स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिक पदकवीर अशी मराठमोळे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांची ख्याती. खाशाबांनी १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्तीच्या बँटमवेट गटात ब्राँझ पदक जिंकले. त्यांची ही झेप पूर्णपणे स्वयंस्फूर्त होती. गावातल्यांची आणि खाशाबांच्या महाविद्यालयातील मुख्याध्यापकांची मदत मिळाली नसती, तर खाशाबांना ऑलिम्पिकपर्यंत पोहोचताच आले नसते. त्यांची कहाणी कुस्तीऐवजी खरे तर अडथळ्यांच्या शर्यतीची अधिक ठरते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लहानपणापासूनच कुस्तीचा लळा…

सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील गोलेश्वर गावात खाशाबांचा जन्म झाला. त्यांचे वडील दादासाहेब जाधव स्वतः नावाजलेले पैलवान होते. त्यांनी खाशाबांना वयाच्या पाचव्या वर्षापासून कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली. घरात आणि घराण्यात कुस्तीचेच वातावरण होते. खाशाबांचे भाऊही कुस्तीगीर होते. खाशाबा कुस्तीप्रमाणेच जलतरण, धावणे, मलखांब अशा इतर खेळांमध्येही निपुण होते. अर्थात कुस्तीमध्ये त्यांना विशेष रस होता. कुस्ती खेळत असताना महाविद्यालयीन शिक्षणाकडेही त्यांनी जातीने लक्ष पुरवले. बाबूराव बलवडे आणि बेलापुरे गुरुजी हे त्यांचे कुस्तीमधील गुरू.

हेही वाचा : कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा; ‘या’ ३ औषधांच्या किमतीत घट, रुग्णांना कसा होणार फायदा?

१९४८ लंडन ऑलिम्पिक…

कोल्हापूरच्या महाराजांच्या मदतीने खाशाबांना १९४८मधील ऑलिम्पिकसाठी लंडनवारी करता आली. वास्तविक मॅटवर खेळण्याची किंवा आधुनिक कुस्ती खेळण्याची त्यांची खासियत नव्हती. पण अमेरिकन प्रशिक्षक रीस गार्डनर यांनी त्यांच्यातली नैसर्गिक गुणवत्ता हेरली. त्या स्पर्धेत खाशाबा फ्लायवेट गटात उतरले. त्यांना ‘पॉकेट डायनॅमो’ असे संबोधले जाऊ लागले. पहिल्याच फेरीत त्यांनी बर्ट हॅरिस या ऑस्ट्रेलियाच्या मातब्बर मल्लाला मात दिली. पुढे आणखी एक अमेरिकन मल्लाला त्यांनी सहज हरवले. मात्र एका इराणी मल्लाकडून हार पत्करावी लागली आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

हेलसिंकी ऑलिम्पिकसाठी धावपळ…

लंडन ऑलिम्पिकमधील अपयशानंतर खचून न जाता त्यांनी कसून सराव केला. बँटमवेट गटामध्ये उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या स्पर्धेस जाण्यासाठी निधी जमवण्याचे आव्हान होते. ते ज्या राजाराम कॉलेजमध्ये शिकले, त्याचे प्राचार्य खर्डीकर यांनी स्वतःचे घर गहाण ठेवून ७ हजार रुपये उभे केले. ग्रामस्थांनी निधी गोळा करून खाशबांसाठी बूट आणि पोशाखाची व्यवस्था केली. तत्कालीन मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे खाशाबांनी ४ हजार रुपयांची मागणी केली. पण ऑलिम्पिकनंतर पाहू, असे त्यावेळी त्यांना सांगितले गेले!

हेही वाचा : आसामचे पिरॅमिड म्हटलं जाणाऱ्या चराईदेव मोईदामला हेरिटेज दर्जा; काय आहे या ठिकाणाचं महत्त्व?

प्रतिकूल परिस्थितीत ब्राँझ पदक!

