Tulsi Gabbard Meets PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. अमेरिकेत दाखल झाल्यानंतर मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या प्रमुख (DNI) तुलसी गॅबार्ड यांची बुधवारी (१२ फेब्रुवारी) भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी तुलसी यांचं अभिनंदन केलं आणि भारत-अमेरिका संबंधांबद्दल चर्चा केली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तुलसी यांच्याकडे १८ गुप्तचर यंत्रणांची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, तुलसी गॅबार्ड नेमक्या आहे तरी कोण, त्याचा भारताशी काही संबंध आहे का, याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत तुलसी गॅबार्ड?

१९८१ मध्ये तुलसीचा जन्म अमेरिकेच्या सामोआ प्रदेशात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माइक गॅबार्ड आणि आईचे नाव कॅरोल गॅबार्ड असे आहे. गॅबार्ड दाम्पत्याला पाच अपत्यं असून त्यापैकी तुलसी सर्वात मोठ्या आहेत. १९८३ मध्ये जेव्हा तुलसी दोन वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचे कुटुंबीय अमेरिकेच्या हवाई राज्यात स्थायिक झाले. तुलसी यांचे वडील सुरुवातीपासूनच रिपब्लिकन पक्षाशी जोडले गेले होते. मात्र, २००७ नंतर त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षात प्रवेश केला. २०१३ मध्ये तुलसी पहिल्यांदाच हवाई राज्यातून खासदार म्हणून निवडून आल्या आणि २०२१ पर्यंत त्या पदावर राहिल्या.

तुलसी यांचा हिंदू धर्माशी काय संबंध आहे?

अमेरिकेच्या हवाई राज्यात स्थायिक झाल्यानंतर तुलसी यांच्या आई कॅरोल गॅबार्ड यांनी हिंदू धर्म स्वीकारला. तेव्हा त्यांच्या वडिलांनी रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्मातच राहणे पसंत केले. हिंदू धर्माचा आदर असल्याने गॅबार्ड कुटुंबीयांनी आपल्या सर्व मुलांची नावे भक्ती, जय, आर्यन, तुलसी आणि वृंदावन अशी ठेवली आहेत. तुलसी गॅबार्ड स्वतःला हिंदू म्हणून सांगतात, परंतु त्या भारतीय वंशाच्या नाहीत. एप्रिल २०१५ मध्ये जेव्हा तुलसी गॅबार्ड यांचे अमेरिकेत लग्न झाले, तेव्हा भारतातही त्यांची चर्चा झाली. तुलसी यांनी अमेरिकन सिनेमॅटोग्राफर अब्राहम विल्यम्स यांच्याशी वैदिक पद्धतीने लग्नगाठ बांधली.

आणखी वाचा : Story of Savarkar : सावरकरांच्या सागरीउडीने उडवली होती ब्रिटिशांची झोप; त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

तुलसी यांच्या लग्नात राम माधव यांची उपस्थिती

द कॅरव्हॅनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील तत्कालीन भारतीय राजदूत तरणजीत संधू आणि राम माधव हे देखील तुलसी यांच्या लग्नाला उपस्थित होते. तेव्हा राम माधव हे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते होते. याआधी ते दहा वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) राष्ट्रीय प्रवक्ते होते. लग्न समारंभात राम माधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेश वाचून दाखवला होता आणि तुलसी यांना भेट म्हणून गणपतीची मूर्ती दिली होती.

शाळेत झाडू मारून मोदींच्या मोहिमेला दिला पाठिंबा

लग्नाच्या काही महिने आधी तुलसी भारतातदेखील आल्या होत्या. तीन आठवड्यांचा मुक्काम केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॅबिनेट मंत्री आणि भारतीय लष्करप्रमुखांची भेट घेतली होती. भेटीदरम्यान, तुलसी यांनी पंतप्रधान मोदींचे तोंड भरून कौतुक केले होते. “मोदी हे खूप मजबूत नेते असून भारताच्या प्रगतीबद्दल त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. ते नेहमीच देशाच्या विकासासाठी धडपड करतात”, असं तुलसी यांनी म्हटलं होतं. एवढेच नाही तर त्यांनी एका शाळेत झाडू मारून मोदींच्या स्वच्छता मोहिमेला पाठिंबाही दिला होता.

