हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील पायाभूत सुविधांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. अलीकडेच झालेल्या पावसात आयटी पार्कमधील रस्त्यांना नद्यांचे रूप आल्याचे चित्र होते. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काय झाले? : हिंजवडी आयटी पार्कमध्ये ७ जून रोजी सकाळी दहा मिनिटे झालेल्या पावसामुळे तेथील रस्त्यांना नद्यांचे रूप आले होते. या पाण्यातून वाट काढणाऱ्या वाहनांच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर पसरल्या होत्या. ही स्थिती आता प्रत्येक पावसाच्या वेळी दिसत आहे. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक जलप्रवाहांवर अतिक्रमण करण्यात आल्याने आयटी पार्कच्या गळ्याशी पाणी आल्याचे चित्र आहे. कारणे कोणती? : हिंजवडीतील जलकोंडीला या भागातील नैसर्गिक जलप्रवाहांवरील अतिक्रमण कारणीभूत असल्याची बाब प्रशासकीय यंत्रणांच्या पाहणीत स्पष्ट झाली आहे. या आयटी पार्कची उभारणी करताना या परिसरातील ओढ्यांना जाणीवपूर्वक नाल्यांचे रूप देण्यात आले. डोंगरावरून वाहत येणारे हे ओढे बारमाही वाहते नव्हते. त्यामुळे त्यांची पावसाळ्यातील वहनक्षमता लक्षात न घेता त्यांची खोली आणि रुंदी कागदोपत्री गृहीत धरण्यात आली. या ओढ्यांची रुंदी ४ ते १० मीटर होती. सर्व्हे ऑफ इंडियाच्या २०११ च्या सर्वेक्षणात हिंजवडी परिसरात शंभराहून अधिक ओढे होते. विकासाच्या नावाखाली बांधकामे करताना गृहनिर्माण संस्था आणि कंपन्यांनी हे ९० टक्के ओढे बुजविले, असा स्थानिकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर ओढ्यांचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

यंत्रणांकडून कोणती पावले?

या प्रकारानंतर राजकीय नेत्यांसह प्रशासनाला जाग आली. आमदार शंकर मांडेकर यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळासह (एमआयडीसी) इतर स्थानिक यंत्रणांसह संयुक्त पाहणी केली. आयटी पार्क आणि परिसरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संयुक्त आढावा बैठक घेतली. हिंजवडी, माण, मारुंजी यासह इतर भागांतील नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह रोखणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. नाल्याभोवती उभारण्यात आलेल्या बांधकामांचे सर्वेक्षण करून ती अधिकृत आहेत का याचा अहवाल तातडीने तयार केला जाईल. त्यानंतर अनधिकृत बांधकामे तातडीने पाडण्यात येतील, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली.

आयटीयन्सचे म्हणणे काय?

‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ने (एफआयटीई) या मुद्द्यावरून सरकारी यंत्रणांना जाब विचारला आहे. पाणी तुंबलेल्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहणी केली. त्या वेळी सांडपाणी वाहिन्या पूर्णपणे चिखल, गवत, झाडे, बांधकामाचे साहित्य, मेट्रोच्या बांधकामाचे साहित्य यामुळे तुंबलेल्या आढळून आल्या. आयटी पार्कमधील पावसाचे पाणी वाहून नेणारी यंत्रणा पूर्णपणे बदलण्याची आवश्यकता आहे. आयटी पार्कमध्ये बांधकामे वाढली असून, नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. पावसाचे पाणी तुंबू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात, अशी भूमिका ‘एफआयटीई’चे अध्यक्ष पवनजीत माने यांनी मांडली.

प्रकल्प कागदावरच का?

आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यात सरकारी लाल फितीचा अडसर निर्माण झाला आहे. महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आयटी पार्कमधील उड्डाणपुलासह पर्यायी रस्त्यांच्या सुमारे ६५० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे नियोजन केले आहे. या प्रकल्पांसाठी भूसंपादनाची जबाबदारी सहा महिन्यांत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आधी ‘एमआयडीसी’ आणि नंतर ‘पीएमआरडीए’कडे देण्यात आली आहे. या गोंधळामुळे आयटी पार्कमधील प्रकल्प कागदावरच राहिले आहेत. याच वेळी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा प्रकल्प पूर्णत्वासाठी नियोजित अंतिम मुदतीच्या आणखी एक वर्षे पुढे ढकलला गेला आहे.

उपाययोजना काय?

आयटी पार्कमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था अस्तित्वात नाही. यामुळे संपूर्ण आयटी पार्कमध्ये पावसाळी वाहिन्यांचे जाळे तयार करण्याचे नियोजन ‘एमआयडीसी’ने केले आहे. पावसाळी वाहिन्यांसाठी सर्वेक्षण करण्यासाठी लवकरच सल्लागार संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. आयटी पार्कचा विकास होत असताना अनेक गृहनिर्माण संस्था आणि कंपन्यांनी पावसाचे पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक प्रवाह असलेले ओढे आणि नाले बुजवून त्यावर अतिक्रमण केले आहे. यामुळे पावसाचे पाणी वाहून रस्त्यावर येत आहे. याच वेळी ते पाणी पुढे जाण्यासाठीचा मार्गही अडविण्यात आल्याने ते रस्त्यावर साचत आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी वाहिन्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे. अर्थात असे असले तरी या उपाययोजना प्रत्यक्षात उतरण्यास किती वेळ लागेल, याचे उत्तर सध्यातरी शासकीय यंत्रणांकडे नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained roads in hinjewadi it flooded due to heavy rain print exp amy