Indus valley civilization इंग्रज भारतात आले तोपर्यंत भारतीय उपखंडाने आपली बरीचशी समृद्धी गमावली होती. त्यामुळे भारत हा इतिहासात कितीही संपन्न देश असला तरी या कालखंडात मात्र गरीब, अशिक्षित अशीच भारताची प्रतिमा इंग्रजांसमोर होती. याच कारणामुळे भारताला काही संस्कृती असू शकते यावर या पश्चिमात्य लोकांचा विश्वासच नव्हता, त्यामुळेच त्यांच्याकडून त्याच दृष्टिकोनातून भारताचा इतिहास लिहिला गेला. परंतु त्यांच्या या विश्वासाला तडा जाणारी एक गोष्ट १९२० च्या दशकात घडली; ती म्हणजे एका रेल्वेमार्गाचं काम सुरु असताना काही प्राचीन अवशेष आपले अस्तित्त्व दाखवत अवतीर्ण झाले… आणि जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. प्राचीन अवशेषांची ही संस्कृती सिंधू, हडप्पा, सरस्वती अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली गेली. या संस्कृतीने भारतीय इतिहासातील नागरीकरणाचा पहिला टप्पा जगासमोर आणला. इतकेच नाही तर भारतीय इतिहासात किमान ५००० वर्षांपासून लेखनकला अवगत होती हेही उघड झाले. तत्कालीन लिपी सिंधू किंवा हडप्पा लिपी म्हणून ओळखली जाते.

अधिक वाचा: प्राचीन भारताची सिंधू संस्कृती निरक्षर होती का?

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

या संस्कृतीच्या प्रथम उत्खननाचे श्रेय

सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटीश पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाने १९२० च्या दशकात सिंधू संस्कृतीचे अवशेष पहिल्यांदा शोधले, तेव्हापासून सिंधू लिपी एक कोडेच राहिले आहे. आता सुमारे एका शतकापासून पुरातत्वशास्त्रज्ञ, शिलालेख अभ्यासक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहासकार, वैज्ञानिक आणि इतर अभ्यासकांनी लिपीचा उलगडा करण्यासाठी १०० हून अधिक प्रयत्न केले आहेत, परंतु त्यांना फारसे यश मिळालेले नाही.

सिंधू लिपीची वैशिष्ट्ये

सिंधू लिपी ही चित्रलिपी आहे. त्यामुळे या लिपितील अक्षरांचा उल्लेख चिन्ह म्हणून करण्यात येतो. या चिन्हांचा वापर करून लिहिलेले लेख खूपच लहान आहेत, त्यामुळे ही लिपी नक्की लेखनप्रणाली होती का याविषयी अभ्यासकांमध्ये मतैक्य नाही. या चित्रलेखन लिपीचा उलगडा करण्यात तज्ज्ञांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. ही लिपी बौस्ट्रोफिडन (boustrophedon) आहे, बौस्ट्रोफिडन पद्धतीत एका ओळीत उजवीकडून डावीकडे आणि पुढच्या ओळीत डावीकडून उजवीकडे लिहिले जाते.

सिंधू लिपी इसवी सन पूर्व ३५०० ते २७०० या कालखंडात विकसित झाली असे मानले जाते. हडप्पाकालीन मुद्रा, मातीच्या भांड्यांसारख्या अनेक वस्तूंवर ही लिपी सापडलेली असली, तरी या लिपीचा उगम नक्की कोणता आणि केव्हा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आजही ही लिपी गूढ असली तरी काही अभ्यासकांनी या चिन्हात्मक लिपीतील संख्या ओळखण्याचा दावा केला आहे. सिंधू लिपी ही लोगो-सिलेबिक आहे. या लिपितील काही वर्ण कल्पना किंवा शब्द व्यक्त करतात, तर काही ध्वनी दर्शवतात.

नवीन संशोधनातून या लिपीचा उलगडा होणार का?

