How to Stop a Heart Attack Immediately at Home : यंदाच्या नवरात्रोत्सवादरम्यान दांडिया खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. २८ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर रेल्वेस्थानक परिसरात एका ३५ वर्षीय विवाहितेचा दांडिया खेळताना मृत्यू झाला. त्याच दिवशी वसईतील ओमनगर परिसरातील ४६ वर्षीय महिलेलाही हृदयविकाराच्या झटक्यामुळे आपले प्राण गमवावे लागले. आपले शरीर व्यवस्थितपणे काम करण्यासाठी हृदय निरोगी राहणे फार गरजेचे असते. आजकाल हृदयविकाराचा धोका केवळ वृद्धांनाच नाही, तर तरुणांमध्येही वाढताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर हृदयविकाराचा झटका येण्याआधीच कसा रोखायचा? काय आहेत उपाय? तज्ज्ञ काय सांगतात? त्या संदर्भातील हा आढावा…
जागतिक आरोग्य संघटनेनेच्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने जगात सर्वाधिक मृत्यू होतात. दरवर्षी जवळपास दोन कोटी लोकांना हार्ट अटॅकने आपले प्राण गमवावे लागतात. पाचपैकी चार लोकांचा मृत्यू हृदयविकाराने होत असल्याचे चिंता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यादरम्यान आपण दररोज हृदयाची काळजी घेतली, तर हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो, असा सल्ला हृदयरोग तज्ज्ञ देतात. साधारणत: एका निरोगी व्यक्तीच्या हृदयाचे ठोके प्रति मिनीट ६० ते १०० असायला हवेत, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. तसे पाहता, हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीरात अनेक लक्षणे दिसतात; पण छातीत अचानकपणे वेदना होणे हे त्याचे सामान्य लक्षण मानले जाते.
हार्ट अटॅक येतोय हे कसे ओळखायचे?
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर अनेकदा संकेत देते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. या आजाराचा तीनदा सामना करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर छातीत होणारी वेदना ही फार तीव्र नसते; पण आपल्या हृदयावर दबाव आल्यासारखे किंवा त्याला कुणीतरी पकडून ठेवल्यासारखे जाणवते. काही व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येत असताना छातीबरोबरच मानेभोवती आणि दोन्ही हातांमध्येही वेदना जाणवू शकतात. त्याशिवाय व्यक्तीला चक्कर येणे, गरगर फिरल्यासारखे वाटणे, घामाघूम होणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे अशीही लक्षणे जाणवतात. काही वेळा हार्ट अटॅक अचानक येऊ शकतो; पण अनेकदा त्याची लक्षणे अनेक तासांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वीच दिसू लागतात.
आणखी वाचा : Cancer Symptoms : तरुणांना कॅन्सर होण्याचं प्रमाण कशामुळे वाढलंय? कारणं काय? कोणत्या सवयी ठरताहेत कारणीभूत?
हृदयविकाराचा झटका येण्याआधीच कसा रोखायचा?
हृदयविकाराचा झटका येण्याआधीच टाळला जाऊ शकतो आणि त्याचे अनेक मार्ग असल्याचा दावाही काही आरोग्य तज्ज्ञांकडून केला जातो. मात्र, त्यासाठी प्रत्येकाने आपले शरीर निरोगी, तसेच सुदृढ ठेवायला हवे, असा सल्लाही ते देतात. हृदयविकाराचा धोका कमी करण्याचा पहिला मार्ग हा संतुलित आहार आणि योग्य व्यायाम असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही गोष्टींमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते. हा घटक प्रत्येक व्यक्तीच्या रक्तात आढळतो आणि त्याच्या वाढीमुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो, असे हृदयरोग तज्ज्ञांनी म्हटले आहे. आयुर्वेदिक व युनानी वैद्यक तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी हे कोलेस्ट्रॉलला नैसर्गिकरीत्या आटोक्यात ठेवण्यासाठी तीन फळांची शिफारस करतात.
हृदयविकाराचा झटका येऊ नये कोणती फळे खावीत?
रोजच्या आहारात केळी, आंबा किंवा अननस यांसारख्या फळांचे सेवन केल्यास फक्त कोलेस्ट्रॉलच नाही, तर हृदयविकाराचा धोकाही कमी होऊ शकतो. केळ्यामध्ये फायबर आणि पोटॅशियम हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तदाब कमी करण्यास आणि धमन्यांमधील वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्यास मदत मिळते. आंब्यामधील व्हिटॅमिन सी हा घटक शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारतो आणि खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून, हृदयविकाराचा धोकाही कमी करतो. अननसामध्ये असलेले ब्रोमेलिन हे खास एंझाइम रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अत्यंत परिणामकारक मानले जाते.
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी काय करावे?
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कमी फॅट्स आणि जास्त फायबर असलेले पदार्थ खावेत, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. त्याचबरोबर दररोज सहा ग्रॅमपेक्षा कमी मिठाचे सेवन असावे. कारण- जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. केक, बिस्कीट, सॉसेज, बटर आणि पाम तेलापासून बनवलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. या पदार्थांमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढते. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करून, एखादी व्यक्ती त्याचे हृदय सहजपणे निरोगी ठेवू शकते. आठवड्यातून किमान पाच दिवस आणि दररोज ३० मिनिटे व्यायाम केल्याने हृदयाची स्थिती चांगली राहते. वजन नियंत्रणात असेल, तर त्याला रक्तदाबासारख्या समस्यांचा कमी सामना करावा लागतो, असे एका हृदयरोग तज्ज्ञाने सांगितले.
तरुणांमध्ये का वाढतोय हृदयविकाराचा धोका?
मागील काही वर्षांत हृदयविकाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वयोवृद्ध नागरिकच नव्हे, तर तरुणांनाही या आजारामुळे जीव गमवावा लागत आहे. तरुणांची बदलती जीवनशैली या घटनांना मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याची चिंता हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तंबाखूजन्य पदार्थ आणि धूम्रपान यांमुळे धमन्यांमध्ये चरबी साचते आणि तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो, असे हृदयरोग तज्ज्ञ सांगतात. त्याशिवाय अपूर्ण झोप, व्यायामाचा अभाव, मोठ्या प्रमाणात चरबीयुक्त पदार्थांचे सेवन, आरोग्याकडे दुर्लक्ष यांसारख्या गोष्टी अशा विकारांना आमंत्रण देतात, अशी चिंता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, भारतात वायुप्रदूषण जागतिक सरासरीपेक्षा तिपटीने जास्त आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचा धोका आणखीनच वाढत असल्याचे समोर आले आहे.