पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सूरत कोर्टाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षातील नेत्यांकडून केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीका झाली. याच गदारोळात काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी, पंतप्रधान मोदी यांनी २०१८ च्या संसदेतील अधिवेशनात त्यांना ‘शूर्पणखा’ म्हटल्याचे ट्वीट केले. या विधानानंतर समाज माध्यमांवर शूर्पणखा हा विषय बहुचर्चेत आला आणि पंतप्रधान मोदी नक्की काय म्हणाले होते यावर वादविवाद सुरू झाला. या निमित्ताने रामायणातील आणि भारतीय मिथकांतील शूर्पणखेलाही समजून घ्यायला हवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शूर्पणखा ही आपल्याला सर्वसाधारण अक्राळविक्राळ राक्षसी म्हणून माहीत आहे. त्यापलीकडे जाऊन प्राचीन भारतीय कथा अनेक गोष्टी उलगडतात. प्रत्येक कथा कालानुरूप वेगवेगळ्या रूपांत शूर्पणखेचे अस्तित्व दर्शवणारी आहे. खरेच पौराणिक कथांमधील शूर्पणखा इतक्याच मर्यादित स्वरूपात आहे का? हे या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.

आणखी वाचा : विश्लेषण: एअर इंडियाच्या विमानातील बॉम्बस्फोट ते ऑपरेशन ब्लू स्टार- खलिस्तानी चळवळीचा रक्तरंजित इतिहास

शूर्पणखेचा पहिला उल्लेख कुठे येतो? तिला एवढे महत्त्व का आहे?

शूर्पणखा आपल्या भेटीस येते ती रामायणाच्या कथांमधून, रामायणात जितके राम, सीता, रावण महत्त्वाचे आहेत, तितकीच शूर्पणखाही महत्त्वाची असल्याचे लक्षात येते. किंबहुना ती नसती तर रामायण घडलेच नसते कदाचित, इतके तिचे महत्त्व प्रकर्षाने जाणवणारे आहे. आपल्याला एकच वाल्मीकी रामायण माहीत असले तरी भारतीय संस्कृतीत रामायणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांचे लेखक, काळ हा भिन्न असल्याने रामायणाच्या कथांमध्ये, तसेच कथेतील पात्रांमध्ये विविधता आढळते. त्यांत रामायण, शाक्त रामायण, दशरथ जातक (बौद्ध रामायण), पौमचरियम रामायण (जैन रामायण), गोंड रामायण अशा अनेक सांप्रदायिक तसेच प्रांतीय विविधता असलेल्या रामायण कथांचा समावेश होतो. शाक्त रामायणात शक्ती (देवी) म्हणजे सीताच रावणाचा वध करते, तर जैन रामायणानुसार लक्ष्मण हा रावणाचा वध करतो कारण राम हा अहिंसा पाळणारा पूर्ण पुरुष असल्याने त्याने वध करणे हे तत्त्वत: चुकीचे ठरले असते. हीच विविधता शूर्पणखेच्या बाबतीतही दिसून येते.

शूर्पणखा हे नाव तिला कशावरून प्राप्त झाले?

शूर्पणखा ही कैकसी व ऋषी विश्रवा यांची कन्या होती. विशेष म्हणजे शूर्पणखा ही विश्रवा यांची लाडकी मुलगी होती. म्हणूनच त्यांनी तिचे नाव मीनाक्षी (जिचे डोळे माशाच्या आकाराप्रमाणे आहेत) असे ठेवले. तिची नखे ही चंद्रकोरीप्रमाणे सुंदर अर्धवर्तुळाकार होती. म्हणूनच ती ‘चंद्रनखा’ या नावानेदेखील ओळखली जात होती. कालांतराने तिच्या पतीच्या निधनानंतर ती विद्रूप झाल्याचे संदर्भ कथांमध्ये सापडतात. यात तिची नखे अवास्तव मोठी, सुपासारखी वाढल्याने ‘चंद्रनखा’ ही ‘शूर्पणखा’ म्हणून प्रसिद्ध झाली. (सुपासारखी मोठी वाढलेली नखे)

आणखी वाचा: करवीरनिवासिनी महालक्ष्मीचा निस्सीम भक्त हुतात्मा मुतय्या शिलालेखातून अजरामर!

शूर्पणखा ठरली निमित्त की तिनेच घडवले रामायण?

