जागतिक आशियाई शेअर बाजारांतील कमकुवत संकेतांमुळे मंगळवारच्या व्यापार सत्रात शेअर बाजारात जोरदार विक्रीचा दबाव दिसून आला. विशेष म्हणजे देशांतर्गत इक्विटी बाजार १ टक्क्याने घसरल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बँक ऑफ जपान (BoJ) ने मंगळवारी १७ वर्षांत प्रथमच व्याजदर वाढवले. त्याचाही प्रभाव जागतिक शेअर बाजारावर पाहायला मिळत आहे. मंगळवारी स्मॉल कॅप निर्देशांक सुमारे १.१५ टक्क्यांनी घसरल्याने आणि मिड कॅप निर्देशांक १.५० टक्क्यांहून अधिक घसरल्याने बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव दिसून आला.

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये कशी झाली घसरण?

दुपारच्या व्यापार सत्रात बीएसईचा सेन्सेक्स ७०३ अंक म्हणजेच ०.९३ टक्क्यांनी घसरून ७२,०७२.२१ वर आला. इंट्राडे ट्रेड्सदरम्यान निर्देशांक १ टक्क्याने घसरून ७२,००७.३५ च्या नीचांकी पातळीवर घसरला. NSE चा निफ्टी १ टक्क्याने म्हणजेच २०४.७५ अंकांनी घसरून २१,८४७.४५ वर आला. इंट्राडे ट्रेड्समध्ये तो २१,८०८ च्या नीचांकी पातळीवर घसरला होता.

हेही वाचाः गार्डन सिटी बंगळुरूत पाणीच नाही; तीव्र टंचाईमागे काय आहे कारण?

बाजारात घसरण कशामुळे झाली?

यूएस फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणाच्या निर्णयापूर्वी जागतिक बाजारात विक्रीचा जोर दिसून आला, त्याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे. मुख्य धोरण दर ठरवण्यासाठी फेडची १९ आणि २० मार्च रोजी बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतरही शेअर बाजारात अशाच पद्धतीचे चढ-उतार पाहायला मिळू शकतात. खरं तर फेडरल रिझर्व्हने दर स्थिर ठेवणे अपेक्षित आहे. सध्याची परिस्थितीत दर जैसे थे ठेवणेच शेअर बाजारांच्या दृष्टीनं योग्य आहे, असंही एयूएम कॅपिटलचे नॅशनल हेड ऑफ वेल्थ मुकेश कोचर यांचं म्हणणं आहे.

हेही वाचाः विश्लेषण : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हल्ला, कारण काय? नेमकं काय घडतंय?

फेडने अपेक्षेपेक्षा जास्त व्याजदर वाढवले तर त्याचा जागतिक बाजाराबरोबर देशांअंतर्गत बाजारांवरही प्रभाव दिसून येईल. कारण गेल्या दोन महिन्यांत वाढलेल्या अमेरिकेतील चलनवाढीच्या घसरणीला आळा घालणे महत्त्वाचे आहे आणि फेड नेहमीच येणाऱ्या डेटावरून विकसित दृष्टिकोन अंगीकारत असल्याने काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, ” असेही जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही. के. विजयकुमार यांना वाटते. डॉलर निर्देशांक आणि अमेरिकेतील रोखे उत्पन्नातील वाढ ही चिंता दर्शवते, असेही त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे यूएस फेड चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत दर कमी करण्यास सुरुवात करेल, असंही तज्ज्ञांचं मत आहे. आपल्या चलनविषयक धोरणात बँक ऑफ जपान (BOJ) ने २००७ नंतर प्रथमच व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आठ वर्षांतील स्थिर व्याजदर संपुष्टात आले आहे. जपानने उणे ०.१ टक्क्यांवरून व्याजदर शून्य ते ०.१ टक्क्यांपर्यंत वाढवला.

आगामी धोरणात RBI काय करणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ची चलनविषयक धोरण समिती(MPC)ची बैठक ३ ते ५ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्यात रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याची अपेक्षा आहे. फेब्रुवारीमध्ये ग्राहक किंमत आधारित महागाई (CPI) वार्षिक आधारावर ५.१ टक्क्यांवर आली, ती जानेवारी प्रमाणेच होती. आर्थिक बाबतीत चलनविषयक धोरणाचा मार्ग मोकळा केला आहे, परंतु महागाई अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेली नसल्यामुळे आरबीआय दर कमी करण्यास किंवा खूप लवकर भूमिका बदलण्यापासून सावध आहे,” असंही क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्सने अलीकडील अहवालात सांगितले आहे.

येत्या पतधोरणात आरबीआयने रेपो दर स्थिर ठेवल्यास आरबीआयनं धोरणात्मक भूमिका कायम ठेवल्याचं म्हणता येईल. आरबीआय पुढील पाऊल ठरवण्यापूर्वी फेडच्या संकेतांची प्रतीक्षा करेल. आम्हाला जूनपासून दोन २५ बीपीएस रेपो दर कपातीची अपेक्षा आहे. रेपो दर आता ६.५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत खाली आणला जाऊ शकतो, असेही वर्षअखेरीस एचएसबीसी ग्लोबल रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे.

कोणत्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली?

NSE कंपन्यांमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), सिप्ला, नेस्ले इंडिया लिमिटेड आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे शेअर्स सर्वाधिक घसरले. बजाज ऑटो, भारती एअरटेल, बजाज फायनान्स आणि हिंदाल्कोचे शेअर्स सर्वाधिक वाढले.