बाजारात सोयाबीनला भाव किती?

सध्या महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात किंचित वाढ दिसत असली, तरी वर्षभरापासून किमतीतील उतरता कल कायम आहे. सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोयाबीनला ४ हजार ६०० रुपयांपर्यंत दर मिळाले होते, त्यानंतर एक महिना किंमत वाढत ५ हजार ३०० रुपयांपर्यंत पोहोचली, मात्र त्यानंतर सातत्याने घसरण दिसत आहे. यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीन बाजारात येण्यास वेळ असला, तरी बाजारातील सोयाबीन दरातील घसरण चिंताजनक मानली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात सोयाबीनची लागवड किती?

महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीचे सरासरी क्षेत्र ४१.५० लाख हेक्टर असून यंदा खरीप हंगामात ५१.१७ लाख हेक्टर (१२३ टक्के) क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार गेल्या हंगामात राज्यात ५०.८५ लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. राज्यात २०००-०१ च्या हंगामात केवळ ११.४२ लाख हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र होते. २००९-१० पर्यंत ते वाढून ३०.१९ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले. गेल्या अडीच दशकांत सोयाबीनचे क्षेत्र तब्बल पाच पटीने वाढले आहे. विदर्भ आणि मराठवाडा विभागात सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे. बहुतांश शेती कोरडवाहू आहे.

हेही वाचा >>>Netflix’s IC 814: द कंदहार हायजॅक, दहशतवाद्यांच्या नावांवरून पेटला वाद; नेमकं प्रकरण काय?

सोयाबीनच्या उत्पादनाची स्थिती काय?

देशातील सोयाबीनच्या उत्पादनापैकी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये ८० टक्के उत्पादन होते. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार २०२३-२४ च्या हंगामात मध्य प्रदेशने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. गेल्या हंगामात मध्य प्रदेशात ५४.७२ लाख मेट्रिक टन तर महाराष्ट्रात ५२.३२ लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. संपूर्ण देशात १३०.५४ लाख टन सोयाबीन उत्पादनाची आकडेवारी समोर आली आहे. जागतिक पातळीवर सोयाबीनच्या उत्पादनात भारताचा पाचवा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. त्याखालोखाल अमेरिका, अर्जेंटिना आणि चीनचा आहे.

महाराष्ट्र आणि देशात उत्पादकता किती आहे?

जागतिक पातळीवर सोयाबीनची हेक्टरी सरासरी उत्पादकता २ हजार ६७० किलो इतकी असताना देशातील उत्पादकता मात्र केवळ १ हजार ५१ किलो आहे. महाराष्ट्रातील गेल्या हंगामातील उत्पादकता ही १ हजार २९९ रुपये किलो आहे. ब्राझील देशात एका हेक्टरमध्ये साधारणपणे ३ हजार २०० किलो उत्पादन घेतले जात असताना आपल्या देशात उत्पादकता फारच कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर कोसळल्यास त्याचे परिणाम देशातील बाजारात जाणवतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. गेल्या तीन दशकांमध्ये देशात सोयाबीनचे क्षेत्र झपाट्याने वाढले असताना उत्पादकता वाढविण्याकडे मात्र लक्ष पुरविण्यात आले नाही.

हेही वाचा >>>विश्लेषण : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पर्यावरणास हानिकारक कसे ठरते? पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे शक्य आहे का?

सोयापेंड आयात-निर्यात धोरणाचा परिणाम काय?

सोयाबीनचा बाजारभाव हा प्रामुख्याने सोयापेंडच्या भावावर अवलंबून असतो. सोयाबीनवरील प्रक्रियेनंतर सुमारे ८० टक्के सोयापेंड तर २० टक्के तेल मिळते. देशांतर्गत मागणीसह सोयापेंड निर्यात हा सोयाबीनचा बाजारभाव ठरवणारा महत्त्वाचा घटक आहे. सोयापेंड निर्यातीत गेल्या दहा वर्षांमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. २०१४-१५ मध्ये ४५ लाख टन सोयापेंड निर्यात झाली होती, ती आता २० लाख टनांपर्यंत खाली आली आहे. यासाठी सरकारचे आयात-निर्यातीचे धरसोडीचे धोरण कारणीभूत मानले जात आहे. दुसरीकडे, खाद्यातेलाबाबत आत्मनिर्भर होण्याबाबतची सरकारची घोषणा हवेतच आहे. २०१४-१५ आधी वार्षिक सुमारे १० लाख टनांच्या जवळपास असलेली सोयाबीन तेल आयात २०२३-२४ मध्ये वार्षिक ४० लाख टनांपर्यंत पोहोचली आहे.

बाजारातील चित्र काय?

२०२१-२२ च्या हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोयाबीनची मागणी आणि सोयाबीन तेलाचे वाढलेले भाव या पार्श्वभूमीवर सोयाबीन दराचा उच्चांक पाहायला मिळाला होता. काही ठिकाणी सोयाबीनला ९ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या, पण गेल्या वर्षीही दर अपेक्षेपेक्षा कमीच राहिले. खाद्यातेलाच्या वाढत्या आयातीमुळे सोयाबीनचे दर दबावात आहेत, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी देशातील सोयाबीनचे उत्पादन घटूनही बाजारात अपेक्षित दर मिळू शकले नाहीत. आता नवीन सोयाबीन बाजारात आल्यावर काय चित्र राहील, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained prices collapsed before the new soybeans hit the market print exp 0924 amy
Show comments