किशोर कोकणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हातमाग ते यंत्रमाग असा प्रवास करत भारतातले मँचेस्टर म्हणून कालपरवापर्यंत ओळखला जाणारा भिवंडीचा हा पारंपरिक उद्योग सध्या गंटागळ्या खाताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांतील या शहराची ओळख गोदामांचे शहर अशीच होऊ लागली आहे. शहरांना खेटून उभ्या असलेल्या मात्र आपला ग्रामीण बाज टिकवून ठेवलेल्या भिवंडीच्या गावांमध्ये व्यापारी बेटच गेल्या काही दशकांत उभे राहिले आहे. गोदामांचे हे बेट विस्तारत असले तरी भिवंडीची खरी ओळख ही यंत्रमाग उद्योगांची नगरी अशीच होती आणि अजूनही ती काही प्रमाणात कायम आहे. करोनाकाळापासून यंत्रमागाचा हा उद्योग अनेक आव्हानांचा सामना करताना दिसतो. या काळातील टाळेबंदी, कापडासाठी लागणाऱ्या सुताचे अनियंत्रित दर यामुळे हा उद्योग अनेक आव्हानांचा सामना करत असताना आता देश, परदेशातील मागणी घटल्याने हा उद्योग मोडून पडतो की काय असे चित्र दिसू लागले आहे.

भिवंडीत यंत्रमाग कसा चालतो?

राज्यामध्ये भिवंडी, इचलकरंजी, मालेगाव ही यंत्रमाग उद्योगांची प्रमुख केंद्रे आहेत. भिवंडीत सध्याच्या स्थितीत साडेचार लाखांच्या आसपास यंत्रमाग आहेत. येथील उद्योगाची वार्षिक उलाढाल ही दहा हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे यंत्रमाग चालकांच्या संघटनेचे म्हणणे आहे. हा उद्योग भिवंडी परिसरात ७०० चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या क्षेत्रात पसरला आहे. येथील इमारतीच्या तळघरात यंत्रमागाची धडधड सुरू असते. या भागातील उद्योग जेव्हा पूर्ण भरात सुरू होता तेव्हा येथे दररोज ४०० लाख मीटर ग्रे, प्रिंटेड, डाइड, सुती तसेच कापडाच्या वेगवेगळ्या प्रकारचे मिक्स, सिंथेटिक आणि अन्य धाग्यांपासूनचे उत्पादन होत असे. यंत्रमागातून निघणारे हे कापड पश्चिम आशिया, लॅटीन अमेरिका, युरोप आणि आफ्रिका खंडातील काही महत्त्वाच्या देशांमध्ये निर्यात होत असते. देशातील स्थानिक बाजारपेठांमध्येही भिवंडीच्या कापडाची विक्री घाऊक विक्रेत्यांना होत असते.

आणखी वाचा-विश्लेषण: गाझामध्ये कतारची मध्यस्थी निर्णायक कशी ठरली? अमेरिका, चीन, रशियापेक्षाही कतार महत्त्वाचा का?

वस्त्रोद्योग कामगारांचे अवलंबित्व कसे?

वस्त्रोद्योगात यंत्रमागावर काम करणारे कामगार प्रामुख्याने बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, झारखंड अशा विविध राज्यांतून आलेले असतात. दररोज किती कापड तयार केले जाते, त्यानुसार त्यांची रोजंदारी ठरविली जाते. या मजुरांचे कुटुंब गावीच असते. त्यामुळे मजुरांना येथील खाणावळीवर अवलंबून राहावे लागते. यंत्रमाग उद्योगामुळे खाणावळींची संख्या येथे मोठ्या प्रमाणात वाढली. या खाणावळींना अन्नधान्य पुरविणारे, खाणावळीत काम करणारे अशा नव्या लघु उद्योगाची साखळी या भागात तयार झाली आहे. भिवंडीतील कापड रस्तेमार्गेही परराज्यात तसेच जेएनपीटी येथे जात असते. त्यामुळे माल वाहतूकदारांसाठीही वस्त्रोद्योग महत्त्वाचा आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या लाखो कामगार या उद्योगाशी जोडले गेले आहेत.

