गेल्या काही काळापासून दिल्लीसह देशभरात मोबाइल फोन स्नॅचिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावर्षी, १ जानेवारी ते २८ जूनदरम्यान दिल्लीत ४ हजार ६६० मोबाइल फोन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोबाइल स्नॅचिंगच्या घटनांमध्ये ११ ते १५ टक्क्यांची वाढ नोंदली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोबाइल फोन हिसकावण्याच्या वाढलेल्या घटनांमुळे दिल्ली पोलीस आता चोरीचे किंवा लुटलेले फोन ब्लॉक करण्यासाठी इंटरनेट सेवा कंपन्या आणि दूरसंचार विभागाशी समन्वय साधण्याची योजना आखत आहे. इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी (IMEI) क्रमांकाचा वापर करून चोरलेले किंवा हरवलेले फोन ब्लॉक करण्याचा मानस दिल्ली पोलिसांचा आहे.

IMEI नंबर काय असतो?
इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी (IMEI) हा एक विशेष क्रमांक असतो. मोबाइल नेटवर्कवर तुमचा डिव्हाइस ओळखण्यासाठी या क्रमांकाचा वापर केला जातो. यामध्ये १५ अंक असतात, जी तुमच्या मोबाइल फोनची खास ओळख असते. जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाइलवरून इंटरनेट सुविधा वापरता किंवा फोन कॉल लावता, तेव्हा तुमच्या डिव्हाइसची ओळख पडताळण्यासाठी हा क्रमांक वापरला जातो. जर तुमचा फोन ‘ड्युअल सिम’चा असेल, तर तुमच्या फोनमध्ये दोन IMEI क्रमांक असतात. प्रत्येक सिमसाठी वेगळा IMEI क्रमांक असतो.

तुमच्या फोनचा IMEI क्रमांक कसा शोधायचा?
खरंतर, मोबाइल उत्पादक कंपन्या तुमच्या मोबाइलचा IMEI क्रमांक स्टिकरवर प्रिंट करून तो तुमच्या मोबाइलच्या बॉक्सवर पेस्ट करतात. तसेच तुमच्या फोनच्या मागील बाजूस किंवा बॅटरीच्या खालच्या बाजुला अशाप्रकारचं स्टीकर लावलेलं आढळतं. याशिवाय IMEI क्रमांक शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या मोबाइलवरून *#06# हा कोड डायल करणे. हा कोड डायल केल्यानंतर तुमच्या मोबाइल स्क्रीनवर त्वरीत IMEI क्रमांक दिसेल. ज्या मोबाइलवरून हा कोड डायल केला जातो, त्याच मोबाइलचा तो IMEI क्रमांक असतो.

IMEI क्रमांक कसा फायदेशीर ठरतो?
तुमचा मोबाइल फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास नेटवर्क कंपन्या IMEI क्रमांकाच्या आधारे तुमचा फोन ट्रॅक करू शकतात. पण मोबाइल हरवल्याची किंवा चोरीला गेल्याची नोंद झाल्यानंतर, नवीन सिम कार्डद्वारे तुमचा फोन सेल्युलर नेटवर्कमध्येही प्रवेश करू शकत नाही. तुमचा मोबाइल फोन एकप्रकारे निरुपयोगी ठरतो. कारण त्यानंतर संबंधित फोनवरून कॉल करणे किंवा आलेला कॉल प्राप्त करणंही शक्य होत नाही.

हरवलेला फोन शोधण्यासाठी पोलीस IMEI क्रमांकाचा वापर कसा करतात?
दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, चोरीला गेलेल्या फोनचा डेटा त्वरित आमच्या सर्व्हरवर आणि “क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स (CCTNS) वर अपलोड केला जातो. त्यानंतर त्याचं विश्लेषण केलं जातं. मागील एक महिन्याच्या चाचणी कालावधीत आम्ही ९५० हून अधिक IMEI क्रमांक किंवा मोबाइल फोन ब्लॉक केले आहेत.

आव्हाने काय आहेत?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही टोळ्यांनी चोरी केलेले फोन फॉर्मेट करण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टीम नसलेले मोबाइल फोन अशाप्रकारे फॉर्मेट करून पुन्हा नव्याने वापरले जाऊ शकतात. तसेच काही सॉफ्टवेअरच्या मदतीने मोबाइल फोनचा IMEI क्रमांकही बदलला जाऊ शकतो. त्यामुळे चोरीचा फोन शोधण्यास किंवा ब्लॉक करण्यात अडचणी येतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is imei number how police use it to find or block stolen mobile phones rmm