Nirma washing powder founder महाराष्ट्रात सध्या राजकारणाची धुमश्चक्री सुरू आहे. कोण, कधी, कसे व काय वक्तव्य करेल याचा नेम नाही, अशी स्थिती आहे. सद्य:स्थितीत सुरू असणाऱ्या राजकारणावर भाष्य करणारे वक्तव्य दोनच दिवसांपूर्वी आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत केले. ठाकरे गटाचे शिवसेना नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची पार्श्वभूमी या वक्तव्यामागे होती. पाटील विधान परिषदेत म्हणाले, “कुणीतरी काल सांगितलं की, एमआयडीसीच्या प्लॉटची ४०० कोटींची फाईल आहे म्हणून भूषण देसाई शिवसेनेत आले. पण ते त्यासाठी इथे आलेले नाहीत. हे सरकार चांगलं काम करतंय. चांगला न्याय देतंय म्हणून ते इथे आले आहेत. आमच्याकडे ‘निरमा वॉशिंग पावडर’ आहे. ती गुजरातमधून येते. त्यामुळे आम्ही साफसफाई करून घेतो. जो माणूस आमच्याकडे येईल, तो स्वच्छ होणार आहे.” या वक्तव्यातील निरमा पावडर, गुजरातचा उल्लेख वेगवेगळ्या राजकीय भूमिकांकडे बोट दाखवत असला तरी त्या पार्श्वभूमीवर निरमा या भारतीय कंपनीची उद्योगक्षेत्रातील कामगिरी जाणून घेणे या निमित्ताने सयुक्तिक ठरावे.

निरमा वॉशिंग पावडर कंपनी कोणी स्थापन केली?
निरमा कंपनीची स्थापना ‘करसनभाई खोडीदास पटेल’ यांनी १९६९ साली अहमदाबाद येथे केली. करसनभाई हे मूळचे गुजरातमधील पाटण येथील रूपपूर या गावाचे. त्यांनी रसायनशास्त्र या विषयात वयाच्या २१व्या वर्षी पदवी घेतली व त्यानंतर प्रयोगशाळेत कनिष्ठ साहाय्यक म्हणून काम पाहिले. त्यानंतर गुजरात सरकारच्या भूविज्ञान व खनन विभागात (Geology and Mining Department) नोकरी केली. सरकारी कार्यालयात नोकरी करत असताना निरमा या उद्योग समूहाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली.
निरमा समूहाची सुरुवात कशी झाली?
करसनभाई पटेल यांचा जन्म हा शेतकरी कुटुंबात झाला. १९६९ मध्ये तुटपुंज्या पगारावर सरकारी नोकरी करत असताना त्यांनी निरमा समूहाची स्थापना केली होती. आज निरमा समूह हा जगातील मान्यवर उद्योगसमूह असला तरी या उद्योगसमूहाची सुरुवात मात्र तितकी सोपी नव्हती. हा समूह सिमेंट, डिटर्जंट (कपड्यांचा साबण व पावडर), अंगाचा साबण व सौंदर्यप्रसाधने यांसारख्या अनेक उत्पादनांसाठी ओळखला जातो. परंतु या कंपनीला खरी ओळख दिली ती वॉशिंग पावडर या उत्पादनाने. पटेलभाई यांनी वॉशिंग पावडर हे उत्पादन सर्वात आधी बाजारपेठेत आणले. नोकरी करत असताना एका दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत त्यांनी आपल्या पहिल्या उत्पादनाची निर्मिती प्रक्रिया सुरू केली. दर सायंकाळी ते कामावरून येताना १५ ते २० पाकिटांची विक्री करत असत. त्या काळात त्यांच्या सायकलने त्यांना साथ दिली होती. कालांतराने वाढता प्रतिसाद बघून या उत्पादनाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व अशा प्रकारे भारतीय उद्योग क्षेत्रात सर्वाधिक नावलौकिक मिळविणाऱ्या कपडे धुण्याच्या वॉशिंग पावडरचा जन्म झाला.