चीनच्या चलाखीचा काय संबंध?

चीनमध्ये तेथील सरकारने उद्योजकांना अनेक सवलती दिल्या आहेत. चीनमधील कापड भारतात थेट येत नाही. दुसरीकडे भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये व्यापारी करार झाले आहेत. चीनने बांगलादेशमध्ये त्यांच्या कंपन्या उभारल्या. या कंपनीच्या माध्यमातून चीन चोरट्या पद्धतीने देशात कापड पोहोचवत आहे, असे भारतातील आणि विशेषत: भिवंडीतील यंत्रमाग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तशा प्रकारचे आरोप यापूर्वी जाहीरपणे करण्यात आले आहेत. चीनप्रमाणे इतर काही देशांतूनही भारतीय बाजारपेठेत तयार कापड येत आहे. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण सतत वाढत आहे. भारतात आयात होणाऱ्या या कापडावर फारसे नियंत्रण राहात नाही. त्यामुळे देशी कापड उद्योगापुढील आव्हाने वाढत आहेत असे येथील उद्योजकांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-विश्लेषण: निवडणूक रोखे योजनेविषयी आक्षेप काय आहेत? अपारदर्शितेच्या आरोपावर सरकारचे म्हणणे काय?

सध्याची परिस्थिती काय?

एकेकाळी भिवंडीत सुमारे सात ते साडेसात लाख यंत्रमाग होते. करोनानंतर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत यंत्रमाग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले. करोनापूर्वी सात ते साडेसात लाख इतके यंत्रमाग असणाऱ्या या शहरातील ५० टक्के यंत्रमाग करोनाच्या पडझडीत बंद पडले आहेत. हे प्रमाण फारच मोठे आहे. यामुळे येथील उद्योगांच्या अर्थसाखळीवर मोठा परिणाम झालाच शिवाय शेकडो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. करोनाकाळातील टाळेबंदी लांबत गेल्याने भिवंडीतील हा उद्योग शेवटचा घटका मोजू लागला आहे का, असा प्रश्नही काही काळ निर्माण झाला होता. या कालावधीत कापडाची मागणी नसल्याने अनेक यंत्रमाग कारखानदारांना उद्योग बंद करावा लागला. तर काही उद्योजक परराज्यात किंवा इतर क्षेत्रांत निघून गेले. त्यामुळे आता जेमतेम चार ते साडेचार लाख इतक्या प्रमाणात यंत्रमाग उरले आहेत. टाळेबंदीत अनेक कामगार पायी चालत त्यांच्या गावी निघून गेले. ते पुन्हा परतलेच नाहीत. त्यामुळे कामगारांची संख्याही कमी झाली आहे. दररोज मजुरांना रोजंदारी, विद्युत खर्च तसेच इतर लहानसहान खर्च असा २५ प्रकारचा खर्च उद्योजकांना यंत्रमाग चालविताना सहन करावा लागत आहे.

निर्यातीवर परिणाम कसा झाला?

देशभरात मंदीचे सावट असताना गेल्या काही महिन्यांपासून निर्यातीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे भिवंडीतून विदेशात निर्यात होणाऱ्या कापडाला कारखान्यातून पुरेसा उठाव मिळत नाही. त्यातच, चीन देशातून स्वस्त दराचा कापड चोरट्या मार्गाने स्थानिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध होऊ लागला आहे. त्याचा परिणाम म्हणून यंत्रमागावर तयार झालेले बहुसंख्य कापड गोदामात पडून असल्याचे चित्र आहे. भिवंडीत काही उद्योजकांनी एकत्र येऊन मध्यंतरी एक बैठक घेतली. दररोजचा तोटा कमी करण्यासाठी उद्योजकांनी २० दिवस उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did bhiwandis handloom industry fail print exp mrj