Mumbai Coastal Road Project News : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प म्हणजेच कोस्टल रोड येत्या सोमवारपासून (२७ जानेवारी) वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. सागरी किनारा आणि वरळी वांद्रे सागरी सेतू जोडणाऱ्या उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या प्रजासत्ताक दिनी या पुलाचे लोकार्पण होणार आहे. विशेष म्हणजे, वरळी आणि हाजी अली या चार नवीन आंतरमार्गिकांचे उद्घाटन देखील रविवारीच होणार आहे. दरम्यान, कोस्टल रोड प्रकल्प काय आहे. यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ कसा वाचणार, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोस्टल रोड प्रकल्पाचे काम कुठपर्यंत?

मुंबई किनारी रस्ता हा दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. उत्तर वाहिनी पुलाचे उद्घाटन हे मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा (MCRP) पहिला टप्पा पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असेल. सध्या मरिन लाइन्स ते वांद्रे सी-लिंक प्रवासासाठी जवळपास एक तासाचा वेळ लागतो. मात्र, या प्रकल्पामुळे हा प्रवास केवळ १० मिनिटांत पूर्ण होणार आहे. सागरी किनारा मार्ग वरळी-वांद्रे सेतूला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले आहेत.

आणखी वाचा : Punjab Drug Case : ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या पंजाबने केंद्राकडे ६०० कोटींची मदत का मागितली?

दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचे लोकार्पण १२ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले होते. त्यावेळी दक्षिण वाहिनी पुलावरून उत्तरेकडे (वांद्रेकडे) जाणाऱ्या वाहतुकीला मुभा देण्यात आली होती. आता उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झाल्याने सोमवारपासून दोन्ही पुलावरून वाहने कोस्टल रोडवर जाऊ शकतील. दरम्यान, वरळी जंक्शन येथे तीन आणि हाजी अली येथे एक अशा चार नवीन आंतरमार्गिकांचे उद्घाटन झाल्यानंतर वरळी, प्रभादेवी, लोअर परळ आणि लोटस जंक्शनकडे जाणाऱ्या वाहनांना मोठी मदत होईल.

आतापर्यंत कोस्टल रोडचे कोणते भाग सुरू झाले?

उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. गेल्या वर्षभरात, या मुख्य रस्त्याचे टप्प्याटप्प्याने उद्घाटन झाले होते. ११ मार्च २०२४ रोजी वरळी ते मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या दोन बोगद्यांसह ९.२९ किमीच्या दक्षिणेकडील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर मरीन ड्राइव्ह आणि हाजी अली यांना जोडणारा उत्तरेकडील मार्ग ११ जून २०२४ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तर हाजी अली आणि वरळी दरम्यानचा शेवटचा ३.५ किमीचा मार्ग एका महिन्यानंतर सुरू करण्यात आला. सप्टेंबर २०२४ मध्ये दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी दक्षिण वाहिनी पुलावरून उत्तरेकडे (वांद्रेकडे) जाणाऱ्या वाहतुकीला मुभा देण्यात आली होती.

वरळी येथील सहा आंतरमार्गिकांपैकी आतापर्यंत एक मार्गिका उघडण्यात आली आहे. आणखी तीन आंतरमार्गिका रविवारी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. हाजी अली येथे ८ आंतरमार्गिका असून त्यापैकी सहा आधीच वाहतुकीसाठी खुल्या आहेत. सातवी मार्गिका (हाजी अली ज्यूस सेंटर ते मरीन ड्राइव्ह) सोमवारी उघडणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आकडेवारीनुसार, मार्च ते डिसेंबर २०२४ दरम्यान जवळपास ५० लाख वाहनांनी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो.

कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पुढे काय?

मुख्य रस्त्याच्या तीन प्रलंबित भागांचे अंतिम काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये वरळीतील दोन आणि हाजी अली येथील तीन प्रलंबित कामांचा समावेश आहे. याशिवाय कोस्टल रोड प्रकल्पाच्या अंतर्गत आणखी काही प्रकल्पांचे काम सुरू आहेत. ज्यामध्ये या ७० एकर जागेचा पूर्ण विकास, ब्रीच कँडी आणि वरळी दरम्यानचा रस्ता, पादचाऱ्यांसाठी अंडरपास आणि वाहनतळाची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.

हेही वाचा : जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय नोकऱ्या कोणत्या? नवीन सर्वेक्षण काय सांगते?

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, सर्व प्रलंबित प्रकल्पांसाठी डिसेंबर अखेरची मुदत देण्यात आली आहे. ७० एकरवरील विकासकामे येत्या दोन वर्षात पूर्ण होतील, असंही ते म्हणाले. या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई महापालिकेने कोस्टल रोड प्रकल्पामध्ये मोकळ्या जागांची रचना, विकास आणि देखभाल करण्यासाठी खासगी कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांबरोबर चर्चा केली होती. अधिकाऱ्यांच्या मते, खाजगी संस्था मोकळ्या जागांचा विकास आणि त्याची देखभाल करण्याची जबाबदारी घेतात आणि संपूर्ण खर्च उचलतात.

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याची काय स्थिती?

कोस्टल रोड प्रकल्पाचा दुसरा टप्पा मुंबईतील उत्तरेकडील उपनगरांमध्ये वाहतूक सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ज्याअंतर्गत वर्सोवा ते दहिसर या क्षेत्रात एक २२.९३ किमी लांबीचा हाय-स्पीड कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक दृष्टीने मोठी सुधारणा करणे आहे. दुसऱ्या टप्प्यात, मुंबईच्या वायव्य उपनगरांना व्यापून वर्सोवा ते दहिसर यांना जोडणारा २२.९३ किमी लांबीचा हाय-स्पीड कॉरिडॉर बांधण्याची बीएमसीची योजना आहे. यामध्ये मालाडमधील माइंडस्पेस आणि कांदिवलीतील चारकोप गावादरम्यान सुमारे ४ किमी लांबीचा दुसरा बोगदा बांधला जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, वरील प्रकल्पासाठी आवश्यक परवानगी आणि मान्यता घेतली गेली आहे. सध्या प्रकल्प पर्यावरण मंत्रालय आणि वन विभागाच्या मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai coastal road project how the bow string arch bridge to bandra worli sea link will ease travel sdp