जनतेचे – सर्वसमान्यांचे प्रश्न सोडवणारे सर्वोच्च व्यासपीठ म्हणून ‘विधिमंडळ’ची ओळख आहे. राज्यातील विविध समस्या विधिमंडळात उपस्थित केल्या जातात, विविध मुद्दे मांडले जातात, जनतेच्या कल्याणासाठी इथे चर्चा होत निर्णय घेतले जातात. कायदेमंडळ म्हणूनही विधिमंडळाची ओळख आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधिमंडळामधे विधानसभा आणि विधानपरिषद अशी दोन सभागृहे असतात. या दोन्ही सभागृहात लोकप्रतिनिधी, सदस्य हे विविध माध्यमातून नेमले जातात, निवडून येतात. या सदस्यांनी विधिमंडळाच्या कामकाजात निर्भिडपणे सहभागी असावे यासाठी विविध आयुधे – नियम हे सदस्यांसाठी तयार करण्यात आले आहेत. यापैकीच एक प्रमुख म्हणजे विधिमंडळाच्या कोणत्याही समस्याला कुठल्याही प्रकरणात अटक करण्यापूर्वी सदस्य असलेल्या संबंधित सभागृहाच्या प्रमुखाची ( विधानपरिषदेचे सभापती किंवा विधानसभेचे अध्यक्ष ) यांची अनुमती घेतली जाते, एक औपचारिकता पुर्ण केली जाते. एवढंच नाही तर विधिमंडळ हे कायदे करणारे मंडळ असल्याने न्यायालयाने दिलेला एखादा निर्णय न स्विकारण्याबाबत किंवा निर्णयाला अनुसरुन नवा निर्णय घेण्याचे – कायदा करण्याचे स्वातंत्र्य हे विधिमंडळाला आहे. या सर्वांवरुन विधिमंडळ राज्यात का सर्वोच्च आहे हे लक्षात येईल.

तेव्हा सदस्यांसाठी असलेल्या अशा अनेक, विविध नियमातील एक भाग म्हणजे गणवेषधारी पोलिसांना विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असतांना विधिमंडळाच्या इमारतीमध्ये तसंच इमारतीच्या परिसरात प्रवेश दिला जात नाही. विधिमंडळ अधिवेशनानिमित्त विधिमंडळात किंवा इमारतीच्या परिसरात बंदोबस्ताला असलेला पोलिस- कर्मचारी हा साध्या वेषात तैनात केला जातो. एवढंच काय विधिमंडळात अनेकदा पोलिस अधिकाऱ्यांना, अगदी पोलिस आयुक्त – महासंचालकांना बैठकीनिमित्त – माहिती देण्याच्या निमित्ताने यावे लागते, तेव्हा हे वरिष्ठ अधिकारी सुद्धा गणवेषात न येता साध्या वेषात येतात. विधिमंडळ हे सर्वोच्च असल्यानेच इथे गणवेषधारी व्यक्तिला प्रवेश दिला जात नाही, विधिमंडळच्या सदस्यांना- आमदारांना विधिमंडळात भयमुक्त वातावरणात काम करता यावे हाही त्यामागचा एक हेतू आहे.

विधिमंडळात विधानपरिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष हे सर्वोच्च असतात. तेव्हा अति महत्त्वाचा किंवा विशेष कार्यक्रम असला तरच पोलिस कर्मचाऱ्याला गणवेषात येण्याची परवानगी ही सभापती किंवा अध्यक्षांच्या परवानगीनेच दिली जाऊ शकते. हाच नियम हा इतर गणवेषधारी कर्मचाऱ्यांना ( सैन्यदल वगैरे ) लागू असतो. त्यामुळेच विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असतांना कधीही विधिमंडळ इमारतीच्या आत किंवा इमारतीच्या परिसरात गणवेषधारी पोलिस किंवा कोणत्याही प्रकारची गणवेषधारी व्यक्ति ही दिसणार नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explanation why dont police appear in uniforms in legislator why they are in civil dress asj