लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या असते. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचं गणित हे लोकसंख्येवर अवलंबून असतं. नैसर्गिक संसाधने, शेती, उद्योग, व्यापार, सेवा, क्षेत्र, उत्पन्न, रोजगार, गरिबी, शासन व्यवस्था, दळणवळण, पायाभूत सुविधा यावर लोकसंख्येचा प्रभाव दिसून येतो. त्यात देशातील लोकसंख्या कोणत्या वयोगटातील आहे, याचा देखील अभ्यास केला जातो. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांशांपेक्षा जास्त लोकसंख्या १५ वर्षाखालील तरुणांची आहे. पण गेल्या पाच वर्षात तरुण लोकसंख्याच्या वाट्यात किंचित घट झाल्याचं पाहायला मिळते. राष्ट्र्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण ४ (२०१५-१६ )आणि राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण ५ (२०१९-२१) दरम्यान घेण्यात आलेल्या सर्व्हेत याबाबत घट दिसून आली आहे. १५ वर्षांखालील तरुणांच्या लोकसंख्येत २ टक्क्यांची घट झाल्याचं दिसून आलं. १५ वर्षाखालील तरुणांची लोकसंख्या २९ टक्क्यांवरून २७ टक्के इतकी झाली आहे. दुसरीकडे ६० वर्षांवरील लोकसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. ६० वर्षांवरील लोकसंख्या १० टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निम्म्याहून अधिक लोकसंख्या ३० वर्षाखालील

देशात ३० वर्षांखालील लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक आहे. पण राष्ट्रीय कुटुंब आरोग्य आरोग्य सर्व्हेक्षण ४ आणि ५ ची तुलना पाहता किंचीत घट झाल्याचं पाहायला मिळते. २०१५-१६ च्या सर्व्हेक्षणात ही लोकसंख्या ५५.५ टक्के इतकी होती. तर २०१९-२० सर्व्हेत ही लोकसंख्या ५२ टक्के इतकी आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण लोकसंख्येची विभागणी ०-४ वर्षे ते ७५-७९ अशा पाच वर्ष वयोगटामध्ये करते. तर ८० पेक्षा जास्त वयोगटातील लोकांची गणना एकाच वयोगटात केली जाते. देशातील एकूण लोकसंख्येचं वय पाहता भारताची लोकसंख्या तरुण आहे. असं असलं तरी गेल्या ५ वर्षात प्रजनन क्षमता कमी झाल्याचं दिसत आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण ५ मधील आकडेवारी ही २७,६८,३७१ व्यक्तींवर आधारित असून ६,३६,६९९ कुटुंबाचे नमुने घेण्यात आले आहेत.

कुटुंबाचा सरासरी आकार

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण कुटुंबाची व्याख्या एक व्यक्ती किंवा संबंधित किंवा असंबंधित व्यक्तींचा समूह म्हणून करते. जे एकाच घरात एकत्र राहतात. एका प्रौढ पुरुष किंवा स्त्रीला घराचे प्रमुख म्हणून स्वीकारतात. तसेच समान गृहनिर्माण व्यवस्था सामायिक करतात आणि कोण एकच एकक मानले जाते. २०१५-१६ आणि २०१९-२१ या दरम्यान घेतलेल्या सर्व्हेत कुटुंबाचा आकार सरासरी कमी झाल्याचं दिसून आला आहे. ४.६ व्यक्तींवरून ४.४ इतका झाल्याचं दिसून आलं आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण ४ मध्ये १५ टक्के महिला या कुटुंब प्रमुख होत्या, तर सर्व्हेक्षण ५ मध्ये कुटुंबांमध्ये १८ टक्के महिला प्रमुख आहेत.

डिजिटल जनगणना

भारतात दर दहा वर्षांनी जनगणना प्रक्रिया राबवली जाते. करोना साथीच्या रोगामुळे देशात गेल्यावर्षी जनगणनेची प्रक्रिया राबवण्यात आली नाही. यापूर्वी ही प्रक्रिया कागदोपत्री केली जायची. पण आता जनगणना प्रक्रियेचं डिजिटलायझेशन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. ही प्रक्रिया डिजिटल केल्यामुळे मोजणी प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. एवढंच नव्हे तर, जन्म आणि मृत्यू बाबतचं रजिस्टरही याला जोडण्यात (लिंक) येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. यामुळे देशात प्रत्येक जन्म आणि मृत्यूनंतर जनगणना आपोआप अपडेट होणार आहे. गृह मंत्रालयाने जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्रांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than half of india population is under 30 know analysis rmt