अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान किशनने मानसिक तंदुरुस्तीसाठी विश्रांतीची विनंती केली होती. त्याची ही विनंती मान्य झाल्याने तो आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकला. मात्र, त्यानंतर मायदेशातील अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी त्याचे भारतीय संघात पुनरागमन अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे त्याच्यावर अनुशासनात्मक कारवाई करण्यात आली, संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावर विश्वास उरलेला नाही अशा चर्चा सुरू झाल्या. या चर्चांना पूर्णविराम देण्याचा भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडने प्रयत्न केला असला तरी किशनच्या भविष्याबाबत नक्कीच प्रश्न उपस्थित होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किशनवर अनुशासनात्मक कारवाईची चर्चा का?

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील भारताच्या ट्वेन्टी-२० आणि कसोटी संघात सुरुवातीला किशनचा समावेश होता. मात्र, त्याला एकही ट्वेन्टी-२० सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर किशनने मानसिक तंदुरुस्ती सुधारण्यासाठी विश्रांतीची विनंती केली आणि ती भारतीय संघ व्यवस्थापनाने मान्य केली. त्यामुळे तो कसोटी मालिकेला मुकला. त्याने मायदेशी परत येऊन कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवणे अपेक्षित होते. मात्र, तो दुबई येथे पार्टी करताना दिसला. त्यामुळे किशनवर अनुशासनात्मक कारवाई करण्यात आली आणि त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

हेही वाचा – विश्लेषण : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला शंकराचार्यांचा विरोध का? चारही शंकराचार्य अनुपस्थित राहणार?

भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविड काय म्हणाला?

किशनवर अनुशासनात्मक कारवाई करण्यात आल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे द्रविडने सांगितले. ‘‘किशन निवडीसाठी उपलब्ध नव्हता. त्याने दक्षिण आफ्रिकेत असताना विश्रांतीची विनंती केली होती आणि आम्ही ती मान्य केली. त्यानंतर त्याने स्वत:ला निवडीसाठी उपलब्ध केलेले नाही,’’ असे द्रविड अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाला. तसेच किशन लवकरच मैदानावर परतेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

मुळात किशनला विश्रांती का मागावी लागली?

क्रिकेटचे व्यग्र वेळापत्रक लक्षात घेता खेळाडूंना अधूनमधून विश्रांती आवश्यक झाली आहे. गेल्या काही काळापासून किशन सातत्याने भारतीय संघाचा भाग आहे, पण अनेकदा त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळत नाही. परंतु सततचा प्रवास, संघाबाहेर बसावे लागत असल्याने डोक्यात येणारे विविध विचार यामुळे किशनला मानसिकदृष्ट्या थकवा जाणवत होता आणि गेल्या काही महिन्यांत त्याने अनेकदा विश्रांतीची विनंती केली. मात्र, ती मान्य न झाल्याने किशन निराश होता असे समजते. किशन दीड महिना चाललेल्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग होता. त्यानंतर काही दिवसांतच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी विश्वचषकात खेळलेल्या बहुतांश खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती, पण किशनचा भारतीय संघात समावेश होता. तो या मालिकेतील पाचपैकी तीन सामने खेळला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये विश्रांतीची किशनला आशा होती. मात्र, तिथेही ट्वेन्टी-२० मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. त्यामुळे किशन अत्यंत निराश झाला आणि त्याने पुन्हा निवड समितीकडे विश्रांतीची विनंती केली. अखेर ती मान्य झाल्याने तो कसोटी मालिकेत खेळला नाही.

किशनच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत का?

किशनमधील प्रतिभा लक्षात घेता भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु त्याला अंतिम ११ खेळाडूंमधील स्थान निश्चित करण्यासाठी बरीच मेहनत करावी लागू शकेल. ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाल्याने वर्षभरापासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. त्यानंतर किशनला सातत्याने संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये आता केएल राहुल भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक-फलंदाज बनला आहे. तसेच ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये गेल्या काही सामन्यांपासून किशनऐवजी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यात सक्षम असलेल्या जितेश शर्माला यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून संधी मिळत आहे. त्यामुळे किशन तिन्ही प्रारूपांमध्ये आता मागे पडला आहे. त्यातच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताकडे संजू सॅमसनचा पर्यायही उपलब्ध आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी जितेश आणि संजू यांना संघात स्थान देणे भारतीय निवड समितीने पसंत केले आहे.

हेही वाचा –  विश्लेषण: आगामी वर्ष आणखी उष्ण असण्याची शक्यता?

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संधी मिळण्याची कितपत शक्यता?

किशनच्या दृष्टीने एक सकारात्मक बाब म्हणजे भारतीय संघ आता लवकरच मायदेशात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर यष्टिरक्षक म्हणून राहुलची कसोटी लागेल. अशात भारताला विशेषज्ञ यष्टिरक्षकाची गरज भासू शकेल. भारताकडे केएस भरतचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, फलंदाज म्हणून भरतच्या मर्यादा यापूर्वीच स्पष्ट झाल्या आहेत. त्याला पाच कसोटी सामन्यांत केवळ १२९ धावा करता आल्या आहेत. याउलट किशनने गेल्या वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दोन सामन्यांत तीन डावांत ७८ धावा केल्या. यात एका अर्धशतकाचा समावेश होता आणि दोन वेळा तो नाबादही राहिला. तसेच यष्टिरक्षक म्हणूनही त्याने प्रभावित केले होते. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला पुन्हा संधी मिळू शकेल. मात्र, त्यापूर्वी त्याला रणजी करंडकात खेळावे लागण्याची दाट शक्यता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Was disciplinary action taken against ishaan kishan why is he not in the indian cricket team print exp ssb