करोना महासाथीत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन नावाच्या औषधाचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला होता. या औषधामुळे करोना विषाणूवर मात करता येते, असे तेव्हा सांगितले जात होते. विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील करोनावर मात करण्यासाठी हे औषध घ्यावे, असे म्हटले होते. अनेकांनी हे औषध म्हणजे करोनावर मात करण्यासाठीचे चमत्कारिक औषध आहे, असा दावा केला होता. मात्र, करोना काळात हे औषध घेतल्यामुळे साधारण १७ हजार लोकांचा मृत्यू झाला, असे आता म्हटले जात आहे. या औषधामुळे ११ टक्क्यांपर्यंत मृत्युदर वाढला, असे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नव्याने केला जाणारा हा दावा काय आहे? हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध नेमके काय आहे? सध्या केल्या जाणाऱ्या दाव्यावर या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत काय आहे? हे जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध वापरण्याचा दिला होता सल्ला

करोना महासाथ आल्यानंतर सर्वत्र अस्थिरता, संभ्रम आणि भीतीचे वातावरण पसरले होते. करोनावर मात करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या औषधांची मदत होईल का, याची चाचपणी औषधशास्त्रज्ञ तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केली जात होती. करोनावर लस किंवा ठोस औषध येईपर्यंत ही औषधे वापरावीत, असा विचार यामागे होता. याच काळात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध करोनावर मात करण्यासाठी वापरता येऊ शकते, असे सांगितले जात होते. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील (WHO) करोनावर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध उपयोगी पडेल का, याची चाचपणी केली. याबाबत WHOचे माजी प्रमुख शास्त्रत्र सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.

“निष्कर्ष काढण्यासाठी तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात डेटाची गरज”

“हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापरामुळे रुग्णांमध्ये म्हणावी तशी सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे आम्ही ते औषध घेऊ नये, असे सांगितले होते. त्या क्षणाला आमच्याकडे अभ्यास नमुन्यांची संख्या कमी होती. त्यामुळे कदाचित हे औषध घेतल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्रकरणे आम्हाला आढळली नाहीत. अशा प्रकारचे निष्कर्ष काढण्यासाठी तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात डेटा असायला हवा,” असे स्वामीनाथन म्हणाल्या. सध्या त्या एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत.

“हे औषध पुन्हा वापरू नका”

बायोमेडिसिन अॅण्ड फार्माकोथेरपी या ओपन अॅक्सेस जर्नलमध्ये काही संशोधकांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधामुळे कदाचित १७ हजार करोना रुग्णांचा मृत्यू झाला असावा, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी करोनावरील उपचारासाठी या औषधाचा वापर करू नये, असेही सांगितले आहे. “आमच्या अचूकतेचे अंदाज मर्यादित आहेत. मात्र, ठोस पुरावा नसताना करोनावर उपचार करण्यासाठी या औषधाचा पुनर्वापर केल्यास शरीराला धोका निर्माण होऊ शकतो,” असे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध सामान्यत: सुरक्षित असते; पण…

स्वामीनाथन यांच्या म्हणण्याप्रमाणे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध सामान्यत: सुरक्षित असते. मात्र, हे औषध एखाद्या सुदृढ व्यक्तीला प्रतिबंधात्मक औषध म्हणून मोठ्या प्रमाणात दिल्यास, होणारे नुकसान आणि परिणामांचे वेगळ्या पद्धतीने मूल्यांकन करणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. भविष्यात करोनासारख्या आजाराला तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे अशा स्थितीला तोंड देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. अशी स्थिती उदभवल्यास औषधांची मानवांवर लवकर चाचणी करायला पाहिजे, अशी अपेक्षाही स्वामीनाथन यांनी व्यक्त केली.

अनेकांकडून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेण्याचे आवाहन

करोना महासाथीच्या पहिल्या लाटेत अनेकांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध घेण्याचा सल्ला दिला होता. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांचादेखील समावेश होता. तुमच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे हे औषध घ्या, असे तेव्हा ट्रम्प म्हणाले होते. फक्त ट्रम्पच नव्हे, तर जगातील अनेक नेत्यांनी या औषधाचा तेव्हा पुरस्कार केला होता. त्यामुळे त्याच्या विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. जगभरात या औषधाची मागणी वाढली होती. लक्षावधी लोकांनी या औषधाचा साठा केला होता. अनेक देशांनी आरोग्य सेवेत काम करणाऱ्यांना हे औषध रोज घेण्याचा सल्ला दिला होता.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाबाबत भारतातील सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ सुवर्णा गोस्वामी यांनी अधिक माहिती दिली आहे. “या औषधामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीची प्रतिक्रिया कमी होते. त्यामुळे करोना काळात सायटोकाईन स्ट्रोम कमी करण्यासाठी हे औषध घेण्याचा तेव्हा सल्ला देण्यात आला होता,” असे गोस्वामी यांनी सांगितले. भारतातही आरोग्य कर्मचाऱ्यांना हे औषध रोगप्रतिबंधक औषध म्हणून वाटण्यात आले होते.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा करोना रुग्णांवर काय परिणाम होतो?

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा करोना रुग्णावर नेमका काय परिणाम होतो, हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. मात्र, या औषधामुळे काही रुग्णांनी हृदयाशी संबंधित तक्रार किंवा पचनसंस्थेतील इतर आजारांचा त्रास होत असल्याची तक्रार केली होती. करोनाच्या पहिल्या महासाथीत मोठ्या प्रमाणात अभ्यास गट नसल्यामुळे रुग्णांना या त्रासजन्य अडचणी नेमक्या का सोसाव्या लागल्या हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे रुग्णांना येणाऱ्या या अडचणी फक्त हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधामुळे आल्या की यामागे अन्य काही कारण आहे, हे संशोधकांना सांगणे कठीण झाले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is hydroxychloroquine medicine safe for corona treatment prd