्थळं धरणांच्या पाण्यात बुडाली आहेत. याशिवाय २४ संरक्षित स्थळांचं काय झालं, ते कसे गायब झाले याबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही.

संरक्षित स्थळांपैकी केवळ २४८ ठिकाणी सुरक्षारक्षक

पुरातत्व खात्याने दिलेल्या माहितीनुसार, एकू ण ३,६९३ संरक्षित स्थळांपैकी केवळ २४८ स्थळांवर सुरक्षारक्षक तैनात आहे. या २४८ स्थळांवर २,५७८ सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.

संरक्षित स्मारकं गायब होण्याची ही पहिली वेळ आहे का?

विशेष म्हणजे पुरातन खात्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यानंतर संरक्षित स्थळांचा व्यापक सर्व्हेच झालेला नाही. २०१३ मध्ये कॅगच्या एका अहवालात केंद्राने संरक्षित केलेल्या स्थळांपैकी एकूण ९२ स्थळं गायब आहेत. पुरातन विभागाकडे नेमके किती संरक्षित स्थळं आहेत याबाबत माहिती देणारा कोणताही विश्वासार्ह अहवाल नसल्याचंही कॅगने नमूद केलं होतं. या अहवालात अधिकाऱ्यांकडून या स्थळांची पाहणी करण्याची शिफारस होती, मात्र, त्याचंही पुढे काहीच झालं नाही.

नेमके कोणते संरक्षित स्थळे गायब?

कॅगच्या अहवालानुसार, बेपत्ता झालेल्या ९२ संरक्षित स्थळांपैकी ४२ स्थळं सापडली आहेत. मात्र, उर्वरित ५० स्थळांची माहिती मिळालेली नाही. या ५० पैकी २६ स्थळं का गायब झालीत याचीही कारणं समजली आहेत. मात्र, २४ ठिकाणांची काहीही माहिती उपलब्ध नाही.

हेही वाचा : विश्लेषण : शिवाजीमहाराजांच्या तलवारीचा इतिहास काय? ती इंग्लंडच्या राजाला कोणी आणि का दिली? वाचा…

गायब संरक्षित स्थळांपैकी ११ उत्तर प्रदेशमध्ये, दिल्ली आणि हरियाणात प्रत्येक दोन, आसाम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधूनही काही स्थळं बेपत्ता आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historical 50 protected monuments missing in india know why what happened pbs