अमेरिकेत जॉर्जियातील एका शाळेत एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने गोळीबार केला. यात दोन विद्यार्थी आणि दोन शिक्षक असा चौघांचा मृत्यू झाला. या विद्यार्थ्याला त्याच्या वडिलांनी बंदूक भेट दिली होती. त्याबद्दल त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलांच्या गुन्ह्यासाठी पालकांवर गुन्हा दाखल होण्याची ही अमेरिकेतील दुसरी घटना आहे. याआधी २०२१ मध्ये मिशिगनमध्ये पहिल्यांदा मुलाच्या गुन्ह्यासाठी पालकांवर खटला चालवण्यात आला. पालकांच्या जबाबदारीवर जॉर्जियातील घटनेने दुसऱ्यांदा कायदेशीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

जॉर्जियातील घटना काय?

जॉर्जिया राज्यात अटलांटा शहराच्या बाहेर असलेल्या अपलाचे हायस्कूल या शाळेत कोल्ट ग्रे नावाच्या एका १४ वर्षीय मुलाने गोळीबार केला. यात चार जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. ५ सप्टेंबरला ही घटना घडली. मुलाला तर पोलिसांनी तात्काळ अटक केलीच, मात्र त्याला भेटस्वरूप बंदूक देणाऱ्या त्याचे वडील कॉलिन ग्रे यांनाही अटक केली. गेल्या डिसेंबरमध्ये नाताळनिमित्त त्यांनी मुलाला सेमीऑटोमेटिक एआर-१५ प्रकारातील रायफल भेट म्हणून दिली होती. केवळ बंदूक भेट देणे हा त्यांचा गुन्हा नाही, तर मुलाने समाजमाध्यमांवर हिंसेची धमकी दिलेली असताना त्यांनी त्याच्या हातात बंदूक देणे यासाठी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. घटनेच्या काही महिने आधी कोल्ट ग्रे याने समाजमाध्यमांवर हिंसक संदेश लिहिल्याने पोलिसांनी त्याला समज दिली होती.

हेही वाचा : इराणने रशियाला दिले महाविध्वंसक क्षेपणास्त्र, अमेरिका-युक्रेनच्या चिंतेत वाढ; ‘Fath-360’ क्षेपणास्त्र किती घातक?

मिशिगनमध्ये काय घडले होते?

मिशिगन राज्यात डेट्रॉइटच्या उत्तरेस ऑक्सफर्ड स्कूलमध्ये अशाच प्रकारे गोळीबार झाला होता. त्या प्रकरणी जेम्स आणि जेनिफर क्रंबली या पालकांना त्यांच्या मुलाने शाळेत गोळीबार करून चार जणांना ठार केल्याच्या गुन्ह्यासाठी जबाबदार धरण्यात आले. मुलाच्या पालकांना मुलाच्या गुन्ह्यासाठी १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. अमेरिकेत पहिल्यांदाच घडलेल्या या घडामोडीने जगाचे लक्ष वेधले. २०२१ मध्ये ही घडली होती. इथन क्रंबली या १५ वर्षांच्या मुलाने गोळ्या झाडून चार विद्यार्थ्यांचा बळी घेतला. हा मुलगा नैराश्यात होता. त्याने बंदूकीचे आणि रक्ताचे चित्र काढले होते आणि खाली संदेश लिहिला होता – विचार थांबत नाहीत, मदत करा, माझ्या आयुष्याला अर्थ नाही. हे चित्र पाहिल्यावर शाळेने त्याच्या पालकांना चर्चेसाठी बोलावले होते. पण पालकांनी त्याला घरी घेऊन जाण्यास नकार दिला आणि समुपदेशनाची मागणी केली. त्याच दिवशी इथनने त्याच्या बॅगेतून बंदूक काढून गोळीबार केला होता. ही बंदूक वडील जेम्स क्रंबली यांनी त्याला काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. त्याची बॅग ना पालकांनी तपासली होती, ना शाळेने. पालकांना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून यासंबंधीची सुनावणी सुरू आहे.

पालकांवरील जबाबदारी

अमेरिकेत मुलांकडून गोळीबाराच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. तेथे हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. वरील दोन्ही घटनांमध्ये पालकांना त्यांच्या मुलाच्या कृत्यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. मिशिगन खटल्यातील वकील मॅकडोनल्ड यांनी न्यायालयात न्यायमूर्तींसमोरच बंदूक कशी काही सेकंदात लॉक करता येते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले होते. पालकांना निष्काळजीसाठी जबाबदार धरत समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न या दोन्ही घटनांमधून झाला आहे. मुलांची बदललेली वागणूक, त्यांची मनःस्थिती वेळीच ओळखणे याची जबाबदारी पूर्णपणे पालकांची असून अशा प्रकारचे गैरकृत्य पालकांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या मुलांच्या हातून घडले तर पालकांना तुरुंगात जावे लागणार हा संदेश या दोन्ही घटनांनी दिला आहे. मिशिगनमध्ये यावर्षी एक नवा कायदा संमत करण्यात आला असून त्यानुसार पालकांना त्यांची बंदूक विशेषतः अल्पवयीन मुले असतील तर लॉक करून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हेही वाचा : Slovenia Divje Babe cave: ५० हजार वर्षे प्राचीन बासरी ही मानव निर्मित आहे का?

भारतातील परिस्थिती

हातात खुलेआम बंदुका घेऊन फिरणारी मुले हे चित्र भारतात नाही आणि शस्त्र परवान्यांचे कठोर नियम अस्तित्वात असल्याने अशा गोळीबाराद्वारे नरसंहाराच्या घटनांची भारतात सध्या तरी शक्यता नाही. मात्र मुलांची हौस म्हणून श्रीमंतांकडून चारचाकी मुलांना देणे ही सामान्य बाब आहे. परिणामी अमेरिकेत बंदुकीने जे घडते तशा घटना भारतात बेदरकार वाहन चालवण्याने घडत आहेत. पुण्यात अल्पवयीनाने पोर्श वाहनाने दोघांना चिरडल्यानंतर त्या अल्पवयीनासोबत त्याच्या पालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत पालकांनी मुलाचा बचाव करण्यासाठी नियम वाकवल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.

भारतात दुसऱ्या प्रकारचा गुन्हा घडतो तो म्हणजे मुलींवरील अत्याचार, हत्येचा. अशा प्रकरणांमध्ये जर आरोपी अल्पवयीन असेल तर त्या मुलांसह पालकांना जबाबदार धरून शिक्षा झाल्याची घटना घडलेली नाही. मात्र आपल्या देशातही अल्पवयीन मुलांचे गुन्हे आणि पालकांची जबाबदारी याबाबतीत सामाजिक भान, कठोर कायद्यांची गरज निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे.