काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्याने ईडी व सीबीआय या केंद्रीय यंत्रणा सत्ताधारी भाजपच्या बटिक झाल्याचा आरोप करीत असताना तेलंगणातील ए. रेवंथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने कळमेश्वरम उपसा सिंचन योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.
चौकशी सीबीआयकडे का सोपवली?
केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडून नेहमीच राजकीय फायद्यासाठी वापर केला गेला. काँग्रेस पक्ष सत्तेत असताना सीबीआयवर विरोधक आरोप करायचे. भाजप सत्तेत आल्यावर काँग्रेसकडून सीबीआयवर भाजपची बटिक झाल्याचा आरोप करण्यात येतो. भाजप विरोधात असताना सीबीआयवर पक्षपाती असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून व्हायचा. यातूनच सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला ‘पिंजऱ्यातील बंदिस्त पोपटा’ची उपमा दिली होती. गेले काही दिवस काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने ईडी व सीबीआय या केंद्रीय यंत्रणांवर आरोप करीत आहेत. या यंत्रणा भाजपला मदत करतात, अशी टीका केली जाते. असे असताना तेलंगणातील काँग्रेस सरकारने कळमेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेतल्याने चर्चा सुरू झाली. काँग्रेस नेतृत्व ज्या यंत्रणेवर सातत्याने आरोप करते त्याच सीबीआयकडे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याने चौकशी सोपविल्याने काँग्रेस पक्षातही त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. यासाठी सीबीआयला तेलंगणा राज्यात चौकशीसाठी असलेली बंदी उठविण्यात आली.
कळमेश्वरम उपसा सिंचन योजना काय आहे?
आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली. २०१४ मध्ये राज्य निर्मितीनंतर सत्तेत आलेल्या के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा राष्ट्र समिती सरकारने सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी कळमेश्वरम उपसा सिंचन योजना उभारण्याचे काम हाती घेतले होते. जगातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. एक लाख कोटींपेक्षा अधिक खर्चाचा हा प्रकल्प आहे. तेलंगणा राज्याची जीवनरेखा म्हणून या योजनेचा गौरव करण्यात आला होता. परंतु या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. तसेच कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
नव्याने बांधण्यात आलेल्या धरणाला तडे गेले. काही ठिकाणी बांधकाम कोसळले. राजकीय कारणाने प्रकल्पाची जागा बदलण्यात आली होती. धरणाचे बांधकाम पक्के नसल्याचा आरोप झाला. राज्यात सत्ताबदल झाल्यावर काँग्रेस सरकारने निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमला होता. या आयोगाचा अहवाल अलीकडेच राज्य सरकारला सादर करण्यात आला. त्यात कळमेश्वरम उपसा सिंचन योजनेच्या कामांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. कामातील गैरव्यवहार आणि कामाच्या दर्जावरून तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व त्यांचे भाचे आणि त्यांचे तत्कालीन पाटबंधारेमंत्री हरिश राव यांच्यावर चौकशी आयोगाने ताशेरे ओढले आहेत.
मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचा काय उद्देश?
कळमेश्वरम उपसा सिंचन योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडे सोपविण्याचा मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी सरकारचा निर्णय हा पूर्णपणे राजकीय आहे. तेलंगणामध्ये भाजप पद्धतशीरपणे संघटनात्मक ताकद वाढवत आहे. काँग्रेसच्या विरोधात भाजप आणि के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत पडद्याआडून हातमिळवणी असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जातो. अर्थात, हा आरोप भारत राष्ट्र समितीकडून फेटाळला जातो. तरीही उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचे जाहीर करून भारत राष्ट्र समितीने तेलुगू अस्मितेला डावलल्याचा (इंडिया आघाडीचे उमेदवार सूदर्शन रेड्डी हे तेलुगू आहेत) आरोप काँग्रेसने केला आहे.
चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांना दिल्ली मद्य घोटाळ्यात ईडीने अटक केली होती. तसेच चंद्रशेखर राव हे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अखेरच्या कार्यकाळात भाजपशी फटकून वागत असत. सीबीआय चौकशीची तेलंगणा सरकारची शिफारस केंद्र सरकारने फेटाळल्यास भाजप आणि चंद्रशेखर राव यांच्यात समझोता असल्याचा आरोप करण्याची काँग्रेसला संधी मिळेल. चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही तरीही भाजपने चंद्रशेखर राव यांना पाठीशी घातले, असा आरोप काँग्रेस नेते करू शकतात. कारण निवृत्त न्यायमूर्तींनी केलेल्या चौकशीत प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचा स्पष्टपणे ठपका ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे, सीबीआय चौकशीची धाक दाखवून भाजप के. चंद्रशेखर राव यांना वाकवू शकते, अशीही भीती काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. चौकशी अहवालात के. चंद्रशेखर राव यांच्यावर थेट ठपका ठेवण्यात आल्याने माजी मुख्यमंत्र्यांच्या घरातच फूट पडली. चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांनी आपले आत्येबंधू हरिश राव यांना जबाबदार धरले. मुलीच्या आरोपांमुळे चंद्रशेखर राव संतप्त झाले व त्यांनी मुलगी कविताची पक्षातून हकालपट्टी केली.