शूर्पणखेच्या लग्नाची कथा आपल्याला तमिळ रामायणात सापडते. या कथेनुसार तिचा विवाह हा दानवकुलीन राजकुमार विद्युतजिह्वा याच्याशी झाला होता. काही कथांमध्ये तिच्या पतीचा ‘दुष्टबुद्धी’ असा नामोल्लेख आहे. कथेनुसार हा प्रेमविवाह होता. रावणाचा या विवाहाला विरोध होता. रावण हा विद्युतजिह्वाला दानवकुलविरोधी मानत होता. परंतु आपली पत्नी मंदोदरी हिच्या मध्यस्थीमुळे रावणाने हा विवाह स्वीकारला. तरी कालांतराने रावणाकडून विद्युतजिह्वा याचा वध झाला. हा वध रावणाने जाणीवपूर्वक केला, हे सांगणाऱ्या अनेक कथा उपलब्ध आहेत. तर काही कथा हा वध चुकून झाला असाही संदर्भ देतात. परंतु या घटनेनंतर शूर्पणखेचे आयुष्य पूर्णतः बदलून गेले. सुंदर चंद्रनखा ही कुरूप शूर्पणखा झाली.
ती राजमहालाचा त्याग करून अरण्यात भटकू लागली व या दरम्यान तिने शंभरी नावाच्या मुलाला जन्म दिला होता. किंबहुना रामाला लग्नाची मागणी घालणे, सीतेचे रावणकडून अपहरण करून घेणे यांसारख्या घटना शूर्पणखेने आपल्या पतीवधानंतर रावणावर सूड उगवण्यासाठी घडवून आणल्याचे संदर्भ काही प्रांतिक पौराणिक कथा देतात. तर वाल्मीकी रामायणानुसार शूर्पणखा रामावर भाळली होती. सीतेमुळे राम आपल्याला मिळत नाही म्हणून तिने सीतेवर हल्ला करण्याचा प्रयत्नदेखील केला होता. त्यानंतरची कथा प्रसिद्धच आहे. या विरुद्ध काही कथा त्राटिका राक्षसी ही तिची आजी होती व रामाने तिचा वध केला म्हणून तिने सीताअपहरणाचा कट रचल्याचे नमूद करतात.

सौंदर्याचे परिमाण शूर्पणखा?

कवी चक्रवर्ती कंबन यांनी बाराव्या शतकात तमिळ रामायण रचले. त्यांनी रचलेल्या या रामायणात शूर्पणखेच्या सुंदर रूपाचे वर्णन करण्यात आले आहे. या वर्णनात ती कमनीय बांधा असलेली, तंत्र- मंत्र करणारी व स्वतःला कुठल्याही रूपात परिवर्तित करणारी स्त्री असल्याचे म्हटले आहे. तिला सौंदर्याचे परिमाणच मानण्यात आले आहे. कंबन रामायण हे चोला राजवटीच्या काळात लिहिले गेले, त्यामुळे या रामायणातून तत्कालीन समाजातील स्त्रियांची स्थिती जाणून घेण्यास मदत होते. किंबहुना काही अभ्यासक तिचा संबंध तामिळनाडू येथील मीनाक्षी देवीच्या कथेशीही जोडतात. तर काही आदिवासी समाजांत शूर्पणखेला देवी स्वरूपात पूजले जाते.

आणखी वाचा: विश्लेषण: Nirma Powder महाराष्ट्राचे राजकारण व ‘दूध सी सफेदी’ देणारी निरमा वॉशिंग पावडर

रामावरील निस्सीम प्रेम…

शूर्पणखेचे रामावरील प्रेम दर्शवणारी एक कथा भागवत पुराणात सापडते. या कथेनुसार रावणवधानंतर शूर्पणखेने राजस्थान येथील पवित्र तीर्थ पुष्कर येथे प्रस्थान केले व आपल्या तपोबलाने ब्रह्मदेवांकडून वर मिळवून पुढल्या जन्मात रामाची पत्नी होण्याचे वरदान मागून घेतले. कथेनुसार द्वापारयुगात शूर्पणखा ही कुब्जा म्हणून जन्माला आली. जन्मतः पाठीवर बाक असलेली कुब्जा ही कृष्णकृपेमुळे सुंदर झाली व तिचा विवाह हा श्री कृष्णासोबत झाल्याची कथा आजही भागवत पंथात सांगितली जाते.

आधुनिक स्त्रीवादी शूर्पणखा

आज शूर्पणखा ही कुरूप राक्षसी म्हणूनच अधिक प्रसिद्ध असली तरी तिचे कुरूपपण हे असूया, सूड यांच्या माध्यमातून आलेले आहे. स्त्री भूमिकांचा विचार करता शूर्पणखा ही स्वतंत्र विचार करणारी व स्वतःची अभिव्यक्ती जपणारी स्त्री होती. आपला जोडीदार स्वतः निवडणारी, आपल्या भावभावना निर्भीडपणे आणि स्वतंत्रपणे व्यक्त करणारी स्त्री होती, असे आधुनिक स्त्रीवादी मानतात. मात्र असे असतानाही केवळ अक्राळविक्राळ राक्षसी हाच तिचा परिचय अधिक अधोरेखित व्हावा, हे दुर्दैवी आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shurpankha from an independent woman to a demon who was she really svs
Show comments