Supriya Sule, reservation, satara,
राज्यकर्ते आरक्षणाच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत – खासदार सुप्रिया सुळे
trade and technology farmers marathi news
शेतकऱ्यांना कुबड्या नको, स्वातंत्र्य द्या!
CAG Report, Financial Mismanagement in Maharashtra , Revenue Expenditure Gap Widen, Debt Surpasses rupees 8 Lakh Crores, Maharashtra government, Comptroller and Auditor General of India, Maharashtra news
पुरवणी मागण्यांवरून ‘कॅग’ने खडसावले…
bill on urban naxalism tabled in maharashtra assembly
जनसुरक्षावर आक्षेप; शहरी नक्षलवाद रोखण्याच्या उद्देशाने विधेयक; विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांची टीका
vijay wadettiwar criticized shinde group
“आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल, तर…”; विजय वडेट्टीवारांचं शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र!
What Sambhaji Bhide Said?
संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, “आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री आणि…”
Raj Thackeray
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याची बातमी केव्हा मिळणार?” अमेरिकेत विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर; म्हणाले, “मॅटर्निटी होम…”
jayant patil on maharashtra budget
“चादर लगी फटने, खैरात लगी बटने”; अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “अत्यंत बेजाबदार…”

आणखी वाचा: विश्लेषण : पुरातन वस्तू कायद्याचे महत्त्व काय?

निरमा वॉशिंग पावडर भारतीय उद्योग क्षेत्रात का महत्त्वाची?
सत्तरच्या दशकात निरमा उद्योगसमूह जन्माला आला. तत्कालीन बाजारपेठेत हिंदुस्थान लिव्हर लिमिटेडची सर्फ ही कपडे धुण्याची पावडर मोठ्या प्रमाणात वापरात होती. करसनभाईंची धारणा होती की, हिंदुस्थान लिव्हर ही एक विदेशी कंपनी आहे. शिवाय सर्फ तुलनेने महाग होती. भारतीय मध्यम तसेच निम्नवर्गीय सामान्य गृहिणींच्या रोजच्या वापराला ते परवडण्यासारखे नव्हते. या पार्श्वभूमीवर करसनभाई पटेल यांनी कमी किमतीची कपडे धुण्याची पावडर बाजारात आणली. सर्फची किंमत ही त्या वेळी १३ रुपये किलो होती, तर निरमा पावडर ही ३.५० रुपये किलो इतकी स्वस्त होती. त्यामुळे सामान्य गृहिणींनी निरमा या पावडरला पसंती दिली. एका छोट्या घरात सुरू झालेल्या लहान उद्योगसमूहाने एका जागतिक उद्योगसमूहाला कमी वेळेत मागे टाकले होते हे येथे विशेष नमूद करण्यासारखे आहे.
सर्फ आणि निरमा स्पर्धा:
निरमा वॉशिंग पावडरची किंमत कमी होती, त्यामुळे साहजिकच सामन्यांचा कल तिच्याकडे होता. परंतु इथे आणखी काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत, त्या म्हणजे सर्फ हा ब्रॅण्ड मोठा होता. त्यांच्या जाहिराती अनेक स्वरूपांत प्रकाशित व प्रक्षेपित होत होत्या. सर्फचे पॅकेजिंग आकर्षक तसेच कलात्मक होते. त्या काळी गृहिणींमध्ये नव्याने कपडे धुण्यासाठी सिंथेटिक पावडरचा वापर करण्याची क्रेझ होती. त्यामुळे सर्फचा जनमानसावर असलेला पगडा अधिक होता. त्या वेळेस निरमा स्वस्त, साधे पॅकेजिंग पण त्याच बरोबरीने सिंथेटिक पावडरच्या रूपात बाजारात उपलब्ध झाल्याने मोठा ग्राहकवर्ग सर्फ सोडून निरमाकडे वळला. जवळपास तीस दशके निरमा या पावडरने या क्षेत्रात अग्रेसर राहून अधिसत्ता गाजवली होती. म्हणूनच करसनभाईंच्या या अद्वितीय कामगिरीसाठी भारत सरकारने २०१० मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