मॅटवरील कुस्तीचा पुरेसा अनुभव खाशाबांना भारतात मिळू शकत नव्हता. त्यामुळे गुणवत्ता असूनही काही वेळा तांत्रिक गुण त्यांच्या विरोधात जायचे. कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात सफाईने जिंकल्यानंतर चौथ्या फेरीत त्यांना बाय मिळाला. पाचव्या फेरीत रशियाच्या राशीद मामादबेयॉवसमोर त्यांना संधी होती. पण थकलेले असल्यामुळे त्यांना मनासारखा खेळ करता आला नाही आणि ते पराभूत झाले. तरीदेखील पदकांच्या फेरीत ते दाखल झाले. तेथे जपानच्या शोहाची इशी या पैलवानासमोर खाशाबांनी चांगली लढत दिली. पण तरीही त्यांना ०-३ अशी हार पत्करावी लागली आणि ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. तरीदेखील भारताच्या पहिल्या-वहिल्या वैयक्तिक पदकाचे मोल होतेच.

ऑलिम्पिक वैयक्तिक पदकाचे मोल

त्यावेळेपर्यंत भारताला केवळ हॉकीमध्ये पदके मिळत होती. तर नॉर्मन प्रीचार्ड यांनी १९००मधील ऑलिम्पिकमध्ये ब्रिटिश भारतासाठी दोन पदके जिंकली होती. पण खाशाबांनंतर वैयक्तिक ऑलिम्पिक भारताला मिळण्यासाठी १९९६ साल (लिअँडर पेस) उजाडावे लागले. तर कुस्तीतील पदकासाठी आणखी ५६ वर्षे वाट पाहावी लागली. यावरून खाशाबांच्या कामगिरीचे मोल लक्षात येते.

हेही वाचा : विश्लेषण : भारतीय पासपोर्टची ‘पत’ ढासळली… धनवान भारतीय म्हणूनच परदेशात जातात?

उपेक्षा… ऑलिम्पिकदरम्यान आणि नंतरही!

पदक जिंकून भारतात परतल्यानंतर दिल्ली किंवा मुंबईतही खाशाबांचा कोणताही जाहीर सत्कार वगैरे झाला नाही. कराड रेल्वेस्थानकात आणि त्यांच्या गावी मात्र खाशाबांचे जंगी स्वागत झाले. परतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलिसात सब-इन्स्पेक्टरच्या नोकरीसाठी अनेक विनंत्या, अर्ज केले. अखेरीस १९५५मध्ये त्यांना नोकरी मिळाली. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांना पदाधिकाऱ्यांकडून कोणतेही मार्गदर्शन वा मदत मिळाली नाही. दोन मोक्याच्या कुस्त्यांदरम्यान ३० मिनिटांचे अंतर असावे असा नियम होता. पण तो भारतीय पदाधिकाऱ्यांनाच माहीत नव्हता. ही मंडळी तेथे केवळ पर्यटन आणि शॉपिंगसाठी गेली होती, असे खाशाबांनी नंतर उद्विग्नपणे सांगितले. परतल्यानंतरही त्यांनी कुस्त्यांमधून पैसे जमवले आणि मदतीसाठी घेतलेले पैसे प्रथम फेडले. त्यांना कुस्तीतील बारकाव्यांची जाण होती आणि ते उत्तम प्रशिक्षक बनू शकले असते. पण सरकारी आणि कुस्ती संघटनात्मक पातळीवर त्यांच्या पदरी उपेक्षाच आली. अनेक प्रयत्न केल्यानंतर निवृत्तीच्या आधी सहा महिने त्यांना सहायक पोलीस आयुक्तपदावर बढती मिळाली. पण लवकरच एका अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांना शिवछत्रपती आणि अर्जुन पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला. पण ऑलिम्पिक पदक जिंकूनही पद्म पुरस्कार मिळू न शकलेले ते एकमेव ठरतात, ही खंत त्यांच्या चाहत्यांना आजही आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How khashaba jadhav won the first individual olympic medal for independent india print exp css