Heart Attack Risk गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. हृदयविकाराचा धोका केवळ वयस्करांनाच नाही, तर तरुणांनाही आहे. भारतात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या घटना सातत्याने आपण वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर घडत असल्याचे पाहत आहोत. भारतातील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे रोग किंवा हृदयरोग ही देशापुढील मोठ्या सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. हृदयरोग आनुवंशिक असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, हृदयविकाराचा झटका येण्यावर अनेक घटकांचा प्रभाव असतो.
भारतीयांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण, वाढता लठ्ठपणा, एचडीएल-कोलेस्ट्रॉल (चांगले कोलेस्ट्रॉल)चे कमी प्रमाण आदी बाबी यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तरुणांमध्ये वाढत्या हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण कमी होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी तज्ज्ञांनी एका महत्त्वपूर्ण चाचणीविषयी सांगितले आहे. ती चाचणी नक्की काय आहे? ही चाचणी कधी आणि कोणत्या वयात करावी? याविषयी तज्ज्ञ काय सांगतात? सविस्तर समजून घेऊयात…
हार्ट अटॅक रोखण्यासाठी चाचणीचे महत्त्व
- गुरुग्राममधील एका कॉर्पोरेट कार्यालयात काम करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला लॅपटॉपवर तासनतास बसावे लागत असे. तिचा सर्व वेळ कामात जात असल्याने, तणाव कमी करण्यासाठी ती कामातून ब्रेक मिळाल्यावर आणि रात्रीच्या वेळी तिच्या आवडत्या मालिकेचे काही भाग पाहायची.
- काही महिन्यांनंतर तिला सतत थकवा, धाप लागणे आणि अधूनमधून छातीत जडपणा जाणवू लागला. तिने चेक-अप करून घेतला, ज्यात उच्च कोलेस्टेरॉलची पातळी आणि हृदयावर ताण येण्याची सुरुवातीची लक्षणे दिसली.
- एकाच जागी बसून राहणे आणि निकृष्ट आहार, हे याचे कारण मानले जाते.
त्यानंतर तिच्या डॉक्टरांनी तिला कॅल्शियम स्कोअर चाचणी करण्याचा सल्ला दिला. ही चाचणी म्हणजे कोरोनरी धमन्यांमधील कॅल्शियमचे प्रमाण मोजणारी एक नॉन-इनव्हेसिव्ह सीटी स्कॅन आहे. या चाचणीनंतर तिला समजले की, तिला हृदयविकाराचा अधिक धोका आहे. त्यावेळी तिने नवी दिल्लीतील मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियाक सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. युगल किशोर मिश्रा यांच्याशी सल्लामसलत केली. तिला कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) असल्याचे निदान झाले, ज्यात धमनीच्या आतील अस्तरामध्ये प्लेक जमा झाल्यामुळे अनेक गंभीर अडथळे निर्माण झाले होते. डॉ. मिश्रा म्हणतात, “जर तिने ही चाचणी केली नसती, तर याचे गंभीर परिणाम झाले असते; पण लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे ती बरी झाली.”
अडथळे निर्माण होण्याची कारणे काय आहेत?
डॉ. मिश्रा सांगतात, “दीर्घकाळ बसून राहणे, तणावामुळे जास्त खाणे, चुकीच्या झोपेच्या पद्धती आणि शारीरिक हालचाली टाळणे यांमुळे कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD), रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल व लठ्ठपणा यांसारख्या हृदयविकारांचा धोका वाढू शकतो. विशेषतः तरुणांमध्ये या सवयी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या प्रणालीवर नकारात्मक परिणाम करू शकतात.
“दीर्घकाळ बसूून राहिल्याने रक्ताभिसरण मंदावते, रक्तातील साखर व लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (एलडीएल) किंवा ‘बॅड’ कोलेस्ट्रॉल वाढते आणि पोटावर चरबी जमा होते, ज्यामुळे हृदयावर ताण पडतो. कालांतराने,ॉ या बैठ्या सवयीमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीची क्षमता कमकुवत होते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे आपण आपल्या २० वर्षांच्या मध्यापासूनच आपल्या हृदयाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे,” असे डॉ. मिश्रा सांगतात.
कोणत्या वयात चाचणी महत्त्वाची?
भारतीयांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो, हे लक्षात घेऊन बंगळूरू येथील मणिपाल हॉस्पिटलमधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी आणि हार्ट फेल्युअरचे प्रमुख, डॉ. कार्तिक वासुदेवन यांनी प्रत्येक वयोगटात चाचणीची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. “२० ते ३० वयोगटातील लोकांसाठी या चाचणीचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर, बॉडी मास इंडेक्स आणि वजन तपासणे महत्त्वाचे आहे. जर हे मापदंड सामान्य मर्यादेच्या बाहेर गेले किंवा रुग्णाचा काही कौटुंबिक इतिहास असेल, तर इतर सविस्तर चाचण्या केल्या जाऊ शकतात. तसे नसल्यास, कोलेस्ट्रॉल, यकृत, मूत्रपिंड आणि रक्तातील ग्लुकोज यांसारख्या जोखीम असलेल्या अवयवांच्या तपासणीसाठी रक्ताच्या चाचण्यांची शिफारस केली जाते.
