Gobi Manchurian Banned in Goa : भारतीय-चायनिझ पदार्थाचे एकत्रीकरण (फ्युजन) असणारी गोबी मंच्युरिअन ही संपूर्ण भारतातली लोकप्रिय डिश. अगदी रस्त्यांवरील गाड्यांवरही मिळते आणि मोठ-मोठ्या रेस्टराँमध्येही. असे असताना सध्या गोव्यात गोबी मंच्युरिअनला लोकांचा प्रथम क्रमांकाचा शत्रू का मानले जात आहे, या लोकप्रिय पदार्थावर अनेक ठिकाणी बंदी का घालण्यात आली आहे, गोव्यात गोबी मंच्युरियनने पेच का निर्माण केला आहे, विक्रेते मंच्युरिअनप्रमाणेच रागाने लाल का झाले आहेत, ते जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोव्यात कुठे कुठे गोबी मंच्युरिअरनवर बंदी आहे?

मापुसा नगरपरिषदेतील नगरसेवक तारक आरोलकर यांनी गेल्या महिन्यात बोगेश्वर मंदिराच्या जत्रेत गोबी किंवा फुलकोबी मंच्युरियनवर बंदी घालण्याची सूचना केली होती. त्याला परिषदेतील इतर सदस्यांनी तत्काळ होकार देत बंदीवर शिक्कामोर्तब केले. अर्थात गोव्यात गोबी मंच्युरिअनवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२२ मध्ये, श्री दामोदर मंदिराच्या प्रसिद्ध वास्को सप्ताह मेळ्यात, अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मुरगाव नगरपरिषदेला गोबी मंच्युरियन विकणाऱ्या स्टॉलवर बंदी घालण्याचे निर्देश दिले होते. गेल्या वर्षी फोंडा येथील कपिलेश्वर यात्रेत स्थानिकांच्या तक्रारींवरून गोबी मंचुरियनचे सहा स्टॉल बंद करण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून, गोव्यात या पदार्थाला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्याने खाद्यप्रेमी आणि पर्यटकही आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हेही वाचा : विश्लेषण: हिमालयात यंदा बर्फ कमी पडण्याची कारणे काय?

गोबी मंच्युरिअनला विरोध का?

गोबी मंच्युरियनला विरोधी असण्याची वेगवेगळी कारणे आहेत. अतिशय गलिच्छ ठिकाणी पदार्थ तयार करणे, अस्वच्छता, कृत्रिम (सिंथेटिक) रंगांचा वापर, प्रमाणित नसलेल्या निकृष्ट सॉसचा वापर आणि वॉशिंग पावडरमध्ये वापरण्यात येणाऱ्या एका पावडरच्या वापरामुळे गोबी मंच्युरिअनच्या वापरावर नगरपरिषदांनी बंदी घातली आहे. दीर्घकाळ गोबी मंच्युरिअन कुरकुरीत राहण्यासाठी त्यात रिठ्याच्या पावडरचा वापर करण्यात येत असल्याचे , एफडीएमधील वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. एकंदरच गोबी मंच्युरिअनसाठी वापरण्यात येणारे साहित्य हे हानिकारक असल्याने त्याला विरोध करून बंदी घातली जात आहे.

गोबी मंच्युरिअनची निर्मिती कुठून झाली?

गोबी मंच्युरिअनने लोकप्रियतेत बहुधा ‘चिकन मंचुरियन’लाही मागे टाकले आहे. गोव्यातच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात गोबी मंच्युरियनचे स्टॉल्स आढळून येतात, त्यावरून हा पदार्थ किती आवडता झाला आहे, हे लक्षात येते. १९७० च्या दशकात क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये चिकन मंच्युरियनचा शोध लावण्याचे श्रेय मुंबईस्थित प्रसिद्ध चिनी शेफ नेल्सन वांग यांना जाते. काहीतरी नवीन आणण्याचे आव्हान समोर ठेवून, त्यांनी चिकन नगेट्सला मसालेदार कॉर्नफ्लोअर पिठात बुडवून तळले आणि नुसतेच किंवा सोया सॉस, व्हिनेगर, साखर आणि कधीकधी टोमॅटो सॉसच्या मसालेदार ग्रेव्हीमध्ये सर्व्ह केले. पदार्थाच्या नावात वेगळेपणा दर्शविण्यासाठी मंच्युरिअनचा वापर केला असावा, असे सांगण्यात येते. त्यानंतर काही वर्षांनी मंच्युरिअनचे शाकाहारी रूप गोबी मंच्युरिअन तयार करण्यात आले.

हेही वाचा : चंदीगड महापौर निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने ‘लोकशाहीची हत्या’ असे का म्हटले? नक्की काय घडले?

हानिकारक पदार्थांचा वापर का?

गोबी मंच्युरिअनमध्ये वापरण्यात येणाऱ्या फुलकोबीला स्वत:ची एक विशिष्ट चव आहे. गोबी मंच्युरिअन करताना फुलकोबी अर्धवट शिजवून घेतला जातो. त्यामुळे त्याची चव टिकवून ठेवणे अवघड जाते. तसेच गोबी मंच्युरिअन तळल्यानंतर शिजवलेल्या फुलकोबीमुळे ठरावीक कालावधीनंतर त्यांचा कुरकुरीतपणा नष्ट होऊन ते मऊ पडू शकतात. तसेच सॉसमध्ये घोळवलेले मंच्युरिअनही लगेच मऊ होतात. त्यामुळे तळण्यासाठी कार्नफ्लोअरच्या मिश्रणात रिठ्याच्या पावडरसारखे पदार्थ मिसळल्यास त्यांचा कुरकुरीतपणा दीर्घकाळ टिकवणे शक्य होते. तर कमी खर्चात पैसे कमावण्यासाठी घातक रंग आणि निकृष्ट सॉसचा वापर केला जातो. हे सगळेच पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहेत.

pradnya.talegaonkar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why gobi manchurian is banned in some towns of goa including mapusa print exp css