गेल्या काही सत्रातील अस्थिरतेला पूर्णविराम देत देशांतर्गत भांडवली बाजारातील निर्देशांकांनी गुरुवारी मोठी उसळी घेत नव्या उच्चांकी पातळ्यांना गवसणी घातली. काही सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा केल्याने बाजार मंदीच्या गर्तेत गेल्याचे दिसत असताना बाजाराने अचानक कल बदल दर्शवला. आता बाजारात पुन्हा तेजीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेतला आहे. मात्र बाजारात तेजीचे उधाण का आले, ते कुठवर टिकेल, याबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेजीचे सध्याची कारणे कोणती?

रिझर्व्ह बँकेने बुधवारी केंद्र सरकारला २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी २.११ लाख कोटी रुपयांचा सर्वोच्च लाभांश देण्यास मान्यता दिली. लाभांशापोटी ही मोठी रक्कम केंद्रासाठी दिलासादायी ठरणार असून, त्यातून वित्तीय तुटीवर नियंत्रण मिळविण्यास सरकारला मोलाची मदत होणे अपेक्षित आहे. मध्यवर्ती बँकेने दिलेला लाभांश मागील वर्षाच्या तुलनेत १४० टक्के अधिक तर, फेब्रुवारीतील अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा दुप्पट राहिला आहे. ज्यामुळे नवीन सरकारला पदभार स्वीकारण्यापूर्वीचा मोठा महसूल प्राप्त होणार आहे. या रिझर्व्ह बँकेच्या कृतीने सेन्सेक्स आणि निफ्टीला उच्चांकी शिखरावर जाण्यास प्रवृत्त केले. यामध्ये निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांनी सर्वाधिक योगदान दिले. परिणामी गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्सने पुन्हा एकदा ७५,००० अंशांची पातळी ओलांडली आणि ७५,४१८.०४ या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ७५,४९९.९१ अंशांचे विक्रमी शिखरही ओलांडले होते. तर दुसरीकडे सेन्सेक्सच्या पावलांवर पाऊल ठेवत निफ्टीदेखील २३,००० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्याने ३६९.८५ अंशांची भर घालत २२,९६७.६५ अंशांचा नवा उच्चांक गाठला. गुरुवारच्या एका सत्रातील तेजीने बाजार भांडवलात ४.१ लाख कोटींची भर घातली आहे.

आणखी वाचा-बालसुधारगृह म्हणजे काय? पुणे पोर्श अपघातातील आरोपीचा दिनक्रम कसा असेल?

वाढीव लाभांश अर्थव्यवस्थेसाठी कसा लाभदायी?

विद्यमान आर्थिक वर्षात केंद्र सरकारची वित्तीय तूट अर्थात केलेला खर्च आणि प्राप्त महसूल यांच्यातील तफावत ही १७.३४ लाख कोटी रुपये या मर्यादेत राखण्याचे उद्दिष्ट अर्थमंत्र्यांनी ठेवले आहे. म्हणजेच देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीच्या तुलनेत तुटीचे प्रमाण ५.१ टक्के या मर्यादेत ठेवण्याचे हे लक्ष्य साधण्यासाठी रिझर्व्ह बँकेची ही भरीव लाभांश रक्कम उपयुक्त ठरणार आहे. किंबहुना फेब्रुवारीला मांडलेल्या अर्थसंकल्पात, सरकारने रिझर्व्ह बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांकडून १.०२ लाख कोटी रुपयांच्या लाभांश उत्पन्नाचा अंदाजले होते. प्रत्यक्षात एकट्या रिझर्व्ह बँकेकडून या अंदाजाच्या दुप्पट म्हणजेच २.११ लाख कोटी रुपयांचा निधी सरकार मिळवू शकणार आहे. नफाक्षम बनलेल्या सरकारी बँकांच्या लाभांशांची यात आणखी भर पडेल. या शिवाय किरकोळ महागाईदेखील नियंत्रणात आहे. एकूणच अर्थव्यवस्थेसाठी लाभकारक ठरणाऱ्या घटनांमुळे बाजाराला जोशात आणले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल येत्या ४ जूनला जाहीर होणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार नवीन उच्चांक गाठेल. ज्यात भारतीय जनता पक्षाला (भाजप) विक्रमी जागा मिळतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी एका मुलाखतीत व्यक्त केला. पंतप्रधानांच्या वक्त्यव्याचादेखील भांडवली बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पदभार स्वीकारला त्यावेळी सेन्सेक्स २५,००० अंशांवर होता, तो आता ७५,००० अंशांवर पोहोचला आहे. शिवाय पहिल्यांदा मुंबई शेअर बाजाराने ५ लाख कोटी बाजार भांडवलाचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. डिमॅट खात्यांची संख्या तत्कालीन २.३ कोटींवरून आता १५ कोटींहून अधिक झाली आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या २०१४ मधील १ कोटींवरून आता ४.५ कोटींपुढे पोहोचली आहे. देशांतर्गत गुंतवणुकीचा व्यापक विस्तार होत असून देशांतर्गत गुंतवणूकदार अधिक सक्रिय झाले आहेत आणि भांडवली बाजारात पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हे सरकारने केलेल्या कामांचे प्रतिबिंबित आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून बाजाराने उच्चांकी तेजीकडे वाटचाल केली आहे.

आणखी वाचा-जेव्हा अटलबिहारी वाजपेयींना द्यावा लागला होता राजीनामा; काय घडलं होतं १९९६ लोकसभा निवडणुकीत?

जागतिक घडामोडींचा परिणाम काय?

खनिज तेलाचे दर ८२ डॉलरच्या खाली घसरल्याने ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. ते आता ८१.७९ डॉलर प्रति पिंपापर्यंत खाली आले आहे. यामुळे भविष्यात देशाचा तेलावरील आयात खर्च कमी होण्याचीही अपेक्षा आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या ताज्या बैठकीचा इतिवृत्तान्तही गुरुवारी पुढे आला. त्यात व्याजदर कपातीचे संकेत दिले गेले आहेत. याचबरोबर भारतीय भांडवली बाजाराने जागतिक पातळीवरील चौथ्या क्रमांकाचा बाजार होण्यासाठी पावले टाकली आहेत. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल सध्या ५ लाख कोटी डॉलरच्या ऐतिहासिक टप्प्यांवर पोहोचले आहे. सध्या अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँग हे भारतीय भांडवली बाजाराच्या पुढे आहे. मात्र हाँगकाँगचे बाजारभांडवल ५.३९ लाख कोटी डॉलर असून ते मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल त्याच्या अगदी समीप पोहोचले आहे. त्यात सतत वाढ होत असल्याने लवकरच भारतीय भांडवली बाजार हाँगकाँगला मागे सारून चौथ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी मार्गक्रमण करत आहे.

gaurav.muthe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the current reasons for high in the stock market and what is the effect of world events print exp mrj
First published on: 23-05-2024 at 17:42 IST