बंगळुरूस्थित एका सॉफ्टवेअर अभियंत्याने अलीकडेच प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात या लिपी संदर्भात नवीन संशोधन मांडले आहे. या शोध निबंधात नमूद केल्याप्रमाणे सिंधू लिपीत वेगवेगळ्या चिन्हांचा समावेश आहे. सिंधूकालीन वसाहतींमध्ये वेगवगेळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश होता, पुरातत्त्वीय सर्वेक्षणात सापडलेल्या या प्रतिकात्मक चिन्हांच्या माध्यमातून त्यांच्यात संवाद साधला जात होता, असा तर्क मांडण्यात आला आहे. बहता अनसुमाली मुखोपाध्याय या २०१४ पासून सिंधू लिपीवर संशोधन करत आहेत. त्यांच्या संशोधानुसार प्रत्येक सिंधूकालीन चिन्ह विशिष्ट अर्थ दर्शविते आणि ही लिपी प्रामुख्याने व्यावसायिक हेतूंसाठी वापरली गेली. नेचर ग्रुप ऑफ जर्नल – ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस कम्युनिकेशन्स, खंड १०, लेख क्रमांक: ९७२ (२०२३) मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या शोधनिबंधात मुखोपाध्याय स्पष्ट करतात की, चिन्ह कोरलेले सिंधू सील/ मुद्रा प्रामुख्याने टॅक्स स्टॅम्प म्हणून वापरली जात होती, तर टॅब्लेटचा वापर कर संकलन, हस्तकला किंवा व्यापार परवाना म्हणून केला जात होता. लोकप्रिय समजुतींनुसार, सिंधू लिपी धार्मिक हेतूंसाठी वापरली जात होती किंवा प्राचीन वैदिक किंवा तमिळ देवतांची नावे त्यात कोरलेली होती. परंतु सिंधू लिपी वाचण्याचा असा कोणताही प्रयत्न मूलतः सदोष आहे, असे त्या नमूद करतात. मुखोपाध्याय यांचे संशोधन पूर्णतः स्वीकारले जाणे या गोष्टीला अवकाश असला तरी, सिंधू लिपी आणि भाषेचा वर्षानुवर्षे अभ्यास आणि उलगडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्वानांच्या लहान परंतु वैविध्यपूर्ण गटात यामुळे नक्कीच खळबळ उडाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिंधू लिपीविषयी निरनिराळ्या अभ्यासकांनी केलेले संशोधन समजून घेणे महत्त्वाचे ठरणारे आहे.

अधिक वाचा: तब्बल ९३ वर्षांनी मोहेंजोदारोमध्ये सापडला ‘हा’ खजिना! 

सिंधू लिपी आणि वादविवाद

सिंधू संस्कृती इसवी सनपूर्व २६०० ते इसवी सन पूर्व १९०० या कालखंडादरम्यान प्रगतीच्या शिखरावर पोहोचली होती. आधुनिक काळातील पाकिस्तान आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागांवर सुमारे आठ लाख चौरस किलोमीटरच्या विस्तृत क्षेत्रामध्ये ती पसरली होती. जगातील तत्कालीन सर्वात विस्तृत व्यापार, कर आकारणी आणि ड्रेनेज सिस्टम असलेली व्यापक शहरी संस्कृती होती या विषयी विद्वानांमध्ये एकमत आहे, हे विशेष. सिंधू लिपी पुरातत्त्वीय उत्खननात सापडलेल्या सील, मृण्मय मुद्रा आणि क्वचित धातूच्या चौकोनी तुकड्यावरही आढळते. त्यावर अनेकदा लिपीसह प्राणी किंवा मानवी आकृतिबंधही कोरलेले असतात.

सिंधू लिपीमध्ये असलेल्या चिन्हांच्या संख्येवर विद्वानांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून मतभेद आणि वादविवाद आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञ एस. आर. राव यांनी १९८२ मध्ये या लिपीमध्ये फक्त ६२ चिन्हे असल्याचे नमूद केले होते. परंतु फिनिश इंडॉलॉजिस्ट आस्को पारपोला यांनी याचे खंडन केले, त्यांनी १९९४ मध्ये ही संख्या ४२५ असल्याचे नोंदविले. तर अलीकडेच २०१६ साली, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि एपिग्राफर ब्रायन के वेल्स यांनी सिंधू लिपीत ६७६ चिन्ह असल्याचे नोंदले आहे. सिंधू लिपी कोणत्या भाषेवर आधारित आहे यावर विद्वानांचे एकमत अद्याप होऊ शकले नाही. हडप्पा आणि मोहेंजोदारो येथील अवशेषांना सिंधू संस्कृतीचा एक भाग म्हणून ओळखले जाण्याच्या खूप आधी, सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांना हडप्पा येथे पहिली मुद्रा सापडली होती. काही वर्षांनंतर त्यांनी असे सुचवले होते की, या मुद्रेवर ब्राह्मी लिपीची चिन्हे आहेत जी दक्षिण आणि आग्नेय आशियातील २०० पेक्षा जास्त लिपींची पूर्वज आहे. कनिंगहॅम यांच्यानंतर, इतर अनेक विद्वानांनीही सिंधू लिपी ब्राह्मीशी जोडण्याच्या बाजूने युक्तिवाद केला.

अधिक वाचा: तृतीयपंथीयांचे संदर्भ सांगणाऱ्या पौराणिक कथा !

एकूणच भारताच्या सर्वात प्राचीन लिपीचा आजही उलगडा झालेला नाही. अभ्यासक आपापल्या परीने संशोधन करत आहेत. ज्या दिवशी या लिपीचा निर्विवाद उलगडा होईल, त्या दिवशी निश्चितच भारतीय इतिहासातील एक अज्ञात पर्व जगासमोर खुले होईल. असे असले तरी सध्या नव्या संशोधनामुळे पुन्हा एकदा या लिपीविषयीच्या अभ्यासकांमध्ये खळबळ माजली आहे, हे खरे!

Story img Loader