मराठी माणूस हा नाटकवेडा आहे, असे म्हटले जाते. त्याची साक्ष जागतिक रंगभूमी दिन साजरा होत असला तरी मराठी रंगभूमी दिन ५ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो या एकाच कृतीतून येते. विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा पाया घातला त्याला तब्बल अठरा दशके उलटून गेली आहेत. त्या अर्थाने विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक मानले जाते. त्यांनी रंगमंचावर आणलेल्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा ५ नोव्हेंबर १८४३ रोजी पहिला प्रयोग झाला होता. तेव्हापासून ५ नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी दिवाळी आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता या दोन गोष्टींचे सावट रंगभूमी दिनाच्या कार्यक्रमांवर आले आहे. राजकीय नाट्य घडत असल्याने रंगमंचावरील नाट्यकर्मींचा उत्सव असलेला रंगभूमी दिन यंदा उशिराने म्हणजे विधानसभा निवडणुकीचे निकाल सागल्यानंतर नोव्हेंबर अखेरीस साजरा होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशी आहे आख्यायिका

विष्णुदास भावे यांनी १८४३ साली ‘सीता स्वयंवर’ हे पहिले नाटक सांगली येथे रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. १९४३ साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील नाट्य क्षेत्रातील सर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला होता. या निमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापण्यात आली. चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेवर विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्यमंदिराची कोनशिला बसविण्यात आली. या महत्त्वाच्या क्षणी सर्व नाट्यरसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून जाहीर केला गेला, तोही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उपस्थितीमध्येच.

हे ही वाचा… विदर्भात लोकसभा निकालाची पुनरावृत्ती की महायुतीला कौल? 

‘सीता स्वयंवर’चा प्रयोग

विष्णुदास भावे यांनी सांगली येथे ५ नोव्हेंबर १८४३ रोजी मराठीतील ‘सीता स्वयंवर’ या पहिल्या गद्य-पदमिश्रित नाटकाचा प्रयोग सादर केला होता. हा प्रयोगच नाट्यसृष्टीचा पाया ठरला. सांगली संस्थानच्या राजवाड्यातील दरबार हॉलच्या रंगमंचावर मराठी भाषेतील हे पहिले नाटक पार पडले. तेव्हापासून पुढे ५ नोव्हेंबर या दिवशी मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

मराठी रंगभूमीची वाटचाल

मराठी रंगभूमी ही केवळ रंगमंचावर काम करणाऱ्या रंगकर्मींच्या अभिनयाची किंवा नाटकाची संहिता एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. त्या पलीकडे जात नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, नेपथ्य, वेशभूषा आणि रंगभूषा कलाकार यांच्यासह उत्साही प्रेक्षक या सर्वांचा समावेश असलेली नाट्यचळवळ आहे. मराठी रंगभूमी दिन हा अशा बहुआयामी कलाप्रकार घडवणाऱ्या सर्व घटकांना समर्पित आहे. मराठी रंगभूमीचा एक अनोखा पैलू म्हणजे त्यामध्ये वैविध्य आहे. जे प्रायोगिक, पारंपरिक आणि लोकनाट्य प्रकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. मराठी रंगभूमी दिन हा एक असा दिवस आहे की या सर्व वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये अभिव्यक्ती साकारणारे कलाकार एकत्र येतात आणि विविधतेतील एकतेला बळकट करत समृद्धी देतात. आजवर मराठी रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या ज्ञात-अज्ञात हातांचे आणि त्यांच्या समर्पणांचे स्मरण रंगभूमी दिनी केले जाते.

हे ही वाचा… पुतिनमित्र, युक्रेनद्वेष्टे ट्रम्प यांच्या विजयाने युरोपला धडकी… रशियासमोर युक्रेन किती काळ तग धरणार?

विष्णुदास भावे गौरवपदक

मराठी रंगभूमी दिनी सांगली येथील ‘अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती’च्या वतीने १९६० पासून विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी रंगभूमीवर दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ देऊन त्यांचा सन्मान केला जातो. दर वर्षी रंगभूमी दिनी म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी प्रदान केल्या जाणाऱ्या या सन्मानाचे, रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे स्वरूप असते. ज्येष्ठ रंगकर्मी केशवराव दाते, संगीत रंगभूमीवरील नटसम्राट बालगंधर्व, दुर्गा खोटे, नानासाहेब फाटक, मास्टर कृष्णराव, ज्योस्ना भोळे, दाजी भाटवडेकर, ग. दि. माडगूळकर, स्वरराज छोटा गंधर्व, माधव मनोहर, मामा पेंडसे, हिराबाई बडोदेकर, भालचंद्र पेंढारकर, बापूराव माने, प्रभाकर पणशीकर, पु. श्री. काळे, फैयाज, विश्राम बेडेकर, वसंत कानेटकर, शरद तळवलकर, रामदास कामत, शं. ना. नवरे, डॉ. जब्बार पटेल, जयंत सावरकर, दिलीप प्रभावळकर, महेश एलकुंचवार, रत्नाकर मतकरी, मोहन जोशी, अमोल पालेकर अशा दिग्गजांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी सन्मानाच्या मानकरी ठरल्या.

vidyadhar.kulkarni@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why marathi rangbhoomi divas marathi theatre day celebrated on 5th november why yet not celebrated this year print exp asj