अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या फेडरल फायनान्शियल डिस्क्लोजर फॉर्मनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि त्यांच्या मुलांनी गेल्या वर्षी सुरू केलेल्या क्रिप्टो उपक्रमाच्या टोकन विक्रीतून ५७ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्तीची कमाई केली आहे. एका वर्षात ट्रम्प यांनी ६०० मिलियन डॉलर्स म्हणजेच ५००० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. मात्र, एका वर्षात त्यांनी इतकी कमाई कशी केली? त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत कोणता? त्यांची एकूण संपत्ती किती? त्याविषयी जाणून घेऊयात.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीचा स्रोत कोणता?
शुक्रवारी (१३ जून) सरकारी नीतिमत्तेच्या कार्यालयाने जारी केलेल्या २३० पेक्षा जास्त पानांच्या एका कागदपत्रात स्टॉक, लाभांश, रिअल इस्टेट आणि गुंतवणूक पोर्टफोलिओचा समावेश असणारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या होल्डिंग्जची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांनी त्यांचे उत्पन्न कर विवरणपत्र प्रकाशित करण्याची जुनी परंपरा मोडली होती.
ट्रम्प यांनी वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल टोकनच्या विक्रीतून ५७.४ दशलक्ष डॉलर्सची म्हणजेच जवळपास ५०० कोटींची कमाई केली आहे. गेल्या वर्षीच्या निवडणुकीपूर्वी ट्रम्प आणि त्यांच्या मुलांनी क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक आणि कर्ज देणाऱ्या एका व्यासपीठाची सुरुवात केली आणि त्याला वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल असे नाव दिले. त्यांच्याकडे या कंपनीचे १५.७५ बिलियन गव्हर्नन्स टोकन आहेत. या कंपनीच्या उद्घाटनाच्या काही तास आधी जानेवारीमध्ये त्यांनी ‘ट्रम्प’ हे डिजिटल टोकन लाँच केले होते. वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियलने १०० अब्ज टोकन जारी केले होते, त्यापैकी सुमारे २२.५ अब्ज टोकन ट्रम्प यांच्याशी संलग्न कंपनी डीटी मार्क्स डेफी कंपनीला वाटप करण्यात आले होते.
एकेकाळी क्रिप्टो उद्योगाला ट्रम्प यांचा विरोध होता, मात्र ट्रम्प यांनी सत्तेत परतल्यानंतर उत्साहाने या क्षेत्राचा स्वीकार केला. त्यांनी नियामक अडथळे दूर करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ट्रम्प यांनी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (SEC) चे प्रमुख म्हणून क्रिप्टो वकील पॉल अॅटकिन्स यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी सरकारच्या बिटकॉइन होल्डिंग्जचे ऑडिट करण्यासाठी एक ‘स्ट्रॅटेजिक बिटकॉइन रिझर्व्ह’देखील स्थापन केला आहे. हे बिटकॉइन प्रामुख्याने कायदा अंमलबजावणी संस्थांनी न्यायालयीन जप्तींमधून जमा केले होते. क्रिप्टोकरन्सींचा आता व्हाईट हाऊसमध्ये मोठा वाटा असल्याचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी गेल्या महिन्यात लास वेगासमध्ये बिटकॉइन परिषदेदरम्यान सांगितले होते.
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या कागदपत्रात ट्रम्प यांना जगभरातील ब्रँडेड उत्पादनांच्या विक्री आणि परवाना करारांमधून मिळालेल्या रॉयल्टीचा आढावादेखील देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, त्यांनी घड्याळांमधून २.८ दशलक्ष डॉलर्स आणि परफ्यूम व् स्नीकर्समधून २.५ दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत. फ्लोरिडामधील डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार-ए-लागो क्लबमधूनदेखील त्यांना ५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. ट्रम्प यांच्या जगभरातील गोल्फ कोर्समुळे त्यांच्या तिजोरीत भर घातली आहे. त्यांना वेस्ट पाम बीचमधील गोल्फ कोर्समधून २९.१ दशलक्ष डॉलर्स आणि मियामीमधील गोल्फ कोर्समधून ११०.४ दशलक्ष डॉलर्स मिळाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड (एसएजी) कडून ६,४८४ डॉलर्सचे मासिक निवृत्ती वेतनदेखील मिळाले आहे.
एकूण मालमत्तेची माहिती
एकूण मालमत्ता : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे एकूण १.६ बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास १३,८०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
क्रिप्टो व्हेंचर्स :
- ऑक्टोबर २०२४ मध्ये ट्रम्प यांनी नवशिक्या गुंतवणूकदारांसाठी वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल हा एक क्रिप्टो प्रोजेक्ट लाँच केला.
- ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणूक जिंकल्याने आणि क्रिप्टो उद्योजक जस्टिन सन यांनी केलेल्या प्रचारामुळे या क्रिप्टो प्रोजेक्टचे मूल्य वाढले.
- त्यांनी $TRUMP हे डिजिटल टोकन सादर केलं, ज्याचा त्यांना भरपूर फायदा झाला, ज्यामधून त्यांनी फी म्हणून ३२० दशलक्ष डॉलर्स मिळवले.
- ट्रम्प कुटुंबाने एकूण बिटकॉइन मायनिंग आणि डिजिटल मालमत्ता ईटीएफसह क्रिप्टोसंबंधित कंपन्यांमधून ४०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्तची कमाई केली.
व्यवसाय उत्पन्न :
- फ्लोरिडा गोल्फ रिसॉर्ट्स आणि मार-ए-लागो : किमान २१७.७ दशलक्ष डॉलर्स
- ट्रम्प नॅशनल डोरल : ११०.४ दशलक्ष डॉलर्स
आंतरराष्ट्रीय करार :
- व्हिएतनाम परवाना शुल्क : ५ दशलक्ष डॉलर्स
- भारत विकास शुल्क : १० दशलक्ष डॉलर्स
- दुबई परवाना शुल्क : १५.९ दशलक्ष डॉलर्स
रॉयल्टी :
ट्रम्प NFTs : १.१६ दशलक्ष डॉलर्स (NFT म्हणजे नॉन फंगीबल टोकन. त्याला क्रिप्टोग्राफिक टोकनदेखील म्हटले जाऊ शकते)
मेलानिया ट्रम्प NFTs : २१६,७०० डॉलर्स
ट्रम्प यांची घड्याळे : २.८ दशलक्ष डॉलर्स
ट्रम्प स्नीकर्स आणि परफ्यूम : २.५ दशलक्ष डॉलर्स
ग्रीनवुड बायबल रॉयल्टी : १.३ दशलक्ष डॉलर्स
गुंतवणूक :
ट्रम्प यांनी ब्लू आउल कॅपिटलमधील स्टेक, चार्ल्स श्वाब व इन्व्हेस्कोद्वारे व्यवस्थापित निधीतील एकूण २११ दशलक्ष डॉलर्स गुंतवणुकीतून किमान १२ दशलक्ष डॉलर्स व्याज आणि लाभांश मिळवला आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी रॉयटर्सला ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, उपाध्यक्ष व्हान्स आणि व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी आवश्यक नैतिकतेसाठी आर्थिक अहवाल देण्याची जबाबदारी पूर्ण केली आहे. ट्रम्प प्रशासन अमेरिकन नागरिकांपुढे पारदर्शक असून त्यांच्या सुलभतेसाठी वचनबद्ध आहे.”