आणखी वाचा: विश्लेषण : ॲरिस्टॉटल ते २१ वे शतक : कांद्याचा रोचक प्रवास

निरमा पावडर आणि जाहिरात:
निरमा वॉशिंग पावडरच्या प्रसिद्धी व विक्री दर वाढण्यामागे सर्वात मोठा हात होता तो त्यांनी केलेल्या जाहिरातीचा. ज्या वेळेस करसनभाई यांनी निरमा या उत्पादनाची जाहिरात करण्याचे ठरविले त्या वेळेस उपलब्ध असलेल्या अनेक मध्यामांपैकी दूरदर्शन हे माध्यम निवडले. निरमाची जाहिरात व जिंगल आजही लोकांच्या मनात खोलवर जागा करून आहे. या जाहिरातीने वॉशिंग पावडरनिर्मिती क्षेत्राचा आरसा बदलला. तत्कालीन जाहिरातींमध्ये दुःखी-कष्टी बाई दाखवण्यात येत होती. निरमाच्या जाहिरातीत कपडे धुताना आनंदी- खेळीमेळीचे वातावरण दाखवण्यात आले. वास्तविक त्यांच्या सुरुवातीच्या जाहिरातीत कुठेही सिनेकलाकार घेण्यात आले नाहीत किंवा मोठा बंगला किंवा भव्य-दिव्य वातावरण दाखवण्यात आले नाही. जाहिरात ही ग्राहकसमूह लक्षात घेऊन सामान्य लोकांना भावेल अशी ठेवण्यात आली. जाहिरात ‘ब्लॅक अँड व्हाईट’ दूरदर्शनवर प्रक्षेपित होत असल्याने उजळ कपडे व स्त्रियांची जाहिरातीतील वेशभूषा ही सामान्य स्त्रीची होती. तसेच जाहिरातीत निरमा पावडरला येणारा फेस आवर्जून दाखवण्यात येत होता. फेस आलेला दाखविणे हा या ब्रॅण्डचा यूएसपी होता. भारतात शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागात पाणी जड असते. त्यामुळे कुठलाही सिंथेटिक साबण मोठ्या प्रमाणात फेस देऊ शकत नव्हता. या पाण्याचे गणित स्वतः रसायनशास्त्रात प्रवीण असल्याने करसन पटेल यांनी ओळखले. त्यामुळे फेस जास्त म्हणजे पावडर चांगली ही जनमानसाची धारणा निरमाच्या यशाला कारणीभूत ठरली. भारताच्या कानाकोपऱ्यात निरमा पावडर गृहिणीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाली.
सर्फ व निरमामधील फरक सांगताना गृहिणी आवर्जून सांगायच्या की, साध्या कपड्यांसाठी सर्फ योग्य होता, परंतु भारतीय रोजच्या वापरातील गोधड्या, चादरी स्वच्छ धुण्यासाठी वेगळे गरम पाणी व सोडा यांचा उपयोग करावा लागत होता. परंतु निरमाच्या वापरामुळे हा प्रश्न सुटला. निरमामध्ये सोड्याचे प्रमाण जास्त असल्याने भारतीय गृहिणींचे काम काही प्रमाणात हलके झाले होते. म्हणूनच १९८५ साला पर्यंत निरमा ही कपडे धुण्याची पावडर सर्वात लोकप्रिय झाली. तर २००७ साली जगातील सोडा ॲशनिर्मिती करणाऱ्या पहिल्या सात कंपन्यांमध्ये गणली जाऊ लागली. परंतु सोड्याचे वॉशिंग पावडरमधील अधिक प्रमाण हे निरमाच्या कुप्रसिद्धीसाठीदेखील कारणीभूत ठरले होते.

आणखी वाचा: विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध आहे का?

नावामागचे सत्य:
निरमा या समूहाचे नामकरण करसन पटेल यांची दिवंगत कन्या निरुपमा हिच्या नावावरून करण्यात आले होते. तसेच निरमाच्या पाकिटावर ज्या मुलीचे चित्र आहे ते तिचेच आहे. निरुपमा हिचे चित्र पाकिटावर देण्याचा कुठलाही मानस नव्हता. सुरुवातीस काही गृहिणींची चित्रे देण्यात आली होती. परंतु कालांतराने ते बदलून निरुपमाचे छायाचित्र वापरण्यात आले व तीच निरमाची ओळख ठरली.

सध्या बाजारात अनेक उत्पादने आल्याने निरमाच्या खपात घट झाली आहे. निरमाला आज अनेक स्पर्धक आहेत. तरी हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड यांनी ९०च्या दशकात निरमासाठी स्पर्धक म्हणून उतरवलेले व्हील हे उत्पादन विसरून चालणार नाही. सामान्य गृहिणींची अपेक्षा लक्षात घेऊन हे उत्पादन बाजारात आणले होते. परंतु त्या काळी निरमाची जागा घेणे त्यांना शक्य झाले नाही. निरमा हे स्वस्त आणि मस्त म्हणून प्रसिद्ध होते, परंतु काळाच्या ओघात लोकांच्या गरजा, विचार हे बदलले आहेत व त्यानुसार निरमा वॉशिंग पावडरला स्वतःच्या उत्पादनात बदलाची गरज असल्याचे मार्केटिंगतज्ज्ञ सांगतात.
काय शिकावे?
आज राजकारणाच्या पार्श्वभूमीतून निरमा पावडरचा उल्लेख आला, हे सत्य असले तरी करसन पटेल यांनी आपल्या जिद्दीने व मेहनतीने एका लहान खुराडेवजा खोलीतून उभारलेला हा डोलारा लक्षणीय व प्रेरणादायी आहे. ज्ञान व मेहनत यांची सांगड नक्कीच मोठ्या उद्देशाच्या पूर्ततेला साहाय्यभूत ठरते!