हृदयाची क्रिया, त्याची लय आणि एकूण आरोग्य तपासण्यासाठी इलेक्ट्रोकार्डिओग्राम किंवा ECG आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात. “इकोकार्डिओग्राम ध्वनिलहरींचा वापर करून, हृदयाची रचना आणि कार्याची प्रतिमा तयार करतो,” असे ते म्हणतात. ३० ते ४५ वयोगटासाठी, डॉ. वासुदेवन ट्रेडमिल चाचणी (TMT) करण्याची शिफारस करतात. या चाचणीत ट्रेडमिलवर चालताना तुमच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि ECG चे निरीक्षण केले जाते. ज्यांना मधुमेह किंवा इतर उच्च जोखमीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ते कॅल्शियम स्कोअरिंग सुचवतात.
५० वर्षांवरील लोकांसाठी म्हणजे ज्यांना इतर काही आजार असण्याची शक्यता असते आणि वयानुसार धोका असतो, त्यांच्यासाठी ते अतिरिक्त कॅल्शियम स्कोअरिंग आणि कोरोनरी सीटी या चाचण्या सुचवतात. “परवाच माझ्याकडे ५० वर्षांचा एक रुग्ण आला, ज्याला सौम्य रक्तदाब होता. त्याला कोणताही आजार नव्हता, कौटुंबिक इतिहास नव्हता; पण त्याचे जीवन तणावपूर्ण आणि अनियमित जीवनशैली होती. त्याची TMT चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही अँजिओग्राम केला आणि त्यांच्या तीनही मुख्य कोरोनरी धमन्यांमध्ये अडथळे आढळले, ज्यावर आम्ही वेळेत उपचार करू शकलो,” असे डॉ. वासुदेवन सांगतात. चालताना छातीत जडपणा यांसारखी लक्षणे किंवा चाचणीत अडथळे स्पष्टपणे दिसल्यास इनव्हेसिव्ह अँजिओग्राम केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
सीटी ॲन्जिओग्राम या चाचणीची आवश्यकता कधी असते?
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मधील कार्डिओलॉजीचे प्राध्यापक डॉ. संदीप सेठ म्हणतात, “उच्च रक्तदाब ओळखून, त्यावर उपचार करा, मधुमेहावर उपचार, उपाशीपोटी रक्तातील साखर व लठ्ठपणावर नियंत्रण ठेवा आणि आपले वाढलेले कोलेस्टेरॉल नियंत्रित करा.” तुम्ही नियमितपणे तुमच्या बॅड (LDL) आणि गुड (HDL) कोलेस्ट्रॉलची पातळी मोजली पाहिजे. ज्यांना हृदयविकाराचा किंवा ब्रेन अटॅकचा त्रास झाला आहे, त्यांच्यासाठी हे अधिक महत्त्वाचे आहे.
ते म्हणतात, सीटी अँजिओग्रामची आवश्यकता नाही. कॅल्शियमचे नियमन, सूज कमी करणे व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असल्याचेही डॉक्टर सांगतात. व्हिटॅमिन डीच्या कमी पातळीमुळे कॅल्शियमच्या पातळीवर परिणाम होतो, ज्यामुळे हृदयाचे स्नायू प्रभावित होतात आणि हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता जाणवू शकते.
डॉ. सेठ पुढे म्हणाले, “आम्ही विचारात घेतो तो दुसरा सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे कौटुंबिक इतिहास. जर एखाद्या व्यक्तीला हा धोका असेल किंवा उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान आणि बैठी जीवनशैली असेल, तर आम्ही सीटी कॅल्शियमची चाचणी सुचवतो. जर कॅल्शियम स्कोअर जास्त असेल, तर त्याचा अर्थ प्लाक जमा झाला आहे. मग आम्ही रुग्णाला कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधे देतो,” असे डॉ. सेठ म्हणतात.
“जर रुग्णाचा कौटुंबिक इतिहास असेल, तर आम्ही कॅरोटीड धमनी विशेषतः कॅरोटीड इन्टिमा तपासतो, जी कॅरोटीड धमनीचा सर्वांत आतील थर आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या रोगाचा धोका तपासण्यासाठी आम्ही या आतील थराची जाडी मोजतो. ही तपासणी एका साध्या अल्ट्रासाऊंड चाचणीने केली जाऊ शकते, जी फार महाग नसते,” असे डॉ. सेठ म्हणतात. ही अल्ट्रासाऊंड चाचणी कॅरोटीड धमन्यांमध्ये प्लेक जमा होण्याची सुरुवातीची चिन्हे शोधण्यास मदत करते.