भगवद्गीतेवर हात ठेऊन घेतली खासदारकीची शपथ

तुलसी गॅबार्ड या वैष्णव माता, भगवान श्रीकृष्ण यांची नियमित पूजा करतात. त्यांनी अलीकडेच असं म्हटलं होतं की, “कुटुंबीयांनी हिंदू नाव ठेवल्यामुळे मला खूप भेदभाव सहन करावा लागला होता. हा केवळ आमच्या कुटुंबीयांवर वैयक्तिक हल्ला नव्हता तर हिंदू आणि हिंदू धर्माविरुद्ध धार्मिक कट्टरता वाढवण्याच्या मोठ्या प्रयत्नांचा एक भाग होता.” दरम्यान, तुलसी या जेव्हा पहिल्यांदा खासदार झाल्या, तेव्हा त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून संसदेच्या सदस्यपदाची शपथ घेतली होती. भगवद्गीता मला माझ्या देशासाठी आणि इतरांसाठी माझे जीवन समर्पित करण्याची प्रेरणा देते, असं त्या म्हणाल्या होत्या. २०१७ मध्ये पुन्हा निवडून आल्यानंतर तुलसी यांनी पुन्हा एकदा भगवद्गीतेवर हात ठेवून सदस्यपदाची शपथ घेतली होती.

बांगलादेशातील घटनेचा केला होता निषेध

२०१४ मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांना भगवद्गीता भेट म्हणून दिली होती. २०२१ मध्ये बांगलादेशात दुर्गापूजेदरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये १०० हून अधिक हिंदू कुटुंबांवर हल्ला करण्यात आला आणि अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि दुकानांमध्ये तोडफोडीच्या घटना घडल्या. या घटनेचा तुलसी यांनी तीव्र शब्दात निषेध केला. “बांगलादेशातील मंदिरांमध्ये देवाच्या भक्तांविरुद्ध असा द्वेष आणि हिंसाचार पाहून माझे मन दुखावते. मंदिरे आणि मूर्ती जाळून नष्ट केल्याने त्यांचा देव प्रसन्न होतो ही या जिहादींची धारणा आहे”, अशी टीका तुलसी यांनी केली होती.

कलम ३७० रद्द केल्यानंतर तुलसी काय म्हणाल्या होत्या?

५ ऑगस्ट २०१९ रोजी मोदी सरकारने कलम ३७० रद्द करून जम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला. तेव्हा सप्टेंबर २०१९ मध्ये, तुलसी गॅबार्ड यांना काश्मीरबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तुलसी म्हणाल्या, “काश्मीरचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे, भूतकाळात तिथे जे काही घडले आहे, ते भयंकर होते. अनेक कुटुंबांना त्यांचे घर सोडावे लागले होते, ते अजूनही परत येऊ शकलेले नाहीत.”

कलम ३७० चा उल्लेख न करता तुलसी म्हणाल्या, “मागील सरकारच्या कायदे आणि धोरणांनुसार, येथे समलैंगिकता बेकायदा होती. या धोरणांमुळे महिलांचा आवाज दाबला जात होता. काही दिवसांपूर्वी मी एका महिलेला भेटले, तिने मला सांगितले की, काश्मिरी महिलांना मालमत्ता बाळगण्याचा अधिकार नाही. यापूर्वी, तुलसी यांनी बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या संरक्षणाशी संबंधित अमेरिकन संसदेत एक प्रस्ताव मांडला होता. १९७१ मध्ये बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराला पाकिस्तानी लष्कर जबाबदार आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : ईव्हीएममधील डेटा सुरक्षित ठेवा, सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक आयोगाला सूचना; कारण काय?

पंतप्रधान मोदी आणि तुलसी गॅबार्ड यांच्यात काय चर्चा झाली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतल्यानंतर आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट शेअर केली. त्यात ते म्हणतात, “वॉशिंग्टन डीसी येथे पोहचल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भारत-अमेरिका मैत्रीच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली, ज्याच्या तुलसी या नेहमीच मजबूत समर्थक राहिल्या आहेत.” व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका समारंभात गॅबार्ड यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालकपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांतच ही बैठक झाली.

पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा

फ्रान्सचा तीन दिवसांचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यासाठी दाखल झाले. यावेळी तेथील भारतीय नागरिकांनी मोदींचे जल्लोषात स्वागत केले. पंतप्रधानांना बघताच भारतीयांनी ‘भारत माता की जय’ आणि “मोदी-मोदी’ अशा घोषणा दिल्या. पंतप्रधान मोदींनी या स्वागताचे कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली. “हिवाळ्यातील थंडीत उबदार स्वागत. थंड हवामान असूनही वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय समुदायाने माझे खूप खास स्वागत केले, मी त्यांचे आभार मानतो”, असं पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, पंतप्रधान मोदी आपल्या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना भेटतील. याशिवाय ते अमेरिकेतील उद्योग क्षेत्रामधील नेत्यांच्याही भेटीगाठी घेतील. भारत-अमेरिका संबंध आणखीच मजबूत होण्यासाठी पंतप्रधानांचा हा दौरा प्रभावी ठरेल, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi meets tulsi gabbard in us whats her connection to india sdp