विश्लेषण: सायबर फसवणुकीतील रक्कम कशी वाचवावी? ‘गोल्डन अवर’ का महत्त्वाचा? | How to retrieve money lost in cyber fraud and what is Golden Hour Print exp scsg 91 | Loksatta

विश्लेषण: सायबर फसवणुकीतील रक्कम कशी वाचवावी? ‘गोल्डन अवर’ का महत्त्वाचा?

यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत मुंबईत सायबर फसवणुकीचे १८१७ गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी याच काळात ९१७ सायबर फसवणुकीचे गुन्हे मुंबईत दाखल झाले होते.

विश्लेषण: सायबर फसवणुकीतील रक्कम कशी वाचवावी? ‘गोल्डन अवर’ का महत्त्वाचा?
मुंबई सायबर पोलिसांची मदतवाहिनी २४ तास कार्यरत नाही. (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

-अनीश पाटील

मुंबई सायबर पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात सायबर फसवणुकीतील एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वाचवली आहे. सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या व्यक्तींसाठी हा मोठा दिलासा म्हणता येईल. मुंबई पोलिसांनी ही रक्कम नेमकी कशी वाचवली, मुंबई पोलिसांच्या या मदतवाहिनीचा फायदा काय, ते  जाणून घेऊया

मुंबईत सायबर फसवणुकीच्या घटना किती?

सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दरवर्षी वाढ होत असल्याचे दिसते आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत मुंबईत सायबर फसवणुकीचे १८१७ गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी याच काळात ९१७ सायबर फसवणुकीचे गुन्हे मुंबईत दाखल झाले होते. या वर्षाची आकडेवारी पाहिली, तर ऑगस्ट महिन्यापर्यंत भेटवस्तू देण्याच्या नावाने फसवणूक झाल्याचे ६७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचबरोबर विक्रीच्या नावाखाली फसवणुकीचे १७२ गुन्हे, नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचे ९२ गुन्हे, बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून फसवणुकीचे ४८ गुन्हे दाखल झाले आहेत.

मुंबई पोलिसांची मदतवाहिनी कोणती?

सायबर गुन्हेगार दूरध्वनी करून सामान्यांच्या बँक खात्यांवर डल्ला मारतात. अशा प्रकरणांना तात्काळ आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी यावर्षी १७ मे रोजी १९३० क्रमांकाची मदतवाहिनी सुरू केली होती. त्यावर दूरध्वनी केल्यास तात्काळ पोलीस पथक फसवणुकीतील रक्कम वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते.

किती रक्कम वाचवण्यात आली आहे?

या मदतवाहिनीच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.  ईमेल फिशिंग, ऑनलाईन जॉब फ्रॉड, क्लासिफाईड फ्रॉड, केवायसी अपडेटच्या नावाखाली होणारी फसवणूक, वधू-वर सूचक संकेतस्थळावरून ओळख करून फसवणूक, समाजमाध्यमांवरून ओळख करून फसवणूक, ओटीपी फसवणूक, सेक्सटॉर्शनसारख्या कुठल्याही फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये लुबाडण्यात आलेली ही रक्कम आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: सायबर दहशतवादासाठी जन्मठेप… अनिस अन्सारीचा गंभीर गुन्हा काय होता?

सायबर मदतवाहिनी २४ तास कार्यरत असते का?

सध्या मनुष्यबळाच्या अभावामुळे ही मदतवाहिनी २४ तास कार्यरत नाही.  सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच ही मदतवाहिनी कार्यरत असते. त्यासाठी दोन अधिकारी व चार पोलिसांचे पथक पूर्णवेळ या काम करतात. मदतवाहिनी  २४ तास कार्यरत ठेवण्यासाठी किमान आणखी चार अधिकारी व आठ कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागेल. त्यानंतरही ही पथके तीन पाळ्यांमध्ये काम करू शकतील.

रक्कम कशी वाचवली जाते?

मदतवाहिनीवर दूरध्वनी केल्यानंतर ज्या बँकेच्या खात्यातून रक्कम गेली आहे त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून ती रक्कम कोणत्या खात्यात जमा झाली याची माहिती मिळवली जाते. त्यानंतर संबंधित बँकेला सांगून त्या खात्यातील व्यवहार गोठवले जातात. ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांच्या बँक खात्यातून ४ लाख ३६ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला होता. त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधल्यामुळे त्यापैकी ३ लाख ८ हजार रुपये गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित रक्कम आरोपीने खात्यातून काढली होती.

फसवणूक आणि त्यानंतर तक्रार यातील कालावधी का महत्त्वाचा?

पूर्वी सायबर गुन्ह्यांमध्ये बँकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल होण्यातच आठवड्याचा कालावधी जायचा. त्याचा फायदा उचलून आरोपी खात्यातील रक्कम काढायचे. त्यामुळे फसवणुकीची माहिती मिळाल्यास सायबर पोलिस प्रथम संबंधित खात्यात गेलेल्या रकमेचा व्यवहार थांबवतात. ज्याप्रमाणे रस्ते अपघातामध्ये अपघात झाल्यानंतर ठराविक कालावधीत जखमी व्यक्तीला उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. त्या कालावधीला गोल्डन अवर्स म्हणतात. तसेच सायबर गुन्ह्यांमध्येही फसवणूक झाल्यानंतर दोन तासांत सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांना पैसे वाचवणे शक्य होते. त्यामुळेच या मदतवाहिनीच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.

नक्की वाचा >> समजून घ्या : ऑनलाइन फसवणूक झाल्यास कुठे, कशी तक्रार करावी?

मदतवाहिनी २४ तास नाही, तरीही रक्कम कशी वाचवता येईल?

मुंबई सायबर पोलिसांची मदतवाहिनी २४ तास कार्यरत नाही. त्यामुळे सायंकाळी सहानंतर फसवणूक झाल्यास या मदतवाहिनीचा उपयोग होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत सायबर फसवणूक झाल्यास  www.cybercrime.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून अपहार झालेली रक्कम वाचवता येऊ शकते. संगणक अथवा इंटरनेटसारख्या गोष्टी उपलब्ध नसतील, तर अशा परिस्थितीत जवळचे पोलीस ठाणे अथवा सायबर विभागाला भेट देऊनही फसवणुकीची रक्कम वाचवता येऊ शकते. सुरुवातीचे दोन तास त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 08:09 IST
Next Story
विश्लेषण: नीति आयोग: त्यांचा आणि आपला..