– निशांत सरवणकर

सीमा शुल्क विभागाने एका खबरीच्या मृत्यूनंतर वारसाला बक्षिसाची अंतिम रक्कम नाकारली. वारस असलेल्या पत्नीने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेत बक्षिसाची अंतिम रक्कम वारसाला देण्याचे आदेश दिले. या निमित्ताने विविध तपास यंत्रणांसाठी महत्त्वाच्या असलेल्या खबऱ्यांचा विषय चर्चेला आला आहे. सीमा शुल्क, महसूल संचालनालय वगळता अन्य तपास यंत्रणांमध्ये ‘खबरी’ अद्यापही मान्यता पावलेला नाही. हा खबरी म्हणजे काय, कोण असतात खबरी, तो किती महत्त्वाचा असतो का, खबऱ्यांना बिदागी मिळते का, आदींबाबतचा हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खबरी म्हणजे काय?

पोलिसांसह सर्वच तपास यंत्रणांना गुप्त माहिती देणारी व्यक्ती ही खबरी म्हणून संबोधली जाते. खबरी हे पद नाही. मात्र ही व्यवस्था आहे. राज्यासह केंद्रातील तपास यंत्रणा खबरी पाळून असतात. प्रत्यक्ष पोलिसांना मिळणार नाही, अशी गुप्त माहिती खबरीच्या मदतीने मिळणे सहज शक्य होते. गुन्हेगारांना खबरीची ओळख नसते. त्यामुळे ते त्यांच्यात मिसळून आतल्या गोटातील गुप्त माहिती मिळवू शकतात. खबरीचे हे काम जोखमीचे असले तरी बक्षिसाच्या व संरक्षणाच्या आशेने खबरी ते करतात. खबऱ्यांना ‘झिरो पोलीस’ही संबोधले जाते. खबरी झिरो पोलीस होतात. पण प्रत्येक झिरो पोलीस खबरी नसतो.

‘झिरो पोलीस’ म्हणजे खबरी?

‘झिरो पोलीस’ ही उपाधी पोलिसांनी त्यांना मदत करणाऱ्या व अनेक छोट्या कामांत उपयोगी ठरणाऱ्या सामान्य नागरिकांना दिलेली आहे. हे मान्यताप्राप्त वा अधिकृत पद नाही. खऱ्या पोलिसांसोबत वावर असल्यामुळे झिरो पोलिसांचा प्रभाव वाढतो. साध्या वेशात असलेल्या पोलिसांप्रमाणे वागणे, बोलणे अशा रीतीने जणू काही आपण पोलीसच आहोत असे ते भासवतात. या झिरो पोलिसांचा गुन्हेगारी प्रकरणात पंच म्हणून वापर केला जातो. बऱ्याच वेळा खबरी पुरविण्याचे कामही हे झिरो पोलीस करतात. पोलिसांच्या वतीने ‘हप्ते’ गोळा करण्याचे कामही हे झिरो पोलीस करतात. शहरात तसेच ग्रामीण भागात झिरो पोलिसांचा वावर अधिक आहे. झिरो पोलिस जेव्हा खबऱ्यासारखे काम करतात तेव्हा गुन्ह्याच्या तपासालाही बऱ्यापैकी वेग मिळतो.

खबरी कोण असतो?

खबरी कोणीही असू शकतो. ज्याच्याकडे एखाद्या गुन्ह्याबाबत, अमली पदार्थ, बेनामी मालमत्ता, रोकड आदींबाबत गुप्त माहिती आहे आणि याबाबत जो तपास यंत्रणांना तपशील उपलब्ध करून देऊ शकतो, अशी व्यक्ती खबरी मानली जाते. खबरी हे पद नसल्यामुळे सारे काही विश्वासावर चालत असते. सीमा शुल्क तसेत महसूल संचालनालय वगळता अन्य कुठल्याही यंत्रणेत खबरी हे अधिकृत मान्यता असलेले पद नाही. सीमा शुल्क वा महसूल संचालनालयामार्फत १० ते २० टक्क्यांपर्यंत खबरीला बक्षीस देण्याची प्रथा आहे. पोलिसांसह अन्य तपास यंत्रणा ‘सिक्रेट फंडा’तून खबरींना बक्षीस देतात.

