बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी तपासणीमध्ये एका महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटात बाळ असल्याचे दिसून आले आहे. वैद्यकीय भाषेत त्याला (फिट्स इन फिटू) असे म्हणतात. वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ प्रकरणाची बुलढाण्यासह संपूर्ण राज्यात चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फिट्स इन फिटू’ म्हणजे काय?

बुलढाणातील शासकीय रुग्णालयात एका ३२ वर्षीय गर्भवती महिलेची आठव्या महिन्यात सोनोग्राफी केली असता महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटात बाळसदृश्य मांसाचा गोळा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डॉक्टर आणि तज्ज्ञांनी पुन्हा दोन ते तीन वेळा सोनोग्राफी केली. मात्र त्यात बाळाच्या गर्भात मांसाचा गोळा स्पष्टपणे दिसून आला. त्यानंतर डॉक्टरांनी जगातील विविध भागातील काही शोध प्रबंध तपासले असता त्यात या स्थितीला ‘फिट्स इन फिटू’ असे संबोधतात असे स्पष्ट झाले. हा दुर्मिळ प्रकार असून हा मांसाचा गोळा काही दोषांमुळे गर्भातील बाळाच्या पोटातच तयार होतो, असे निष्पन्न झाले.

महाराष्ट्रासह देश-विदेशात किती प्रकरणांची नोंद?

जगात फिट्स इन फिटूची सुमारे २०० प्रकरणांची नोंद आहे. त्यापैकी भारतात १० ते १५ प्रकरणे यापूर्वी नोंदवली आहे. महाराष्ट्रात मात्र अशा प्रकरणांची संख्या कमी असल्याचे स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जगात १८०८ मध्ये जाॅर्ज विलियम्स यंग यांनी या पद्धतीच्या पहिल्या प्रकरणाची नोंद केली. तर भारतात एप्रिल २०२३ मध्ये, बनारस हिंदू विद्यापीठाच्या सर सुंदरलाल रुग्णालयात या पद्धतीच्या एका प्रकरणाची नोंद झाली. या १४ दिवसांच्या बाळावर शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून ३ गोळे बाहेर काढण्यात आले.

मांसाचा गोळा तयार होण्याचे कारण काय?

साधारणपणे महिलांमध्ये जुळ्या गर्भधारणेत हा प्रकार आढळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. संबंधित महिलेच्या गर्भाच्या पेशींमध्ये विभाजन होताना, अगदी सुरुवातीच्या काळात असमान विभाजन झाले तर अशा प्रकारचा गर्भ बांडगुळासारख्या सामान्य गर्भातील बाळाच्या पोटात विकसित होतो. त्याची हळूहळू वाढ झाल्यावर तो सोनोग्राफीमध्ये दिसू लागतो.

आई-बाळाला संभावित धोके काय?

फिट्स इन फिटूमुळे आई होणाऱ्या महिलेच्या गर्भात जास्त गर्भजल तयार होऊ शकते. त्यामुळे वेळेआधी प्रसूतीचाही धोका आहे. या महिलेला प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्राव होण्याचा धोका बळावतो. तर गर्भातील बाळाचे पोट फुगणे, ओकाऱ्या होणे, कावीळ, लघवी साचून राहणे, पोटात संक्रमण वा रक्तस्रावाचा धोका असतो. क्वचित प्रकरणांमध्ये मांसाच्या गोळ्याचे कर्करोगातही रूपांतर होऊ शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

गोळा कसा काढला जातो?

महिलेची प्रसूती झाल्यावर बाळावर शस्त्रक्रिया करून मांसाचा गोळा (फिट्स इन फिटू) लवकरात लवकर शस्त्रक्रियेद्वारे काढावा लागतो. त्यानंतर भविष्यातही तज्ज्ञ डॉक्टरांकडून फेरतपासणी करावी लागते.

ही स्थिती टाळता येऊ शकते काय?

महिलेच्या गर्भात बाळाची वाढ होताना पेशींचे असमान विभाजन झाल्यामुळे फिट्स इन फिटू ही स्थिती निर्माण होते. पाच लाख बाळांमध्ये एखाद्या बाळात फिट्स इन फिटू ही स्थिती उद्भवत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही स्थिती टाळता येत नाही. परंतु ही स्थिती दुर्मिळ आहे.

बुलढाण्यातील महिलेची स्थिती काय?

जानेवारी अखेरीस बुलढाणा शहरात ‘आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ’ असल्याचे निदर्शनास आले होते. महिलेची ‘प्रसूती’ सुरळीत झाली असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे. सध्या दोघे मायलेक सुखरूप आहेत. लवकरच या नवजात बाळाच्या पोटातील मांसाचा गोळा काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी अमरावती येथील शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले. तज्ज्ञांच्या देखरेखीत वरील शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

डॉक्टरांचे म्हणणे काय?

फिट्स इन फिटू प्रकरणात महिलेच्या पोटात बाळ असल्याचे सोनोग्राफी चाचणीत निदर्शात येत असले तरी बहुतांश प्रकरणात हे बाळ जिवंत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे फक्त ते दिसायला बाळासारखे असते. परंतु त्याचे हृदयाचे ठोके नसतात. त्यामुळे याला मांसाचा गोळाही म्हटले जात असल्याचे नागपुरातील सुप्रसिद्ध स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञ डॉ. सुषमा देशमुख यांचे म्हणणे आहे. दरम्यान, बाळाच्या जन्मानंतर लवकरात लवकर शस्त्रक्रियेतून हा मांसाचा तुकडा बाहेर काढणे गरजेचे असल्याचेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pregnant buldhana woman detected with rare fetus in fetu condition print exp zws