रिओ दी जानेरो आणि टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा ब्राझीलचा पुरुष फुटबॉल संघ या वेळी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही. विश्वचषक फुटबॉल २०२६च्या पात्रता फेरीतही ब्राझीलची स्थिती फारशी चांगली नाही. सध्या ते सहाव्या स्थानावर आहे. प्रमुख खेळाडूंचे संघाबाहेर जाणे किंवा जायबंदी असणे यामुळे मैदानावर ब्राझील संघ संकटात सापडला आहे. मैदानाबाहेर संघटनात्मक वादाने त्यांना घेरले आहे. ऑलिम्पिकच्या अपात्रतेने हा वाद नव्याने समोर आला आहे. या सगळ्या परिस्थितीचा मागोवा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्राझीलमधील फुटबॉलवेड्यांसाठी धक्का?

ब्राझीलचा संघ २००४ नंतर प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यास अपयशी ठरला आहे. ब्राझीलला पारंपरिक प्रतिस्पर्धी अर्जेंटिनाकडून पराभव पत्करावा लागला. फुटबॉलवेड्या ब्राझीलसाठी हा नक्कीच मोठा धक्का आहे. त्यापूर्वी २०२६च्या विश्वचषक पात्रता स्पर्धेतही अर्जेंटिनाने वरिष्ठ खेळाडूंचा समावेश असलेल्या ब्राझीलला पराभूत केले होते. त्यामुळे विश्वचषक पात्रता दक्षिण अमेरिका विभागात ब्राझीलचा संघ सध्या सहाव्या स्थानावर आहे. फुटबॉल विश्वातील स्वत:ची वेगळी ओळख असलेल्या ब्राझीलसाठी ही परिस्थिती नक्कीच चांगली नाही.

हेही वाचा : विश्लेषण : रेल्वेतील करोनापूर्व सवलती पूर्ववत का होत नाहीत? न्यायालयाच्या संतापाने परिस्थिती बदलेल?

ब्राझीलच्या संघावर ही वेळ का आली?

नियोजनबद्ध खेळ हे ब्राझीलच्या फुटबॉल व्याख्येतच बसत नाही. तरी फुटबॉल विश्वात ब्राझील आपली आब राखून आहे. त्यांच्या इतका आक्रमक खेळ कदाचित अलीकडच्या काळात कोणी करू शकत नाही. त्यांचा कुमारवयीन खेळाडू एन्ड्रिक हे याचे उदाहरण आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एन्ड्रिक आणि नेयमारने एकत्र खेळावे हे ब्राझीलच्या फुटबॉल चाहत्यांचे स्वप्न होते. मात्र, १७ वर्षीय एन्ड्रिकलाच संपूर्ण पात्रता स्पर्धेत फारसे यश मिळाले नाही. तो केवळ दोन गोल करू शकला. तुलनेत अर्जेंटिनाच्या विश्वचषक विजेत्या संघातील आक्रमक मध्यरक्षक थिएगो अल्माडाने पाच गोल केले. प्रमुख खेळाडूंनाच अपयश आल्याने ब्राझीलची फुटबॉलच्या मैदानावर बिकट अवस्था झाली आहे.

ब्राझीलच्या वरिष्ठ संघाची सध्याची स्थिती काय?

ब्राझीलच्या वरिष्ठ संघाची स्थिती फार काही वेगळी नाही. विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत ते सध्या सहाव्या स्थानावर आहेत. नेयमार हा ब्राझीलचा वलयांकित खेळाडू अजून गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही. अर्जेंटिनाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पात्रता फेरीत ब्राझील उरुग्वे आणि कोलंबियाकडूनही पराभूत झाले आहेत. व्हिनिशियस ज्युनियर आणि रॉड्रिगो आपली छाप पाडू शकलेले नाहीत. अशा वेळी एन्ड्रिकची साथ घेऊन ब्राझील कोपा अमेरिका स्पर्धेत आपल्या आक्रमाणाला बळ देऊ पाहत आहे. आता मार्चमध्ये ब्राझील संघ इंग्लंड आणि स्पेनविरुद्ध मैत्रीपूर्ण लढती खेळणार आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता निकालाने नवा गोंधळ?

अलीकडच्या अपयशामागील कारणे काय?

ब्राझीलचे खेळाडू हे प्रशिक्षकाचे नसतातच. ते स्वतःच्या नैसर्गिक शैलीत खेळत असतात. मात्र, त्यांना एकत्र ठेवण्यासाठी एका व्यवस्थापकाची गरज असते. व्यवस्थापक हे पद ब्राझील महासंघाला व्यवस्थित नियुक्त करता आले नाही. रेयाल माद्रिदचे कार्लो अँचेलॉटी यांच्यासाठी ब्राझील महासंघ तब्बल एक वर्ष वाट बघत बसला. कंटाळून त्यांनी फर्नांडो दिनीझ यांची हंगामी म्हणून नियुक्ती केली. त्यांचा कुठे जम बसतो, तोच त्यांना डावलून या वर्षाच्या सुरुवातीला डोरिव्हल ज्युनियरची नियुक्ती केली. आता विश्वचषकासाठी ब्राझीलची गाडी रुळांवर आणण्यासाठी वेळ पुरेसा नसल्यामुळे डोरिव्हल यांच्यावरील दबाव वाढला आहे.

ब्राझील फुटबॉलची मैदानाबाहेरची परिस्थिती काय?

ब्राझील फुटबाॅलमधील संघटनात्मक पेच वाढला आहे. अध्यक्ष रॉड्रिग्ज यांना पद सोडण्याचा आग्रह होता. निवडणुकीतील अनियमिततेमुळे रियो दी जानेरो न्यायालयाने त्यांना पदावरून तात्पुरते दूर केले होते. परंतु, ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ते परत आले. आता हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ आहे. अशातच सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे ‘फिफा’नेही ब्राझीलवर कारवाई करण्याची तयारी दाखवली आहे.

हेही वाचा : सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा? 

यापूर्वी ऑलिम्पिकसाठी कधी अपात्र?

जेवढे विश्वचषक स्पर्धेसाठी अपात्र ठरणे लाजिरवाणे असते, तितके ऑलिम्पिक अपात्रतेला महत्त्व नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत २३ वर्षांखालील खेळाडू खेळत असतात. ऑलिम्पिकसाठी ब्राझील यापूर्वी दोनदा अपात्र ठरले आहे. १९९२च्या अपात्र ठरलेल्या संघात काफू, मार्सिओ सँटोस, राबर्टो कार्लोस अशा दिग्गजांचा समावेश होता. तरी ते अपात्र ठरले. मात्र, पुढे जाऊन याच खेळाडूंसह ब्राझीलने विश्वचषक जिंकला. त्यानंतर २००४च्या ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरलेल्या संघात मायकॉन आणि रॉबिनियो यांचा समावेश होता. मात्र, या संघाची विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी लौकिकास साजेशी झाली होती. सध्याच्या संघात गुणवान खेळाडू आहेत, पण त्यांना अद्याप म्हणावे तसे यश मिळवता आलेले नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How the brazilian men s football team disqualified for the paris 2024 olympics print exp css