दत्ता जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील उसाचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. यंदाचा हंगाम कसा असेल? साखर हंगामापुढील आव्हाने काय आहेत, याविषयी..

गाळपासाठी किती ऊस उपलब्ध?

राज्यात उसाखालील एकूण क्षेत्र १४.०७ लाख हेक्टर आहे. त्यात खोडवा उसाचे क्षेत्र ५.१३ लाख हेक्टर आणि नव्या लागणीचे क्षेत्र ८.९४ लाख हेक्टर आहे. गाळपासाठी सुमारे १०२२.७३ लाख टन ऊस उपलब्ध आहे. त्यापैकी ९० टक्के ऊस गाळपासाठी येईल, असे गृहीत धरता, ९२१ लाख टन ऊस प्रत्यक्ष गाळपासाठी येण्याचा अंदाज आहे. साखर उतारा सरासरी ११.५ टक्के गृहीत धरता सुमारे १०३.५८ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. त्यातून इथेनॉल निर्मितीसाठी १५ लाख टन साखरेचा वापर होण्याचा अंदाज आहे. निव्वळ साखर उतारा १० टक्के गृहीत धरून आणि इथेनॉल निर्मितीसाठी लागणारी साखर वगळून राज्यात चालू हंगामात ८८.५८ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.

प. महाराष्ट्रात उसाची पळवापळवी होणार?

पश्चिम महाराष्ट्रात कारखान्यांची संख्या आणि घनता जास्त आहे. विशेषत: सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाचा तुटवडा भासतो. यंदा सोलापूर जिल्ह्यात कारखान्यांकडून उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. कारखान्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरून ऊस गाळपासाठी आणण्याची स्पर्धा सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक असणार आहे. कर्नाटकातील कारखाने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून ऊस नेतात. यंदा राज्य सरकारने परराज्यांत ऊस पाठविण्यास बंदी घातली होती. पण, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध पाहता, तो निर्णय सरकारला मागे घ्यावा लागला. यंदाच्या हंगामात उसाचा तुटवडा असल्यामुळे कार्यक्षेत्राच्या बाहेरील उसाचे गाळप करण्यावर कारखान्यांचा भर असणार आहे.

हेही वाचा >>>भारतीय कामगारांची गरज असलेल्या तैवानवर चीनची कुरघोडी; निर्भया प्रकरणावरून भारताची बदनामी

दुष्काळ, पाणीटंचाईचा परिणाम काय?

राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. ३६ पैकी २४ जिल्ह्यांत खरिपातील शेतीमालाचे उत्पादन ५० टक्क्यांच्या आतच राहिले आहे. कापूस, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने नुकताच ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. अपुऱ्या पावसामुळे रब्बीतही पेरण्या घटण्याचा अंदाज आहे. चारा पिकांअभावी मुळातच राज्यात चाराटंचाई आहे, त्यात यंदा भर पडली आहे. त्यामुळे शेतकरी चाऱ्यासाठी उसाचा वापर करू लागले आहेत. दुष्काळी, कमी पावसाच्या पट्टय़ात भविष्यात चारा छावण्या सुरू झाल्यास चाऱ्यासाठी उसाचाच वापर करावा लागणार आहे. त्यामुळे त्याचे नियोजन सरकारला करावे लागेल. हंगाम फेब्रुवारीअखेपर्यंत चालेल, असे गृहीत धरले तर शेतातील उभ्या उसाला फेब्रुवारीपर्यंत पाणी देणे शक्य होईल, अशी स्थिती नाही. त्यामुळे शेतकरी आणि कारखान्यांना तोडणीचे नियोजन करावे लागणार आहे.

कारखान्यांची फसवणूक थांबणार?

मागील गळीत हंगामात राज्यातील साखर कारखानदारांची सुमारे २०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कारखान्यांनी ऊसतोडणीसाठी वाहतूकदार आणि मुकादमांशी केलेल्या करारात ही फसवणूक झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सर्वाधिक ३२ कोटी रुपयांची फसवणूक झाली. गेल्या १५ वर्षांत राज्यातील साखर कारखानदारांचे सुमारे दोन हजार कोटी रुपये, ऊसतोडणी मुकादम आणि वाहतूकदारांनी बुडविले आहेत. दर वर्षी ऊसतोडणी करारातील पाच टक्के रक्कम बुडीत जाते. पण, मागील वर्षी हे प्रमाण वाढले.

हेही वाचा >>>IPL Retention 2024: मुंबई इंडियन्सला हार्दिक पंड्या मिळाला मग रवींद्र जडेजावर अशाच व्यवहारासाठी बंदी का घालण्यात आली होती?

मागील गाळप हंगाम कसा होता?

१५ ऑक्टोबर ते १८ एप्रिल २०२३ दरम्यान मागील गाळप हंगाम झाला. २१० साखर कारखान्यांनी १०५ लाख टन साखर उत्पादन केले. गाळप हंगाम २०२१-२२च्या तुलनेत ३२ लाख टनांनी साखर उत्पादन घटले होते. २०२१-२२ मध्ये १३७.२८ लाख टन साखर उत्पादन झाले होते.

लागवडीखालील क्षेत्र तेवढेच असूनही साखर उत्पादन १०५ लाख टनांपर्यंतच होऊ शकले. मागील वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत सतत पाऊस पडत होता. सततच्या पावसामुळे उसाची अपेक्षित वाढ झाली नाही, अपेक्षित वजन, गोडी भरली नाही त्यामुळे उसाचे वजन सरासरीच्या १५-२० टक्के कमी भरले आहे. सोलापूर, बीड, उस्मानाबाद विभागांत वजनात मोठी तूट आली होती

dattatray. jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained what are the challenges ahead of this year sugar season print exp 11 3 amy 95