खबरींबाबत न्यायालय काय म्हणते?

सरकारी तिजोरीचे नुकसान टळावे आणि करचोरीला आळा बसावा यासाठी सरकारी विभागांना गुप्त माहिती पुरवताना खबरी हे जिवाची जोखीम पत्करत असतात. त्यामुळे त्यांना धोरणाप्रमाणे बक्षिसाची रक्कम मिळायला हवी, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. नितीन जामदार व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे. हे प्रकरण चार दशकांपूर्वीचे असले तरी खबऱ्याच्या विधवा पत्नीला कायदेशीर वारसदार म्हणून पात्र धरत बक्षिसाची अंतिम रक्कम देण्याचे आदेश सीमाशुल्क विभागाला दिले आहेत. मुंबईतील एका जवाहिऱ्याकडून जवळपास ८८ लाख रुपयांच्या हिऱ्यांची परदेशातून तस्करी करण्यात आली असल्याची गुप्त माहिती सीमाशुल्क विभागाच्या तस्करी प्रतिबंधक कक्षाला संबंधित खबऱ्याने लेखी पत्राद्वारे कळवली होती. त्यानंतर त्या विभागाने तो माल जप्त केला होता.

खबऱ्यांचे महत्त्व किती असते?

पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये खबऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. खबऱ्यांविना आम्ही कामच करू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. विविध प्रकारची माहिती काढण्यासाठी खबऱ्यांचाच वापर करावा लागतो. शीना बोरा खून प्रकरण एका खबऱ्यामुळेच वर्षभरानंतर उघड झाले. खार येथील एका रेस्तराँ बारमध्ये इंद्राणी मुखर्जी हिचा चालक मद्यपान करीत बसला होता. सोबत असलेल्या मित्राकडे त्याने या प्रकरणामागील बिंग फोडले. त्याच वेळी नेमका पोलिसांचा खबरी तेथे होता. त्याने ही खबर खार पोलिसांपर्यंत पोहोचविली आणि खुनाचा छडा लागला. अशी कितीतरी प्रकरणे निव्वळ खबऱ्यांमुळेच पोलिसांना सोडविता आली आहेत.

हेही वाचा : गडचिरोली पोलीस दलातील २९ अधिकारी व जवानांना राष्ट्रपती ‘पोलीस शौर्य पदक’

सध्याची परिस्थिती काय आहे?

माहिती महाजाल, अत्यंत अत्याधुनिक महागडे स्मार्टफोनच्या जगात गुन्हेगारही खूपच सराईत बनला आहे. तरीही खबऱ्याचे महत्त्व कमी झालेले नाही, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हे अन्वेषण कक्ष असतो आणि त्यांना खबऱ्यांवाचून पर्याय नसतो. ज्या गुन्हे अन्वेषण अधिकाऱ्याने खबरे जपले तो अधिकारी सरस ठरल्याची अनेक उदाहरणे आहे. कालांतराने पोलीस ठाण्याची कमाई कमी झाल्यामुळे आता खबऱ्यांकडेही दुर्लक्ष झाले आहे. तरीही गुन्हे अन्वेषण विभागत आजही खबरे वावरताना दिसतात. या खबऱ्यांना पदरच्या पैशातून किंवा पोलीस आयुक्तांच्या सिक्रेट फंडातून निधी दिला जातो. एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाली तर या खबऱ्यांना जपता येत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा प्रत्येक नव्या अधिकाऱ्याला नव्याने खबरी निर्माण करावा लागतो. सीमा शुल्क वा महसूल महासंचालनालयाप्रमाणे तपास यंत्रणांमध्येही खबरींना अधिकृत स्थान (निधी) मिळाले पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे.

nishant.sarvankar@expressindia.com

More Stories onपोलीसPolice
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of police informer and high court decision on rewards print exp pbs
First published on: 05-02-2023 at 16:02 IST