अन्वय सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची जेतेपदाची प्रतीक्षा अखेर संपली. मात्र, ती पुरुष संघाने नाही, तर महिला संघाने संपवली. नुकत्याच पार पडलेल्या महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामाचे बंगळूरु संघाने जेतेपद पटकावले. बंगळूरु संघाच्या या यशात स्मृती मनधानाचे नेतृत्व निर्णायक ठरले. ‘डब्ल्यूपीएल’च्या पहिल्या हंगामात बंगळूरुला बाद फेरीही गाठता आली नव्हती. त्यांनी आठपैकी केवळ दोन सामने जिंकले होते. परंतु दुसऱ्या हंगामात स्मृतीने कर्णधार म्हणून स्वतःमध्ये काही चांगले बदल केले आणि याचाच बंगळूरु संघाला फायदा झाला. स्मृतीने स्वतःमध्ये केलेले हे बदल कोणते आणि तिचे या स्पर्धेतील यश भारतीय क्रिकेटलाही कसे लाभदायी ठरू शकेल याचा आढावा.

या हंगामात स्मृतीमध्ये काय बदल झाले?

यंदाच्या हंगामात बंगळूरुचा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर, ‘या दोन हंगामांतून तुला काय शिकायला मिळाले आहे,’ असा प्रश्न स्मृतीला विचारण्यात आला. यावर ‘स्पर्धा संपल्यानंतर मी याबाबत अधिक विचार करेन,’ असे स्मृतीने उत्तर दिले होते. बंगळूरु संघाने जेतेपद मिळवल्यानंतर स्मृतीला पुन्हा हा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना ती अधिक मोकळेपणाने बोलली. ‘‘गेल्या हंगामातून मी एक गोष्ट शिकले, ती म्हणजे स्वत:वरील विश्वास कायम राखणे. गेल्या वर्षी दडपणाखाली माझा आत्मविश्वास काहीसा कमी व्हायचा. निर्णय घेताना माझ्या मनात बऱ्याच गोष्टींबाबत संभ्रम असायचा. त्यामुळे मी स्वत:शीच संवाद साधला. परिस्थिती कशीही असो, आपण स्वत:च्या क्षमतेवरील विश्वास कमी होऊ द्यायचा नाही असे मनाशी पक्के केले. मानसिकदृष्ट्या आपण कणखर राहायचे असे स्वत:ला सांगितले. याचाच मला यंदा फायदा झाला,’’ असे स्मृती म्हणाली.

आणखी वाचा-महेंद्रसिंह धोनीने उत्तराधिकारी म्हणून ऋतुराज गायकवाडलाच का निवडले?

स्मृतीमधील बदल मैदानावर कसा दिसून आला?

प्रतिस्पर्धी कितीही भक्कम स्थितीत असला, तरी आपण कर्णधार म्हणून संयम राखून निर्णय घ्यायचा असे स्मृतीने ठरवले होते. हे तिच्या नेतृत्वात दिसूनही आले. अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सात षटकांत बिनबाद ६४ अशी दमदार सुरुवात केली होती. परंतु, स्मृतीने संयम राखून विचारपूर्वक निर्णय घेतला. तिने ऑस्ट्रेलियाची डावखुरी फिरकी गोलंदाज सोफी मोलिन्यूकडे चेंडू सोपवला आणि तिने एकाच षटकात शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज आणि ॲलिस कॅप्सी यांना बाद करत सामन्याचे चित्र पालटले. अखेर दिल्लीचा डाव ११३ धावांतच संपुष्टात आला. ‘‘अंतिम सामन्यात सुरुवतीला माझे काही निर्णय चुकले. परंतु मी एक गोष्ट केली, ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवला. कोणताही निर्णय घाईने घेतला नाही. गोलंदाजांशी वारंवार संवाद साधला. दिल्लीच्या मधल्या फळीत बऱ्याच भारतीय फलंदाज आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कशी गोलंदाजी केली पाहिजे हे मला ठाऊक होते. याबाबत मी गोलंदाजांना मार्गदर्शन केले. माझा सल्ला त्यांना फायदेशीर ठरल्याचा आनंद आहे,’’ असे स्मृती अंतिम सामन्यानंतर म्हणाली.

स्मृतीने फलंदाज म्हणून कशी कामगिरी केली?

‘डब्ल्यूपीएल’च्या पहिल्या हंगामात डावखुऱ्या स्मृतीला धावांसाठी झगडावे लागले होते. सलामीवीर स्मृतीला आठ सामन्यांत केवळ १४९ धावा करता आल्या होत्या. तिला एकही अर्धशतक करता आले नव्हते. दुसऱ्या हंगामात मात्र स्मृतीने आपल्या नेतृत्वासह फलंदाजीतील कामगिरीतही सुधारणा केली. तिने १० सामन्यांत दोन अर्धशतकांच्या मदतीने ३०० धावा केल्या. यात दोन अर्धशतकांचाही समावेश होता. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ती चौथ्या स्थानी राहिली. तिच्या या कामगिरीमुळे मधल्या फळीवरील दडपण कमी झाले.

आणखी वाचा- एका ओव्हरमध्ये दोन बाउन्सर! आयपीएलमध्ये यंदा तुफानी फटकेबाजीला ब्रेक लागेल?

भारतीय क्रिकेटला कसा फायदा होईल?

गेल्या काही वर्षांपासून हरमनप्रीत कौर भारतीय महिला संघाचे कर्णधारपद भूषवत असून स्मृती उपकर्णधारपद सांभाळत आहे. हरमनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या कामगिरीचा आलेख चढता राहिलेला असला, तरी त्यांना ‘आयसीसी’च्या जेतेपदाने कायम हुलकावणी दिली आहे. त्यातच हरमन आता ३५ वर्षांची असून स्मृती २७ वर्षांची आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत स्मृतीकडेच भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी येणार हे जवळपास निश्चित आहे. त्यापूर्वी ‘डब्ल्यूपीएल’मध्ये मिळवलेल्या यशामुळे स्मृतीचा कर्णधार म्हणून आत्मविश्वास उंचावला असेल. आपल्यातील गुण-दोषही तिला कळले असतील. आगामी काही हंगामांत ती कर्णधार म्हणून अधिक परिपक्व होत जाईल. ही बाब भारतीय क्रिकेटसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

स्मृतीची ‘ब्रँड व्हॅल्यू’ वाढणे का अपेक्षित?

स्मृती ही सर्वांत लोकप्रिय असलेल्या महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. फलंदाज म्हणून तिने सातत्यपूर्ण कामगिरी करताना जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता रॉयल चॅलेंजर्स फ्रँचायझीला पहिले जेतेपद मिळवून देण्याचा मानही स्मृतीला मिळाला आहे. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या खेळाडूंमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या पुरुष संघाला मोठा चाहतावर्ग लाभला आहे. आता साहाजिकच त्यांचे समर्थन महिला संघालाही असेल. बंगळूरुच्या जेतेपदानंतर सहा तासांतच स्मृतीच्या ‘इन्स्टाग्राम’वरील फॉलोअर्समध्ये १० लाखांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे स्मृतीची ‘ब्रँड व्हॅल्यू’ जवळपास ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचाच अर्थ आता विविध कंपन्या जाहिरातींसाठी स्मृतीला पसंती देऊ शकतील.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is smriti mandhanas success in wpl important for indian cricket print exp mrj
First published on: 25-03-2024 at 08:55 IST