Kidney Disease Symptoms in Marathi : बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. जगभरातील ८० कोटींहून अधिक लोक मूत्रपिंडाच्या (किडनी) गंभीर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती लॅन्सेटच्या अहवालातून समोर आली आहे. चिंताजनक बाब म्हणजे, या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे अहवालातून नमूद करण्यात आले आहे. नेमका हा आजार वाढण्यामागची कारणे काय? आरोग्य तज्ज्ञांनी त्याबाबत काय इशारा दिला? त्याविषयीचा हा आढावा…
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अलीकडच्या काळातील १० प्रमुख आजारांमध्ये मूत्रपिंडाचा आजार सातव्या क्रमांकावर आहे. १९९० पासून या आजाराचे प्रमाण दुप्पट झाले असून सध्या जगभरातील सुमारे ८० कोटी लोकांना त्याची लागण झाली आहे. त्यातील बहुतेक रुग्ण मूत्रपिंड आजाराच्या पहिल्या ते तिसऱ्या टप्प्यातील आहेत. या रुग्णांचे एकत्रित प्रमाण सुमारे १३.९% इतके असल्याचे लॅन्सेटच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचाच अर्थ १० पैकी एका व्यक्तीला हा आजार होत असल्याचे सांगितले जात आहे.
मूत्रपिंडाच्या विकारात भारत कितव्या स्थानी?
लॅन्सेटच्या अहवालानुसार, मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये चीन आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये सुमारे १५.२ कोटी आणि भारतात १३.८ कोटी लोकांना मूत्रपिंडाचा आजार आहे. याशिवाय अमेरिका, इंडोनेशिया, जपान, ब्राझील, रशिया, मेक्सिको, नायजेरिया, पाकिस्तान, बांगलादेश, इराण, फिलिपाइन्स, व्हिएतनाम, थायलंड आणि तुर्कीस्तान या देशांमध्येही एक कोटीहून अधिक प्रौढ व्यक्तींना मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले आहे.
आणखी वाचा : Kidney health: खूप पाणी प्यायल्याने किडनीचे विकार बरे होतात का? तज्ज्ञ काय सांगतात?
२०५० पर्यंत अनेकांना लागण होण्याची भीती
- २०५० पर्यंत या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या आणि त्यामुळे होणारा मृत्युदर दुपटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- भारतात वेगाने वाढणाऱ्या मूत्रपिंड रुग्णांच्या तुलनेत तज्ज्ञांची व उपचारांची व्यवस्था अत्यंत कमी आहे.
- २०२३ मध्ये मूत्रपिंडाच्या आजाराने जगभरातील १४.८ लाख लोकांचा मृत्यू झाला होता.
- मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेतील बिघाडामुळे, हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढल्याचे सांगितले जात आहे.
- वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीतील बदल, योग्य आहार आणि नियमित आरोग्य तपासणी यामुळे या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.
मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे कोणती?
मूत्रपिंडाचा विकार असलेल्या अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, त्यामुळे हा विकार लवकर लक्षातच येत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आजाराची लागण झालेल्या रुग्णांना हळूहळू थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे, वजन कमी होणे, भूक कमी लागणे, सारखे लघवीला जावे लागणे अशी प्राथामिक लक्षणे दिसून येतात; पण ही लक्षणे इतर आजारांमध्येही दिसू शकतात. काही जणांमध्ये अंगावर व चेहऱ्यावर थोडी सूज येणे, लघवीचा रंग लाल दिसणे, कोरड्या उलट्या होणे अशी लक्षणेही दिसतात. ही सगळी लक्षणे मूत्र विकारांची असू शकतात व तपासण्यांद्वारे त्याची खात्री करता येते.
मूत्रपिंड विकार दीर्घकाळ राहणारा
अंगावर सूज येण्यामागे काही महत्त्वाची कारणे असू शकतात. मूत्रपिंडाचा आजार, यकृताचा आजार, हृदयविकार, अॅनिमिया (रक्तक्षय), कुपोषण, स्त्रियांमध्ये संप्रेरकांची पातळी कमीजास्त होणे यामुळे सूज येऊ शकते; त्यामुळे सुजेचे नेमके कारण समजून घेणे गरजेचे आहे. मूत्रपिंडाचा म्हणजेच क्रॉनिक किडनी डिसीजचा अनेकांमध्ये आजार दीर्घकाळ राहतो. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये हा आजार बळावणे अधिक सामान्य आहे. विशेष म्हणजे- मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीच्या काळात या आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र, योग्य वैद्यकीय उपचाराने त्यावर नियंत्रण मिळवून रुग्णाला होणारा त्रास कमी करता येतो.
मूत्रपिंड विकाराचे दोन प्रकार
- आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मूत्रपिंड विकाराचे कायमचा व तात्पुरता असे दोन प्रकार असतात.
- तात्पुरत्या विकारात रुग्ण रुग्णालयात दाखल असेल आणि लघवीला झालेला जंतूसंसर्ग, मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो एंटेरिटिस अशा इतर गोष्टी उद्भवलेल्या असतात.
- अशा रुग्णाला त्या काळापुरता मूत्रपिंड विकार निर्माण होऊ शकतो व प्रसंगी डायलिसिसदेखील लागू शकतो.
- पण, तो कायमचा मागे लागत नाही. ज्या रुग्णांना ‘क्रॉनिक किडनी डिसिज’ असतो, अर्थात त्याचे मूत्रपिंड हळूहळू खराब होत गेलेले असते.
- त्याला कायम डायलिसिस करण्याची वेळ येऊ शकते. सर्वसाधारणपणे मूत्रपिंडाचे कार्य ५ ते १० टक्के एवढेच सुरू असेल तेव्हा डायलिसिसचा निर्णय घेतला जातो.
मूत्रपिंडाच्या आजाराचा सर्वाधिक धोका कुणाला?
मूत्रपिंडाचे विकार सर्व वयोगटात दिसून येत असले तरी वयाची ६० वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीला हा विकार होण्याची जास्त शक्यता असते. साधारणत: ५० टक्के ज्येष्ठ नागरिकांना पंचाहत्तरीनंतर मूत्रपिंडाचा विकार असू शकतो. लहान मुलांनाही हा आजार होऊ शकतो आणि बऱ्याचदा त्याची कारणे आनुवंशिक किंवा जन्मजात असतात. जंतूसंसर्गामुळेही या आजाराची शक्यता निर्माण होऊ शकते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर हे विकार जडू शकतात आणि जीवन त्रासदायक होऊ शकते. मूत्रपिंडावर झालेला परिणाम तात्पुरता असेल तर वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे, त्याकडे दुर्लक्ष केले तर कायमस्वरूपी मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात.
